Todays Top Political News in Maharashtra : शिवसेना ठाकरे गटाच्या धुळ्यातील प्रभावशाली नेत्याने आपल्या पदांचा राजीनामा देऊन शिंदेच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला… मंत्री नितेश राणे यांच्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त कधी कारवाई करणार? असा प्रश्न संविधानप्रेमींनी उपस्थित केला… विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अज्ञाताने शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला… सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या अजितदादांनाच दुर्दैवाने न्याय मिळाला नसल्याची उद्विग्न भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली… कोट्यवधींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पुण्यातील शिंदे गटाच्या शहरप्रमुखांसह १० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराचा राजीनामा

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या विजयाचा गुलाल फिका पडताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे प्रभावशाली नेते व धुळ्याचे पहिले महापौर भगवान करनकाळ यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. येत्या काही दिवसांत आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. २०१६ ते २०२६ या दहा वर्षांच्या काळात पक्षात प्रामाणिकपणे काम करूनही आपल्याला जिल्हा प्रमुख पद मिळाले नाही. या पदासाठी माझ्या नावाला पक्षांतर्गतच काहींनी विरोध केला. पक्षश्रेष्ठींनीदेखील आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केले महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न केले. तरीदेखील मला पक्षाकडून कोणतीही मदत न मिळाल्याची खंत भगवान करनकाळ यांनी व्यक्त केली.

“मंत्री नितेश राणेंवर कारवाई कधी करणार?”

मंत्री नितेश राणे यांच्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त कधी कारवाई करणार? असा प्रश्न संविधानप्रेमी नाशिककरांनी उपस्थित केला. ‘हिंदू हित रक्षा नाशिक’च्या वतीने नुकत्याच नाशिकमध्ये ‘हिंदूंचा रुपया हिंदूलाच’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी हिंदूंच्या मंदिरांशेजारी हिंदूच विक्रेते असायला हवेत, जिहादी वृत्ती असलेल्यांशी व्यवहार टाळावेत, असे विधान केले. त्यांच्या या विधानाचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटले. त्यावर राजकीय व संविधानप्रेमी नाशिककर वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. संविधान प्रेमी नाशिककरचे पदाधिकारी राजू देसले यांनी मंत्री नितेश राणे यांचे विधान हा संविधानाचा अवमान असल्याचे नमूद केले. संविधानाची शपथ घेऊन धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मंत्र्यांविरुद्ध गृहमंत्री कधी कारवाई करणार, असा प्रश्न देसले यांनी उपस्थित केला आहे.

आणखी वाचा : धर्मांतर बंदी विधेयकावरून मुस्लीम नेते का संतापले? विरोधकांच्या टीकेला फडणवीसांनी कसे प्रत्युत्तर दिले?

अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी

शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अज्ञाताने शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी खुद्द दानवे यांनी छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात व्यक्तीने १५ मार्च रोजी रात्री ०२ वाजता सतत कॉल करून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद असून ‘कापून टाकू ’आणि ‘ठोकून काढू ’ असली धमकी दिल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. ११ मार्च ते १४ मार्च रोजी असे दूरध्वनी कॉल आल्याचेही दानवे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. धमकी देणाऱ्याने कोणतेही कारण सांगितले नाही. असे फोन येत असतात; पण यावेळी ते सलग दोन तीन दिवस आल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आपण कुठल्याही धमक्यांना घाबरत नाही. नेहमी वावरताना शिवसैनिकांपैकी कोणी ना कोणी बरोबर असते. अशा धमक्यांना भीक घालायचे नसते, हेही माहीत आहे, असे दानवे म्हणाले.

आमदार अमोल मिटकरी यांची पोस्ट चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ फेब्रुवारी रोजी विमान दुर्घटनेत निधन झाले. या घटनेवर आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत आजवर अनेक मुद्दे उपस्थित केले. सध्या या विमान अपघात प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यावर मिटकरींनी असमाधान व्यक्त केले. यादरम्यान समाज माध्यमावर पोस्ट करीत मिटकरी यांनी आज पुन्हा आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या अजितदादांनाच दुर्दैवाने न्याय मिळाला नाही. आता आवाजही शिल्लक नाही. अजितदादा आम्हाला माफ करा. या मागील अदृश्य शक्ती ओळखता येत नाही, अशी उद्विग्न भावना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. त्यांची या पोस्टची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : काँग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी ५ कोटींची ऑफर? आतापर्यंत पाच जणांना अटक; ऑपरेशन लोटसची का रंगली चर्चा?

शिंदे गटाच्या नेत्यासह १० जणांवर गुन्हा

पुणे शहरातील महंमदवाडी परिसरातील सुमारे ३०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या जमिनीच्या विकास करारात तब्बल ३७ कोटी ४९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांच्यासह एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक विश्वजित सुभाष झंबर यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सात जणांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र, गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने संशयित आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सांगत आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष डांगे यांनी न्यायालयात जामीन अर्जाला विरोध केला आहे.