आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : कुणाला पश्चाताप झाला असेल तर त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांना भेटावे, असे मोठे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी शिंदेसेनेला उद्देशून केले… पुण्यातील भाजपाच्या माजी खासदाराने आपल्या पुत्रासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला… राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगली… राज्यातील सुमारे ५५ लाख ७० हजार शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची निर्णय मंत्रिमंडळ घेण्यात आला… मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
ठाकरे गटाकडून शिंदेसेनेच्या नेत्यांना ऑफर?
कुणाला शिवसेनेत परत यायचे असेल तर मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी, असे मोठे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेसेनेच्या नेत्यांना उद्देशून केले. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर बंडखोरांना पुन्हा अजिबात पक्षात घेतले जाणार नाही, अशी भूमिका राऊत यांनी घेतली होती. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही नेते नाराज असल्याबाबत राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना, ज्यांना पश्चात्ताप झाला असेल, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की, भाजपा हा महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, तर त्यांनी मातोश्रीवर यावे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटावे, असे विधान राऊत यांनी केले. त्यांच्या या विधानावर आता शिंदे गटातील नेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भाजपाच्या बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
राज्यात विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच पुण्यातील भाजपाचे माजी खासदार संजय काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुण्यातील जिजाई निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे युवानेते पार्थ पवार आणि जय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याशिवा पक्षातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. विक्रम काकडे यांचे नाव विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी चर्चेत असताना झालेल्या या प्रवेशामुळे पुण्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यादरम्यान काकडे हे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राजेश टोपे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभावशाली नेते व माजी मंत्री राजेश टोपे हे लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा जालन्याच्या राजकीय वर्तुळात रंगली. जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करताना टोपे यांची अनुपस्थिति या सर्व चर्चांना आणखीनच हवा देणार ठरली. गेल्या काही दिवसपासून टोपे हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. विधान परिषदेच्या जालना-छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर टोपे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत या चर्चांचे खंडण केले होते. मी कुठेही जाणार नसून माझ्या बाबतीत पसरवले जाणारे वृत्त हे खोटे आणि चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, महाविकास आघाडीचा उमेदवार अर्ज दाखल करतानाची त्यांच्या अनुपस्थितीने टोपे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे.
मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना नोकरी
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (एमआयडीसी) नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतला. अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निर्णयातून झाल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मृत आंदोलकांच्या वारसदारांना नोकरी देण्याच्या मागणीचाही समावेश होता. या मागणीसंदर्भात आज, मंगळवारी सामान्य प्रशासन विभागाने तातडीने शासन आदेश जारी करून मराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले आहे. त्यामुळे जरांगे यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास सरकारने सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील ५५.७२ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी
राज्यातील अपुरा पाऊस आणि संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आज राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सुमारे ५५ लाख ७० हजार शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची निर्णय मंत्रिमंडळ घेण्यात आला त्यानुसार २० जून पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा करावेत आणि त्यांची खाती कर्ज खाती खुली करावीत असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत सहकार विभागाला दिले. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे.
