UP Election and BJP Delimitation Strategy : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीला आता अवघे पाच महिने बाकी आहेत, त्यामुळे या निवडणुकीच्या आधीच लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा मुद्दा पुढे नेण्याबाबत भाजपाकडून सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसत आहे. कारण उत्तर प्रदेशची निवडणूक केवळ राज्यापुरती मर्यादित नसून २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या राजकीय गणितावर निवडणूक निकालाचा परिणाम होऊ शकतो. पक्षातील एका गटाचे मत आहे की, उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लोकसभेच्या जागांची संख्या वाढवण्याची प्रक्रिया पुढे न्यावी. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक राजकीय महत्त्व असलेल्या राज्यांपैकी एक आहे, त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया पुढे नेण्याआधी विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहणे अधिक योग्य ठरेल, असे या गटाचे मत आहे.
मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून प्रादेशिक पक्ष नाराज होऊ नयेत, याचीही भाजपा नेतृत्वाकडून काळजी घेतली जात आहे, त्यामुळे केवळ एनडीएतील पक्षांशीच नव्हे, तर एनडीएबाहेरील पक्षांशीही संवादाची दारे खुली ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत गरज पडल्यास हे पक्ष राजकीयदृष्ट्या उपयोगी ठरू शकतात, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
महिलांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आणि लोकसभेच्या जागा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने आणलेले घटनादुरुस्ती विधेयक एप्रिलमध्ये लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकात लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८८० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव होता. मात्र, पावसाळी अधिवेशनात सरकारने यासंदर्भात नवे घटनादुरुस्ती विधेयक मांडणे टाळले आहे.
दरम्यान, या विधेयकासाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत भाजपाने आधीच जुळवून आणल्याचा दावा पक्षातील सूत्रांनी केला आहे, त्यामुळे आता ‘संख्याबळ’ ही अडचण नसून, सध्याच्या राजकीय परिस्थितीत कोणत्या मुद्द्याला प्राधान्य द्यायचे, यावर पक्षश्रेष्ठी गांभीर्याने विचार करत असल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
भाजपामधील एका नेत्याच्या मते, आता प्रश्न केवळ लोकसभेतील जागांची संख्या किती वाढणार, यापुरता राहिलेला नाही. सध्या पक्षाचे लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर आहे. पक्षाने अद्याप उत्तर प्रदेशातील परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतलेला नाही, त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, असे या नेत्याने नमूद केले. मात्र, महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक पुढे नेण्याबाबत नरेंद्र मोदी सरकार ठाम असल्याचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे. यासाठी भाजपा नेतृत्व एनडीएबाहेरील काही पक्षांशीही चर्चा करत आहे. यामध्ये द्रमुकसोबतच्या चर्चेलाही महत्त्व आहे. भाजपामधील सूत्रांच्या माहितीनुसार, तामिळनाडूतील द्रमुकच्या लोकसभेच्या जागांचा सध्याचा ७.२ टक्के वाटा पुढील २५ वर्षे कायम ठेवण्याची सरकारने घटनात्मक हमी दिल्यास द्रमुक विधेयकाला पाठिंबा देऊ शकते. मात्र, ही हमी केवळ चर्चेपुरती मर्यादित न ठेवता विधेयकातच स्पष्टपणे नमूद करावी, अशी मागणी द्रमुकने केली आहे.
द्रमुकच्या एका नेत्याने स्पष्ट केले की, केवळ तोंडी आश्वासनावर पक्ष विश्वास ठेवणार नाही. तामिळनाडूच्या लोकसभा जागांचा सध्याचा ७.२ टक्के वाटा कायम ठेवण्याची हमी मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित विधेयकातच स्पष्टपणे असावी, अशी पक्षाची भूमिका आहे. “आश्वासन मिळाले म्हणून आम्ही लगेच त्यावर विश्वास ठेवणार नाही, ते विधेयकात दिसायला हवे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, भाजपामधील काही नेत्यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक होईपर्यंत मतदार पुनर्रचनेचा निर्णय पुढे ढकलावा असे वाटते. शिक्षण आणि परीक्षांमधील कथित गैरप्रकार, तसेच बेरोजगारीच्या मुद्द्यावर तरुणांमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आणि छोट्या पक्षांना नाराज करणारा कोणताही निर्णय आत्ता घेऊ नये, असे या नेत्यांचे मत आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची परिस्थिती अधिक स्पष्ट होण्यासाठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे ठरतील, असे भाजपाच्या एका नेत्याने सांगितले.
याशिवाय, मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित कोणत्याही कायद्याला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे, असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेप्रमाणेच या निर्णयालाही न्यायालयीन आव्हान मिळू शकते, त्यामुळे अशा कायदेशीर आव्हानांची शक्यता लक्षात घेऊन सरकारने पुढची पावले काळजीपूर्वक उचलण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले.
२०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा एनडीएतील घटक पक्षांसोबतचे संबंध आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे या नेत्यांनी सांगितले. विशेषतः तेलुगू देसम पार्टी (TDP) आणि जनता दल युनायटेड (JDU) सोबतची युती टिकवून ठेवण्यासोबतच द्रमुकला सोबत ठेवण्याचा आणि बीआरएससोबत संवाद वाढवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. द्रमुक हा पक्ष सध्या तटस्थ असल्याने मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मात्र मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठीही मतदारसंघ पुनर्रचना गरजेची आहे. लोकसभेच्या एकूण जागा ५४३ असोत किंवा भविष्यात ८००, महिलांसाठी जागा निश्चित करताना त्या जागांचे वाटप कसे करायचे हा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे निवृत्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आणि कायदेशीर तरतुदींच्या आधारे मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रसाद यांच्या मते, मतदारसंघ पुनर्रचना ही नवीन प्रक्रिया नाही आणि ती होणे आवश्यकच आहे. २००१ मध्ये दक्षिण भारतातील राज्यांच्या दबावानंतर लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेवर २०२६ पर्यंत स्थगिती देण्यात आली होती. ही मुदत आता संपत असल्याने पुन्हा मतदारसंघ पुनर्रचनेची गरज निर्माण झाली आहे असेही त्यांनी नमूद केले.
रविशंकर प्रसाद यांनी २००१ च्या ८४ व्या घटनादुरुस्तीचा संदर्भ दिला. तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने केलेल्या या घटनादुरुस्तीमुळे २०२६ नंतर होणाऱ्या जनगणनेपर्यंत प्रत्येक राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या एकूण संख्येवर असलेली स्थगिती कायम ठेवण्यात आली होती.
यानंतर २०२३ मध्ये नरेंद्र मोदी सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर केले. या कायद्यानुसार लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव आहे. मात्र, मतदारसंघ पुनर्रचनेचा कायदा मंजूर झाल्यानंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारेच हे आरक्षण लागू करता येणार आहे.
देशभरातील सध्याची जनगणना फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार आहे. मात्र, हिमवृष्टीचा सामना करणाऱ्या भागांमध्ये आणि उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा यांसारख्या निवडणूक तोंडावर आलेली असल्याने येथे जनगणनेचे काम यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, जनगणना पूर्ण झाल्यानंतर लोकसंख्येच्या आधारावर लोकसभा मतदारसंघांची फेररचना करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. २००१ च्या ८४ व्या घटनादुरुस्तीने लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या संख्येवरील ही स्थगिती २०२६ नंतरच्या पहिल्या जनगणनेपर्यंत वाढवली होती, त्यामुळे संसदेने ही स्थगिती पुढे वाढवली नाही तर २०२७ ची जनगणना पूर्ण झाल्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.
