एजाजहुसेन मुजावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूरकरांना गृहीत धरून उजनी धरणाचे पाणी इंदापूर व बारामतीला नेण्यावरून सोलापूर जिल्ह्यात पेटलेले आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेससाठी चांगलेच डोकेदुखीचे ठरले आहे. यात पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या विरोधात वाढत असलेला रोष विचारात घेता त्याची किंमत राष्ट्रवादीलाच चुकवावी लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळेच पालकमंत्री बदलण्याची मागणी आता राष्ट्रवादीतूनच होऊ लागली आहे. दरम्यान या प्रश्नावर आता महाविकास आघाडीतही बिघाडी दिसून येत असून काँग्रेससह शिवसेनेने या प्रश्नावर राष्ट्रवादीपासून फारकत घेतल्याने एकेकाळी जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व गाजवणारी राष्ट्रवादी आता राजकीयदृष्ट्या एकाकी पडली आहे. 

गेल्या अडीच-तीन वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सोलापूरचे पालकमंत्री तीन वेळा बदलले आहेत. सुरुवातीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा देण्यात आली होती. परंतु जेमतेम काही महिन्यातच ते आजारी पडल्याने त्यांच्या जागेवर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु आव्हाड हेसुध्दा अवघ्या महिनाभरातच पालकमंत्रिपदावरून दूर झाले आणि दत्ता भरणे हे पालकमंत्री झाले. भरणे हे सातत्याने वादग्रस्त ठरले आहेत. करोनाकाळात त्यांच्याकडून दिलासादायक काम झाले नाही. विविध विकासाच्याकामांना चालना देण्यातही ते कमी पडले. प्रशासनाबरोबर स्वपक्षातील स्थानिक नेत्यांचीही त्यांच्या विरोधात सुप्त नाराजी आहे. यात उजनी धरणाचे पाणी लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या नावाखाली इंदापूर व बारामतीला नेण्याच्या निर्णयामुळे पालकमंत्री म्हणून भरणे हे आणखी वादात सापडले आहेत.

याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमध्ये वरचढ ठरलेल्या राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने आंदोलन पेटविल्यानंतर भाजपने प्राप्त परिस्थितीचा लाभ उठवत राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपचे नेते आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माळशिरसचे आमदार राम सातपुते, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आदींनी उघडपणे संघर्षांची भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे आणि सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनीही राष्ट्रवादीच्या विरोधात गर्जना केली आहे. महाविकास आघाडीचा धर्म न पाळता राष्ट्रवादीने मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेनेच्या काही स्थानिक माजी लोकप्रतिनिधींसह प्रमुख कार्यकर्त्यांना खेचून घेतले आहे. त्याची खदखद दोन्ही पक्षांना आहे. ती उजनीच्या पाणी प्रश्नाने बाहेर पडली आहे. अगोदरच माढ्यातील माघारीनंतर सोलापूर आणि बारामतीकरांमध्ये निर्माण झालेली दरी आता या उजनीच्या पाण्यामुळे अधिक रुंदावणार की काय अशीही चर्चा सुरू आहे.

दरम्यान उजनीच्या पाण्याचे आंदोलन पेटत असतानाच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्यभर काढलेल्या जागर शेतकऱ्यांचा-आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानाचा समारोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी फडणवीस व दरेकर यांच्यासह अनेक नेत्यांनी उजनी धरणाचे पाणी इंदापूर व बारामतीला नेण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीसह पवार काका-पुतणे आणि पालकमंत्री भरणे यांच्यावर आसूड ओढण्यात आले. हे सारे काही आगामी सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर घडू लागल्यामुळे राष्ट्रवादीच्या तोंडचे पाणी पळून जाण्याची वेळ आली आहे. सध्या पालकमंत्री भरणे व राष्ट्रवादी पूर्णतः अडचणीत असताना जिल्ह्यातील एकाही प्रमुख नेत्याने बचावासाठी पुढे येण्याची मानसिकता दाखविली नाही. जे मूठभर नेते बचाव करीत आहेत, ते दुय्यम दर्जाचे मानले जातात. जिल्ह्यात दोन्ही खासदारांसह सर्वाधिक सात आमदार भाजपचे आहेत. एखाद्या मुद्द्यावर विरोधात भूमिका घेताना रान पेटविणे म्हणजे काय असते, हे भाजपकडूनच शिकावे.

येत्या काही दिवसांत भाजप आणखी आक्रमकपणे मैदानात उतरू शकतो. तशी जाणीव राष्ट्रवादीला असावी. म्हणूनच पालकमंत्री बदलण्याच्या हालचाली राष्ट्रवादीच्या गोटातूनच होत आहेत. परंतु पालकमंत्री बदलून उपयोग नाही तर उजनीचे पाणी इंदापूर व बारामतीला नेण्याचा निर्णय स्थगित होणे अपेक्षित आहे. मागील वर्षी असा प्रयत्न झाला असता खुद्द राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे तो मागे घेण्यात आला होता. आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाली तरी राष्ट्रवादीची मलिन झालेली प्रतिमा यातून कितपत उजळून निघेल, याविषयी शंका व्यक्त होत आहे. एकूणच उजनीच्या या पाण्याने महाविकास आघाडीतही बिघाडी केली असून याचा भाजपाला मात्र अचूक लाभ होण्याची चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ujani dam water issue has become trouble creating factor for ncp
First published on: 23-05-2022 at 09:21 IST