आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : वसईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून ४४ वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या प्रभावशाली नेत्याने भाजपात प्रवेश केला… एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबरोबर काम करणे सोपे असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला… राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावर आमदार रोहित पवार यांनी पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले… पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पनौती असल्याची टीका महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर पत्रकार परिषदेतून केली… ’महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा’ हा हिंदू देवस्थाने संपवणारा असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघाने केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला. ठाकरे गटाच्या युवासेनेचे पालघर जिल्हाप्रमुख सिद्धेश रवींद्र जोगळे यांच्यासह सलग ४४ वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले ज्येष्ठ शाखाप्रमुख प्रभाकर गोपाळ पाटील आणि अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. मुंबईतील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नुकत्याच झालेल्या वसई विरार महापालिका निवडणुकीत भाजपाने ४४ जागा जिंकून मोठे यश मिळवले. या यशानंतर पक्षाने आपली संघटनात्मक बांधणी आणखीनच मजबूत करण्यासाठीच्या हालचाली सुद्धा सुरू केल्या. विविध राजकीय पक्षात नाराज असलेले कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी यांना भाजपाने आपल्याकडे खेचण्याचे काम सुरू केले. यादरम्यान ठाकरे गटात नाराज असलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. यामध्ये केवळ तरुण नेतृत्वच नव्हे, तर पक्षाचा जुना आणि विश्वासू चेहरा मानले जाणारे प्रभाकर गोपाळ पाटील यांचाही समावेश आहे. पाटील हे १९८२ पासून २०२६ पर्यंत, म्हणजेच सलग ४४ वर्षे गावराईपाडा शिवसेना शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होते.

फडणवीसांनी केले शिंदेंचे कौतुक

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबरोबर काम करणे सोपे असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला. फोन आणि दरवाजे बंद करून बसणारे मित्र आता आमच्याबरोबर नाही. दुचाकीवर दोन्ही मित्रपक्षांना (शिंदे आणि अजित पवार गट) बरोबर घेऊन जाण्यासाठी दोन फेऱ्या मारेन, असे म्हणत त्यांनी महायुती भक्कम असल्याचे संकेत दिले. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना पूर्वीच्या शिवसेनेबरोबर डील करणे सोपे होते की आत्ताच्या शिवसेनेशी? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, शिंदेंच्या शिवसेनेशी समन्वय साधणे अधिक सोपे आहे. फोन बंद करून, दरवाजा बंद करून बसणारे आताचे नेते नाहीत. फडणवीसांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांबाबत केलेल्या या तुलनेची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

रोहित पवार यांचे विमान अपघातावर प्रश्नचिन्ह

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाला जवळपास चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न विचारले. अधिवेशन काळात फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत त्यांनी सीआयडी चौकशीवर संताप व्यक्त केला. “अजितदादांच्या अपघाताला उद्या ४ महिने होतील. अधिवेशनात बोलताना तुम्ही गुन्हेगारांना पाताळातून शोधून काढण्याचा, सीबीआय चौकशीबाबत अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा, तसेच कर्नाटकात नोंद झालेली झिरो एफआयआर महाराष्ट्रात वर्ग करून घेण्याचा शब्द दिला होता. आपण शब्द देऊन अडीच महिने होत आले, या अडीच महिन्यात काय कार्यवाही झाली हे आपणच सांगावे, असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. तसेच, सीआयडीसारख्या कुचकामी यंत्रणा म्हणजे बिनकामाचे ओझेच म्हणावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

हर्षवर्धन सपकाळ यांची मोदींवर पुन्हा टीका

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर भाजपाच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या वादावर खुद्द सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिले. इतकेच नाही तर त्यांनी पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले. “मी कुठलाही चुकीचा शब्द वापरलेला नाही. तो शब्द लक्षण दर्शवणारा असून संस्कृतमधील ‘दरिद्री’ या शब्दापासून तयार झालेला आहे. मोदी सत्तेत आल्यापासून शेतमालाचे दर घसरले, बेरोजगारी वाढली, महिलांवरील अत्याचार वाढले आणि भ्रष्टाचार बोकाळला. त्या संदर्भात मी वक्तव्य केले. तसेच, भाजपाला जर तो शब्द खटकत असेल तर पंतप्रधान मोदी हे पनौती आहेत, असा शब्दप्रयोग करतो, असा टोला सपकाळ यांनी लगावला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही चांगलेच तोंडसुख घेतले. सरकार तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी अवस्था झाली आहे. कांद्याला २४ रुपये भाव देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र ते पूर्ण न झाल्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे, असेही सपकाळ म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपाचे नेते आणखीनच शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचा राज्य सरकारला इशारा

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने प्रस्तावित असलेला ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ हा कायदा येत्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याचे शासनाचे नियोजन आहे. मात्र, हा कायदा राज्यातील हजारो हिंदू देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नांचे पारंपरिक स्त्रोत संपविणारा असून धार्मिक स्वातंत्र्य आणि पूजा-अर्चेवर गदा आणणारा आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक संजय जोशी यांनी केला. वक्फ बोर्ड आणि चर्चच्या जमिनी वगळून केवळ हिंदू मंदिरांच्या जमिनींवर डोळा ठेवणारा हा डाव मंदिर विश्वस्त कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत, असा इशाराही त्यांनी सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेतून दिला. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन या कायद्यामुळे देवस्थानांची सुमारे साडेचार लाख हेक्टर जमीन धोक्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी देवस्थानांना दिलेल्या इनामांच्या सनदी काढून घेण्याचे काम हे सरकार करत आहे का, असा सवालही जोशी उपस्थित केला. या पत्रकार परिषदेतील सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, हिंदु जनजागृती समितीचे राजेंद्र पाटील, विरेश माईणकर, मंदिर महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक शिवराम देसाई, यशवंत परब, हेमेंद्र गोवेकर आदींची उपस्थिती होती.