CM Yogi Adityanath: जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर रोजी पहिला टप्पा पार पडला. आता २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी दुसरा व तिसरा टप्पा पार पडणार आहे. तर हरियाणामध्ये ५ ऑक्टोबर रोजी सर्व ९० विधानसभेसाठी मतदान होईल. भाजपाने हरियाणातील सत्ता राखणे आणि जम्म-काश्मीर जिंकण्यासाठी जंगजंग पछाडले आहे. हरियाणात विजय मिजय मिळविण्यासाठी काँग्रेसने शेजारच्या उत्तर प्रदेश राज्यातील नेत्यांची फौज उतरवली असल्याचे दिसत आहे. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे हिंदू फायरब्रँड नेते अशी ओळख असलेल्या योगी आदित्यनाथ यांना मात्र भाजपाने प्रचारासाठी पाचारण केलेले नाही. दोन्ही राज्यात प्रचार करण्यासाठी भाजपाने योगी आदित्यनाथ यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही.

तसेच जम्मू-काश्मीरमध्येही योगी आदित्यनाथ यांना प्रचारासाठी निमंत्रित करण्यात आलेले नाही. जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंची संख्या असूनही योगी आदित्यनाथ यांना प्रचारापासून दूर ठेवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर भाजपामधील काही नेत्यांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता मुख्यमंत्र्याना सध्या राज्यातच राहण्याची गरज आहे. त्यामुळे ते राज्याबाहेरील प्रचारात सहभागी झाले नसल्याचे सांगितले जात आहे.

उत्तर प्रदेशमध्येही योगी आदित्यनाथांना विरोध

द इंडियन एक्सप्रेसच्या सहयोगी संपादक नीरजा चौधरी यांनी उत्तर प्रदेशमधील राजकीय स्थितीबद्दल मध्यंतरी एक लेख लिहिला होता. उत्तर प्रदेश ही भाजपाची अंतर्गत युद्धाची भूमी झाली असल्याचे ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी यानिमित्ताने म्हटले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता चार महिन्याहून अधिकचा काळ लोटला आहे. तरीही उत्तर प्रदेशमधील वादाचा धुरळा जमिनीवर बसलेला नाही. उत्तर प्रदेशमध्ये उपयश का आले? यावरून पक्षांतर्गतच हेवेदावे असून यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जबाबदार धरले जात आहे.

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्याविरोधाच भाजपाचा एक गट सक्रिय झाल्याचे दिसते. राज्यातील ओबीसी नेते आणि अनेक काळांपासून महत्त्वाची पदे भूषविणारे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे योगींच्या विरोधातील आघाडीचे नेतृत्व करताना दिसतात. ते म्हणाले होते की, सरकारपेक्षाही संघटना मोठी आहे. तसेच मुख्यमंत्री योगी हे नोकरशाहीवर फारच अवलंबून असतात, अशीही टीका त्यांनी केली. दुसरे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि पक्ष संघटनेचे प्रदेश अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांचाही मौर्य यांना पाठिंबा आहे.

तसेच भाजपाचे उत्तर प्रदेशमधील मित्र पक्ष जसे की, निशाद पक्षाचे संजय निशाद यांनी योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोझर राजकारणावर टीका केली आहे. अपना दल (सोनेलाल) पक्षाच्या नेत्या, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनीही ओबीसींचे प्राबल्य असलेल्या जागा दिल्या नसल्याची तक्रार केली. तर २०२२ साली केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव करणाऱ्या आणि अपना दलाच्या प्रमुख विरोधक अपना दल (के) पक्षाच्या नेत्या पल्लवी पटेल यांची योगींनी भेट घेतल्याबद्दल टीका करण्यात येत होती.

भाषेची अडचण

काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील नेते हरियाणात प्रचार करत आहेत. मात्र त्यांना स्थानिक बोली भाषेची अडचण जाणवत असल्याचे दिसते. हरियाणामध्ये हरियाणवी बोली भाषा बोलली जाते, ती समजून लोकांशी संवाद साधण्यात बाहेरील नेत्यांना काही अडचणी येत आहेत. लोकांच्या समस्या जाणून त्यावर भाष्य करण्यात बाहेरील नेते कमी पडत आहेत. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, जेव्हा लोकांमध्ये जाऊन बोलू लागतो. तेव्हा त्याला तेथील लोक पहिला प्रश्न विचारतात की तुम्ही राज्याबाहेरचे आहात ना?

Story img Loader