उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या १० जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर होणारी ही पोटनिवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला ज्या राज्यांमध्ये मोठा फटका बसला आहे, त्यातीलच एक महत्त्वाचे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश होय. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या युतीने दर्जेदार कामगिरी करून भाजपाला शह देण्यात यश मिळवले आहे. या कामगिरीमुळे विरोधी पक्षांचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभेच्या दहा जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची तयारी सुरू झाली आहे. समाजवादी पार्टीबरोबर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला या दहापैकी पाच जागांवर निवडणूक लढवायची इच्छा आहे. त्यासाठी काँग्रेसने सर्व १० जागांसाठी वरिष्ठ नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय आपल्या वरिष्ठ नेत्यांसह मंगळवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीसाठी गेले होते. या बैठकीनंतर अजय राय यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हटले, “आम्हाला पाच जागी निवडणूक लढवायची इच्छा आहे. या जागा २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी जिंकल्या आहेत. सपाने मीरापूर जागेवर दावा केला आहे, कारण रालोदने त्यावेळी सपासोबत युती करून ती जागा जिंकली होती. मात्र, आम्ही किमान चार जागा लढवणार आहोत.”

हेही वाचा : लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार नाही; मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा निर्वाळा

याआधी काँग्रेस दहा मतदारसंघांपैकी किमान दोन ते तीन जागांसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती होती. आता ते अधिक जागांसाठी सौदेबाजी करत आहेत. काँग्रेस सध्या जिल्हा आणि विभागीय स्तरावर राज्यभरातील आपल्या कार्यकर्त्यांच्या कामगिरीचा आढावा घेत आहे. प्रयागराजमध्येही अशीच एक बैठक झाली आहे. इथेही विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. सोमवारी सपानेही विधानसभेच्या सहा जागांसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. “जागांबाबत आमचे मत आम्ही मांडले आहे. आता निर्णय काय घ्यायचा ते वरिष्ठ नेतृत्वाच्या हातात आहे,” असे अजय राय म्हणाले. या १० जागांसाठीच्या पोटनिवडणुकीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या १० जागांपैकी ९ जागांवरील विद्यमान आमदार लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार म्हणून निवडून संसदेत गेले आहेत, त्यामुळे त्यांच्या जागा रिकाम्या झाल्या आहेत. कानपूरमधील सिशामाऊ या मतदारसंघातील सपाच्या विद्यमान आमदारांना सध्या एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द झाली आहे.

या दहा जागांपैकी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सपाने पाच जागा, तर भाजपाने तीन जागा जिंकल्या होत्या. एक जागा सपाचा मित्रपक्ष असलेल्या निशाद पार्टीने जिंकली होती. उर्वरित मीरापूरची जागा रालोदने सपाबरोबर निवडणूक लढवत जिंकली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला टक्कर देण्यात यशस्वी ठरलेल्या सपा आणि काँग्रेसकडून आता अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. राय म्हणाले की, ऑगस्टपर्यंत राज्यव्यापी आढावा पूर्ण करण्याची पक्षाची योजना आहे. “आमचा हेतू अगदी स्पष्ट आहे. एक महिना चाललेल्या या अभ्यासाच्या आधारे संघटनात्मक फेरबदल होणार आहेत. ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे त्यांना पदोन्नती दिली जाईल, तर ज्यांनी केली नाही त्यांच्याऐवजी इतरांना संधी दिली जाईल.”

हेही वाचा : योजनेवर टीका करणाऱ्या सत्ताधारी आमदारांना तंबी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कानउघाडणी

काँग्रेसने १० विधानसभा जागांसाठी निरीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अमेठीचे विद्यमान खासदार के. एल. शर्मा यांचा समावेश आहे. त्यांना सिसामाऊ विधानसभा जागेसाठी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मीरापूर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक इम्रान मसूद; कुंदरकीसाठी राकेश राठोड; आणि गाझियाबादसाठी तनुज पुनिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सपामधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले प्रयागराजचे खासदार उज्ज्वल रमण सिंह यांच्याकडे फुलपूर विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय काँग्रेसचे विद्यमान आमदार वीरेंद्र चौधरी यांच्याकडे २०२२ मध्ये निशाद पक्षाने जिंकलेल्या मांझवान विधानसभा जागेची जबाबदारी आहे. आंबेडकरनगर या बसपाच्या बालेकिल्ल्यात असलेल्या काटेहरी विधानसभा जागेसाठी काँग्रेसने बसपाचे माजी नेते आणि मंत्री नसीमुद्दीन सिद्दीकी यांना निरीक्षक बनवले आहे. माजी आमदार अखिलेश प्रताप सिंह आणि राजकुमार रावार यांना अनुक्रमे मिल्कीपूर आणि खैर राखीव जागांची जबाबदारी देण्यात आली आहे. सपाप्रमुख अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश केल्यामुळे रिक्त झालेल्या करहल मतदारसंघासाठी काँग्रेसने रामनाथ सिकरवार यांना निरीक्षक बनवले आहे. सिकरवार यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत फतेहपूर सिक्री येथून भाजपाच्या विद्यमान खासदाराला कडवी टक्कर दिली होती. त्यांना सुमारे ४० हजार मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला.