scorecardresearch

Bharat Jodo Yatra: “मेहनत घेणं चांगलंच, पण त्यात…”; अमित शाहांची राहुल गांधींवर मार्मिक टिप्पणी

गुजरात निवडणुकीत काँग्रेसच मुख्य विरोधी पक्ष असल्याचा पुनरुच्चार शाह यांनी केला आहे. काँग्रेस सध्या संकटातून जात असून त्याचे परिणाम गुजरातमध्येही दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

Bharat Jodo Yatra: “मेहनत घेणं चांगलंच, पण त्यात…”; अमित शाहांची राहुल गांधींवर मार्मिक टिप्पणी
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या यात्रेवर गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबादेत ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. “राजकारण्यांनी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे, हे नेहमीच माझं मत आहे. मेहनत घेणं चांगलंच आहे, पण राजकारणात केवळ सातत्यपूर्ण प्रयत्नांचेच परिणाम दिसून येतात”, असं शाह यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींच्या यात्रेचे परिणाम समोर येण्यासाठी वाट बघावी लागेल, असंही ते म्हणाले आहेत.

गुजरात निवडणुकीत काँग्रेसच मुख्य विरोधी पक्ष असल्याचा पुनरुच्चार शाह यांनी केला आहे. काँग्रेस सध्या संकटातून जात असून त्याचे परिणाम गुजरातमध्येही दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये सत्तेत येण्याचा दावा काही दिवसांपूर्वी लिखित स्वरुपात ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. हा दावा फेटाळून लावत आप गुजरातमध्ये खातंदेखील उघडू शकणार नाही, असं शाह म्हणाले आहेत. “देशाच्या कोणत्याही भागात काम करण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. पण त्या पक्षाला स्वीकारायचं की नाही, हे जनतेवर अवलंबून आहे. निवडणूक निकालाची वाट बघा, कदाचित यशस्वी उमेदवारांच्या यादीत ‘आप’च्या एकाही उमेदवाराचे नाव नसेल”, असं शाह यांनी म्हटलं आहे.

चुनावी हिंदू: राहुल गांधींच्या महाकाल मंदिर भेटीचा भाजपानं जोडला गुजरात निवडणुकीशी संबंध

“बजेटपेक्षा जास्त आश्वासनं दिली की ती पूर्ण होऊ शकत नाहीत, हे जनतेला माहित आहे. गुजरातच्या जनतेच्या मनात ‘आप’ कुठेच नाही”, अशी टीकादेखील त्यांनी केली आहे. “जनतेचा भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपा अभूतपूर्व विजयाची नोंद करेल”, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला आहे.

२००२ साली दंगेखोरांना ‘धडा शिकवला’; गुजरातच्या प्रचारसभेत अमित शहांचे विधान

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या मध्य प्रदेशमध्ये आहे. या यात्रेदरम्यान उज्जैनमधील महाकाल मंदिरात गांधींनी पूजा-अर्चना केली. यावरुन भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांना ‘चुनावी हिंदू’ म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांचे हिंदुत्व फक्त निवडणुकीदरम्यानच समोर येते, असेही मालवीय म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 12:28 IST

संबंधित बातम्या