UP Election 2027 Congress Strategy : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने बाकी असताना काँग्रेसने राज्यात मोठे संघटनात्मक फेरबदल केले आहेत. पक्षाने प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षपदाची नावे जाहीर करत ‘ब्राह्मण आणि मुस्लिम’ समीकरणाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आमदार आराधना मिश्रा मोना यांची उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्याच वेळी सहारणपूरचे खासदार इमरान मसूद यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या नव्या नेतृत्वरचनेत ब्राह्मण आणि मुस्लिम चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यासोबतच ओबीसी आणि दलित समाजालाही संघटनेत प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

आराधना मिश्रा ‘मोना’ या उत्तर प्रदेशातील रामपूर खास मतदारसंघाच्या तीन वेळा आमदार राहिल्या आहेत. त्या राज्यातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या होत्या. राज्यसभा खासदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांच्या त्या कन्या आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांची जागा घेतली आहे. ऑगस्ट २०२३ पासून अजय राय हे प्रदेशाध्यक्ष होते.

आराधना मिश्रा यांच्या जागी चौधरी वीरेंद्र सिंह यांची उत्तर प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय देविंदर निषाद आणि आलोक प्रसाद यांची पक्षाच्या राज्य युनिटच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नव्या संघटनात्मक रचनेत विविध समाजातील नेत्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न दिसून येतो.

ब्राह्मण समाजातील आराधना मिश्रा, मुस्लिम समाजातील इमरान मसूद, तर ओबीसी समाजातील देविंदर निषाद आणि दलित समाजातील प्रसाद असे संतुलित सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. काँग्रेसची ही रचना ‘इंडिया’ आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या ‘पीडीए’ म्हणजेच पिछडा, दलित आणि अल्पसंख्याक या सामाजिक समीकरणाशी मिळतीजुळती आहे.

दरम्यान, राज्याचे मावळते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी ‘एक्स’वर पोस्ट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने एका सामान्य कार्यकर्त्यावर उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याबद्दल आपण आयुष्यभर कृतज्ञ राहू, असे त्यांनी म्हटले. मात्र, पक्षाची लढाई अजून संपलेली नाही, असे नमूद करीत ते पुढे म्हणाले की, ‘नवनियुक्त प्रदेशाध्यक्षांसह पक्षाच्या सर्व नव्या पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा! आपण लढू, आपण जिंकू!’

आराधना मिश्रा यांची निवड का महत्त्वाची?

आराधना मिश्रा या प्रतापगडच्या रामपूर खास मतदारसंघातून तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांच्याकडे आता काँग्रेसच्या उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पक्षातील त्यांचे वाढते राजकीय महत्त्व अधोरेखित होते. आराधना मिश्रा यांची नियुक्ती केवळ एक महिला नेत्या म्हणून महत्त्वाची ठरत नाही, तर काँग्रेसने तब्बल १५ वर्षांनंतर उत्तर प्रदेशात एका ब्राह्मण महिला नेत्याकडे राज्य संघटनेचे नेतृत्व दिले आहे. यापूर्वी २००७ ते २०१२ या काळात रिटा बहुगुणा जोशी उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. सध्या त्या भाजपामध्ये आहेत.

आराधना मिश्रा या उत्तर प्रदेशच्या प्रस्थापित राजकीय कुटुंबातून येतात. असे असले तरी त्यांनी स्वतःचा राजकीय प्रवास तळागाळापासून सुरू केला. एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्थानिक राजकारणात प्रवेश केला. ब्लॉक पातळीवरील निवडणूक लढवीत त्यांनी राजकारणात प्रवेश केला, त्यांनी ब्लॉक प्रमुख म्हणून काम पाहिले. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशच्या रामपूर खास मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. पहिल्यांदाच उभे राहत त्यांनी या मतदारसंघात विजयही मिळवला.

पुढे २०१७ मध्ये त्यांनी ही जागा कायम राखली आणि २०२२ मध्येही सलग तिसऱ्यांदा या जागेवर विजय मिळवीत त्यांनी आपली पकड मजबूत केली. सलग तीन निवडणुकांमधील या विजयामुळे आराधना मिश्रा यांनी वडील प्रमोद तिवारी यांच्या राजकीय वारशापलीकडे स्वतःचा स्वतंत्र राजकीय आधार तयार केला आहे.

आराधना मिश्रा या उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या प्रचारातही सातत्याने सक्रिय राहिल्या आहेत. प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने उत्तर प्रदेशात केलेल्या प्रचारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी प्रियांका गांधींसोबत राज्यातील विविध भागांचा दौरा केला. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या ‘लड़की हूं, लड़ सकती हूं’ या मोहिमेतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

आराधना मिश्रा या स्वत:ची ओळख तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून करून देतात. सामाजिक आणि ग्रामीण विकासाच्या कामाशी त्यांचा दीर्घकाळ संबंध राहिला आहे. त्यांनी सहकार क्षेत्र, ग्रामीण विकास आणि महिलांच्या स्वयंसहायता गटांसोबत काम केले आहे. त्या दोन दशकांहून अधिक काळ त्या सामाजिक कार्यातही सक्रिय राहिल्या आहेत.

इमरान मसूद यांचे पुनरागमन

सहारणपूरचे खासदार इमरान मसूद यांना कार्यकारी अध्यक्षपद देऊन काँग्रेसने पश्चिम उत्तर प्रदेशातील जुन्या नेतृत्वाला पुन्हा संधी दिली आहे. मसूद यांचे राजकारण पश्चिम उत्तर प्रदेशापुरते मर्यादित राहिलेले नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले होते. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती, ज्यामुळे त्यांना कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागले होते.

असे असतानाही मसूद निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय राहिले. काही काळ त्यांनी समाजवादी पक्षात काम केले. त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सहारणपूर मतदारसंघातून विजय मिळवला. आता काँग्रेसने त्यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळविण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांच्या नियुक्तीकडे पाहिले जात आहे.

ब्राह्मण-मुस्लिम समीकरणाचा नवा प्रयोग?

काँग्रेसमध्ये आराधना मिश्रा आणि इमरान मसूद यांच्या नियुक्तीकडे पक्षातील नव्या सामाजिक समीकरणाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. आराधना मिश्रा यांच्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील चेहऱ्याला, तर इमरान मसूद यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील चेहऱ्याला पक्षसंघटनेत स्थान मिळाले आहे. काँग्रेस संघटनेतील या दोन्ही नियुक्त्यांकडे पक्षामधील ‘ब्राह्मण आणि मुस्लिम’ या नव्या सामाजिक समीकरणाची नांदी म्हणून पाहिले जात आहे.

मसूद यांच्या नियुक्तीचा काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या संभाव्य युतीच्या चर्चांवरही परिणाम होऊ शकतो. कारण- सहारणपूरच्या या खासदाराने गेल्या काही दिवसांत सपावर सातत्याने निशाणा साधला आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र कधी आणि कोणत्या पद्धतीने काम करावे, याबाबत मसूद यांनीही उघडपणे भूमिका मांडली आहे.

दुसरीकडे आराधना मिश्रा आणि तिवारी कुटुंबाचे समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाशी सलोख्याचे संबंध असल्याचे मानले जाते. त्यामुळे काँग्रेसमधील काही नेत्यांच्या मते, पक्षाच्या नव्या नेतृत्वरचनेचा फायदा दोन पातळ्यांवर होऊ शकतो. एकीकडे काँग्रेसला सामाजिक आधार अधिक व्यापक करता येणार आहे; तर दुसरीकडे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाच्या (सपा) नेतृत्वाशी जागावाटपावर (Seat-sharing) सक्षमपणे वाटाघाटी करता येणार आहेत.

‘पीडीए’च्या धर्तीवर सामाजिक विस्तार

काँग्रेसमध्ये उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून दलित समाजातील राजेंद्र पाल गौतम आधीपासूनच काम पाहत आहेत. आता शुक्रवारी पक्षाने वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी दलित समाजातील आलोक प्रसाद आणि निषाद समाजातील ओबीसी नेते देविंदर निषाद यांची नियुक्ती केली. देविंदर निषाद हे काँग्रेसच्या मच्छीमार विभागाचे अध्यक्ष आहेत; तर आलोक प्रसाद यांनी यापूर्वी पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्षपद सांभाळले आहे. ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघातून आहेत.

समाजवादी पक्षाच्या ‘पीडीए’ म्हणजेच पिछडा, दलित आणि अल्पसंख्याक या सामाजिक समीकरणाशी साधर्म्य साधणारी ही रचना काँग्रेससाठी आता प्रत्यक्ष संघटनात्मक विस्ताराचे आव्हान घेऊन आली आहे. विविध समाजांना नेतृत्वात प्रतिनिधित्व देण्यापासून ते हे प्रतिनिधित्व गाव पातळीवर पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी कितपत उपयोगी ठरते, यावर काँग्रेसच्या नव्या राज्य नेतृत्वाची पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे.