UP Assembly Election 2027 : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे. सर्व पक्षांमध्ये जागावाटपाचे सूत्र जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातच उत्तर प्रदेशात विरोधकांमध्ये जागावाटपावरून मतभेद वाढत असल्याचे वृत्त आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला युती टिकवायची आहे, मात्र त्यासाठी किती जागांवर तडजोड करायची हा गुंतागुंतीचा मुद्दा ठरत आहे.
काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीतून उत्तर प्रदेशात पुन्हा पाय रोवण्याची संधी आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सहा जागा जिंकल्या, पण विधानसभेत पक्षाचे केवळ दोन आमदार आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्षासमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान असणार आहे. दुसरीकडे, समाजवादी पक्षाने लोकसभेच्या ३७ जागा जिंकून उत्तर प्रदेशातील विरोधकांमध्ये पहिले स्थान मिळवले, त्यामुळे लहान मित्रपक्षाला किती जागा द्यायच्या आणि त्याचवेळी विरोधकांची एकजूट कशी टिकवायची असा पेच समाजवादी पक्षासमोर आहे. उत्तर प्रदेशातील विरोधकांमध्ये काँग्रेस-सपा युतीने लक्षणीय कामगिरी केली आहे. आता जागावाटपाच्या वाटाघाटीदरम्यान दोन्ही पक्ष आपापले राजकीय हित जपत एकजूट कशी टिकवणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, काही नेत्यांनी केलेल्या जाहीर वक्तव्यांवरून आघाडीत फूट पडल्याचा निष्कर्ष काढू नये. जागावाटपाचा निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेतेच घेतील, असे समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार जावेद अली यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले आहे. “आघाडी आणि जागावाटपाबाबतचा निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेईल. त्यांनी अद्याप याबाबत काहीही सांगितलेले नाही. जोपर्यंत ते भूमिका स्पष्ट करत नाहीत, तोपर्यंत आघाडीवर प्रश्न उपस्थित करण्याचे कारण नाही,” असे ते म्हणाले.
काँग्रेसकडून दबावतंत्राचा वापर
दरम्यान, काँग्रेसने जागावाटपाचा मुद्दा लवकर मार्गी लावण्याची मागणी केली आहे. २१ सप्टेंबरला सहारनपूरचे खासदार इम्रान मसूद यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना युतीबाबत लवकर निर्णय घेण्याचे आवाहन केले. “युती करायचीच असेल तर ती लवकरात लवकर अंतिम करा,” असे ते म्हणाले. अखिलेश यादव यांना आघाडीचे नेतृत्व करायचे असेल तर त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा, असेही मसूद यांनी नमूद केले होते. मसूद यांच्या माध्यमातून काँग्रेस समाजवादी पक्षावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.
काँग्रेसने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २ ऑक्टोबरला प्रदेश काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल केले. इम्रान मसूद यांची उत्तर प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीमुळे समाजवादी पक्षातही अस्वस्थता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण काँग्रेस आगामी जागावाटपात मुस्लिमबहुल मतदारसंघांवर दावा करू शकते. हे मतदारसंघ समाजवादी पक्षाचे पारंपरिक प्रभावक्षेत्र मानले जातात, त्यामुळे या जागांवरून दोन्ही मित्रपक्षांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेंद्र पाल गौतम यांनी जागावाटपाच्या चर्चेत अधिक जागांची मागणी केली आहे. सुरुवातीला त्यांनी १५० जागांचा उल्लेख केला होता, मात्र अलीकडेच त्यांनी “१५० जागा कोण मागत होतं? मी तर २०० जागांबद्दल बोललो होतो,” असे म्हटले. जागावाटपात काँग्रेसलाही समान वाटा मिळायला हवा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
काँग्रेसच्या या मागणीला समाजवादी पक्षातून मात्र विरोध होत आहे. पक्षाचे खासदार शिवपाल सिंह पटेल यांच्या मते, काँग्रेसला ५० जागा देणे म्हणजे युतीच्या हक्काच्या आणि जिंकू शकणाऱ्या जागांवर पाणी सोडावे लागू शकते, त्यामुळे काँग्रेसला किती जागा द्यायच्या आणि स्वतःच्या प्रभावक्षेत्राशी कितपत तडजोड करायची, हा समाजवादी पक्षासमोरचा महत्त्वाचा प्रश्न ठरत आहे.
जागावाटपावरून काँग्रेस आणि समाजवादी पक्षात वेगवेगळे सूर उमटत आहेत, तरी अखिलेश यादव यांनी सावध भूमिका घेतली आहे. जागांची संख्या ठरवण्यापेक्षा जिंकण्याची क्षमता असलेल्या पक्षाच्या उमेदवाराला संधी देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. “आमच्यासाठी जागा किती हा मुद्दा नाही. जिंकता येणाऱ्या जागा महत्त्वाच्या आहेत. जो जिंकू शकतो, त्याने ती जागा घ्यावी,” असे अखिलेश म्हणाले आहेत. त्यावर इम्रान मसूद यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “जागा मिळाली, तरच विजय मिळेल,” असे ते म्हणाले. म्हणजेच निवडणूक जिंकण्याची क्षमता महत्त्वाची मानणाऱ्या समाजवादी पक्षाच्या भूमिकेबरोबरच काँग्रेसला पुरेशा जागा मिळण्याची अपेक्षाही कायम आहे.
जागावाटपामधील मतभेद काय?
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते फखरुल हसन चाँद यांनी ही वक्तव्यं वाटाघाटीचा एक भाग असल्याचे म्हटले. “आमच्या युतीत लोकशाही आहे. इम्रान मसूद आपली भूमिका मांडतात, तसेच समाजवादी पक्षाचे नेतेही बोलतात. जागावाटपाचा निर्णय होईपर्यंत वाटाघाटी सुरूच राहतील,” असे त्यांनी सांगितले, त्यामुळे सध्या दोन्ही पक्षांकडून वेगवेगळ्या मागण्या मांडल्या जात असल्या तरी अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्वाच्या चर्चेनंतरच होणार आहे.
“दोन्ही पक्षांचे राष्ट्रीय नेतृत्व सतत एकमेकांच्या संपर्कात असून चर्चा सुरू आहे. युतीचा निर्णय दिल्ली आणि लखनौमध्येच होईल. मध्यस्थांना यात बोलण्याचा कोणताही अधिकार नाही,” असे नमूद करत फखरुल चाँद पुढे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाचा आकडा अर्ध्यावर आणला होता; आता २०२७ च्या निवडणुकीत आम्ही त्यांचा पूर्णपणे सफाया करू.”
काँग्रेसचे प्रवक्ते अंशू अवस्थी यांनीही असाच सूर आळवला. “सध्या जी विधाने केली जात आहेत, ती समाजवादी पक्ष किंवा काँग्रेसमधील नेत्यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून केलेली मते आहेत. युतीच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांत मतभेद नाहीत,” असे त्यांनी नमूद केले. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते फखरुल हसन चाँद यांनी दोन्ही पक्षांसाठी युतीमध्ये समन्वय राखणे गरजेचे असल्याचेही नमूद केले.
“आघाडीत प्रत्येक पक्षाला सन्मानाने आणि समान वाटा मिळावा अशी अपेक्षा असते. मात्र, या मुद्द्यांवर चर्चेअंती निर्णय घेतला जाईल,” असे फखरुल हसन म्हणाले. दरम्यान, दोन्ही पक्षांकडून आपापले राजकीय संपर्क वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ३ ऑक्टोबर रोजी स्वामी प्रसाद मौर्य यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर मौर्य यांनी आपल्या ‘अपनी जनता पार्टी’चा इंडिया आघाडीत समावेश होणार असल्याचे जाहीर केले. ओबीसी नेते मौर्य हे यापूर्वी बहुजन समाज पक्ष आणि भाजपामध्ये होते. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता; मात्र नंतर त्यांचे पक्षाशी मतभेद झाले.
अखिलेश यादव यांनी माध्यमांशी बोलताना मौर्य यांच्या पक्षप्रवेशावर उपरोधिक टिप्पणी केली. “या लोकांना पक्षप्रवेशाचे फॉर्म मिळतात तरी कुठून?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मौर्य यांनी तुरुंगात असलेले समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या पत्नी तझीन फातिमा यांचीही भेट घेतली. अलीकडच्या काही महिन्यांत काँग्रेस नेत्यांनीही आझम खान यांच्या राजकीय प्रभावक्षेत्राशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. मोहम्मद अली जौहर विद्यापीठावरून वाद निर्माण झाला होता, त्या काळातही काँग्रेसने या भागात लक्ष घातले होते. दुसरीकडे, आझम खान हे समाजवादी पक्षातच असल्याचे पक्षाने वारंवार स्पष्ट केले आहे.
काँग्रेस आपला राजकीय संपर्क वाढवत असताना समाजवादी पक्षानेही इतर पर्याय खुले ठेवले आहेत. आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान अनेकदा अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे. पंजाबमध्ये काँग्रेस आणि ‘आप’ एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. तसेच ‘आप’ आता इंडिया आघाडीचाही भाग नाही, त्यामुळे या भेटींना राजकीय महत्त्व आहे.
या भेटींवर समाजवादी पक्षाचे नेते राजेंद्र चौधरी अली यांनी फारसे भाष्य केले नाही, मात्र भविष्यातील शक्यता खुल्या ठेवल्या. “आमचे ‘आप’शी चांगले संबंध आहेत. अनेक राजकीय मुद्द्यांवर आमची भूमिका समान राहिली आहे. ‘आप’ इंडिया आघाडीतून बाहेर पडला असला तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील संबंध कायम आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्ही उमेदवार दिला नव्हता, उलट त्यांचा प्रचार केला होता. राजकारणात आघाड्या तुटतात आणि पुन्हा जुळतात. नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असतात, पुढे काय होते ते पाहू,” असे ते म्हणाले.
दरम्यान, समाजवादी पक्षाने निषाद पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे मंत्री संजय निषाद यांच्याशीही जवळीक वाढवण्याचे प्रयत्न केले आहेत. भाजपासोबत संजय निषाद यांचे संबंध अनेकदा ताणले गेले आहेत. अलीकडेच निषाद समाजातील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याचा आरोप करत संजय निषाद आणि फखरुल हसन चाँद एकत्र असल्याचे पाहायला मिळाले होते.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत लढलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाशी (एसबीएसपी) मात्र अखिलेश यादव यांनी अद्याप संपर्क साधलेला नाही. तरीही, अलीकडेच त्यांनी जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेण्याचे संकेत दिले आहेत. “निवडणुकीच्या वातावरणात जुने मतभेद विसरून जाऊया. जे भरकटले आहेत आणि जे जुने सहकारी पुन्हा आमच्यासोबत येऊ इच्छितात, त्यांच्यासोबत भूतकाळात जे काही घडले ते आम्ही विसरायला तयार आहोत,” असे अखिलेश म्हणाले.
मात्र, संजय निषाद किंवा ओमप्रकाश राजभर यांनी एनडीए सोडण्याचे कोणतेही संकेत मिळत नाहीत, त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत टिकून राहण्यासाठी दोन्ही पक्षांनी आपापली राजकीय ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेस मुस्लीम आणि ओबीसी नेतृत्वाला सोबत घेऊन आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे, तर समाजवादी पक्ष ‘आप’ आणि जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन नव्या पर्यायांची चाचपणी करत आहे. मात्र, जागावाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठच घेतील असे दोन्ही पक्षांचे म्हणणे आहे.
