UP Election 2027 Congress SP Seat Sharing : उत्तर प्रदेशात निवडणूकपूर्व घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षात जागावाटपावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच काँग्रेसने सहारनपूरचे खासदार इम्रान मसूद यांची उत्तर प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेस इम्रान मसूद यांना पुढे करत ‘दबाव तंत्राचा’ वापर करणार असल्याचे समाजवादी पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अधिक जागा मिळाव्यात म्हणून समाजवादी पक्षावर दबाव टाकण्यासाठी मसूद यांची नियुक्ती करण्यात आली, असे सपाच्या नेत्यांना वाटते, त्यामुळे समाजवादी पक्षात या निर्णयाबाबत अस्वस्थता असल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
मात्र, समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना नमूद केले की, इम्रान मसूद यांच्या नियुक्तीचा काँग्रेससोबत सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, तरीही पक्षातील काही नेत्यांनी खासगीत या घडामोडीबाबत नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे.
सपाच्या एका नेत्याने म्हटले की, काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे स्पष्ट नाही. मात्र, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आराधना मिश्रा मोना आणि त्यांचे वडील प्रमोद तिवारी यांचे समाजवादी पक्षासोबत चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीची दोन्ही पक्षांमधील जागावाटपाबाबतची चर्चा सुरळीत होण्यास मदत होऊ शकते. याउलट, इम्रान मसूद यांनी सपा नेतृत्वाबाबत केलेली वक्तव्य आघाडीत अस्वस्थतेचे कारण ठरते असे या नेत्याने सांगितले.
सपा नेते पुढे म्हणाले, आता जागावाटपाच्या चर्चेत इम्रान मसूद यांना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा किती अधिकार देतात यावर पुढील समीकरण अवलंबून राहणार आहेत. जागावाटपावर लवकर निर्णय व्हावा अशी काँग्रेसची भूमिका आहे, कारण चर्चा लांबली तर समाजवादी पक्ष जेवढ्या जागा देईल, तेवढ्याच जागा स्वीकारण्याची वेळ काँग्रेसवर येऊ शकते असेही सपा नेते म्हणाले.
सपाच्या एका वरिष्ठ नेत्याने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, इम्रान मसूद यांची नियुक्ती म्हणजे काँग्रेसची दोन उद्दिष्टे साध्य करण्याची खेळी असू शकते. एकीकडे अधिक जागा मिळवण्यासाठी समाजवादी पक्षावर दबाव वाढवणे आणि दुसरीकडे सपा ज्या मुस्लीम मतदारांना आपला पारंपरिक आधार मानतो, त्या मतदारांमध्ये काँग्रेसचा प्रभाव वाढवणे.
वरिष्ठ नेते पुढे म्हणाले, सहारनपूरमध्ये इम्रान मसूद यांचा प्रभाव असला तरी संपूर्ण पश्चिम उत्तर प्रदेशात ते प्रभावशाली नाहीत, त्यामुळे या भागातील सपाच्या मुस्लीम मतदारांमध्ये त्यांच्या नियुक्तीचा फारसा परिणाम होणार नाही. मात्र, काँग्रेस-सपा युती आणि मुस्लीम प्रश्नांवर मसूद यांनी केलेली सार्वजनिक वक्तव्ये समाजवादी पक्षावर जागावाटप लवकर पूर्ण करण्यासाठी दबाव वाढवू शकतात. तसेच मुस्लिमबहुल जागांपैकी काही जागा काँग्रेसला देण्याची मागणीही पुढे येऊ शकते. प्रादेशिक पक्षांकडे असलेली भाजपाविरोधी मते आपल्या बाजूने वळवण्याचाही काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे या नेत्याने नमूद केले.
दुसऱ्या एका सपा नेत्याने काँग्रेसने इमरान मसूद यांची युतीच्या जागावाटपाच्या चर्चेत नेमकी भूमिका काय असेल हे स्पष्ट करावे अशी मागणी केली. त्यांच्या मते, काँग्रेस-सपा युतीचा निर्णय लवकर घ्यावा अशी मागणी मसूद सातत्याने करत आहेत. मात्र, माध्यमांमध्ये समाजवादी पक्षाबाबत बोलण्याआधी त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करायला हवी. सर्व विरोधी पक्षांना मुस्लीम मतांची अपेक्षा आहे; मात्र भाजपासोबत असलेल्या ४२ टक्के गैर-मुस्लीम मतदारांमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही असे या नेत्याने म्हटले.
पश्चिम उत्तर प्रदेशातील एका सपा नेत्याने मात्र मसूद यांच्या माध्यमातून पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे म्हटले. सहारनपूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विधानसभा जागांवर सपा दावा करणार आहे आणि या जागांवर निवडणूक लढवण्याचीही पक्षाची तयारी आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
जागावाटपात अडथळे?
काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील जागावाटपाच्या चर्चेत सहारनपूरमधील जागांचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो. गेल्या महिन्यात इम्रान मसूद यांनी म्हटले होते की, २०१७ मध्ये काँग्रेसने लढवलेल्या सहारनपूरमधील पाचही जागांवर पक्ष पुन्हा निवडणूक लढवेल. “हा आमचा मजबूत गड आहे, तो आम्ही असाच थोडी सोडणार.”
इम्रान मसूद यांच्या नियुक्तीवरून सपा नेत्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र, काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणाले की, मसूद यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्ष सोडला आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सपाच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे खासदार झाले, यामुळे सपा नेत्यांमध्ये त्यांच्याबद्दल अधिक नाराजी आहे. दोन्ही पक्षांमधील मतभेद लवकर दूर होतील अशी काँग्रेसला आशा आहे. तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने मसूद यांना सपावर यापुढे थेट टीका न करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत.
इम्रान मसूद यांचा राजकीय प्रवास
५६ वर्षीय इम्रान मसूद हे पश्चिम उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक प्रमुख चेहरा आहेत. कुटुंबाची राजकीय परंपरा पुढे नेत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते चर्चेत राहिले. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांनी आपली ‘कट्टर मुस्लीम नेता’ अशी प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला असून हिंदू मतदारांशीही संपर्क वाढवला आहे. त्यांनी २००७ मध्ये मुझफ्फराबादमधून अपक्ष म्हणून पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवली, ज्यात ते निवडूनही आले. २०१२ मध्ये काँग्रेसने त्यांना राहुल गांधी यांच्या टीममधील युवा चेहरा म्हणून पुढे आणले. मात्र, त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला, ते नकूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी वादग्रस्त वक्तव्यामुळे मसूद चर्चेत आले. एका व्हिडीओ क्लिपमध्ये ते पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना धमकी देताना दिसत होते. एका व्हिडीओमुळे त्यांच्यावर द्वेषपूर्ण भाषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच लोकसभा निवडणुकीत सहारनपूरमधून भाजपाच्या राघव लखनपाल यांच्याकडून मसूद यांचा पराभव झाला.
२०२२ मध्ये मसूद यांनी काँग्रेसचा हात सोडत समाजवादी पक्षात प्रवेश केला. मात्र, विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने त्यांनी काही महिन्यांत पुन्हा सपा पक्ष सोडला आणि बसपामध्ये प्रवेश केला. मायावती यांनी त्यांच्यावर पश्चिम उत्तर प्रदेशच्या समन्वयकाची जबाबदारी सोपवली; मात्र २०२३ मध्ये शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत त्यांची बसपामधून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर मसूद पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सहारनपूरमधून विजयी होत ते पहिल्यांदाच खासदार झाले.
अलीकडच्या वक्तव्यांमुळे पुन्हा चर्चा
२१ सप्टेंबर रोजी एएनआयशी बोलताना इम्रान मसूद यांनी सपा-काँग्रेस युतीबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी केली. युती होणार नसेल तर काँग्रेसने आपल्या तयारीला सुरुवात केलीच आहे असे त्यांनी स्पष्ट केले. अखिलेश यादव यांनी आघाडीचा निर्णय तातडीने घ्यावा आणि नेतृत्व करायचे असेल तर मोठं मन ठेवावं लागेल, असेही ते म्हणाले. काँग्रेसशिवाय सपा पुढे गेल्यास भाजपाला पराभूत करणे शक्य होणार नाही, असा दावाही मसूद यांनी केला.
याआधी जून २०२५ मध्येही इम्रान मसूद यांनी युतीबाबतचा मुद्दा पुढे आणला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये झालेला ‘६२-१७ फॉर्म्युला’ २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत चालणार नाही, असे त्यांनी खडसावून सांगितले आहे, त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे सपा-काँग्रेसमधील जागावाटपाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.
