उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातील खटौली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपाला दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मतदारसंघात एकीकडे राष्ट्रीय लोक दलाकडून कडवी टक्कर दिली जात असताना भाजपाला दिवंगत गौरव सिंग या तरुणाच्या कुटुंबियांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये या जाट युवकाची भावासह कवल गावात हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर मुझफ्फरनगरमध्ये मोठी दंगल उसळली होती. या दंगलीत ६२ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ५० हजारांपेक्षा जास्त लोक विस्थापित झाले होते.
मालधारी समाजाकडून भाजपाला मतदान न करण्याचा निर्धार, गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाची चिंता वाढली?
गौरवचे वडील रविंद्र सिंग यांनी अनेक निवडणुकांमध्ये भाजपासाठी प्रचार केला होता. मात्र, दंगलींनंतर आता याच मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सुरेश्वती भाजपाविरोधात अपक्ष निवडणूक लढवत आहेत. कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करत ५६ वर्षीय सुरेश्वती पती आणि नातेवाईकांसोबत घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. “जेव्हा गावाचा विकास होईल आणि भाजपाने आमच्या मुलाच्या मृत्यूनंतर दिलेली वचनं पूर्णत्वास येतील, तेव्हाच आम्हाला न्याय मिळेल”, अशी प्रतिक्रिया रविंद्र सिंग यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली आहे. “या मतदारसंघातून भाजपा उमेदवार राजकुमारी सैनी यांचा पराभव झाला पाहिजे. तेव्हाच आमच्याशी विश्वासघात करणाऱ्या भाजपा नेत्यांची डोळे उघडतील”, असा संताप सिंग यांनी व्यक्त केला आहे.
“मुलाच्या हत्येनंतर अनेक भाजपा नेत्यांनी घरी भेट दिली होती. मुलाला न्याय देण्याच्या कायदेशीर लढाईत आर्थिक साहाय्य करण्याचं आश्वासन या नेत्यांकडून देण्यात आलं होत. त्याचबरोबर गावातील रस्त्यांचा विकास आणि कुटुंबातील सदस्याला शस्त्र परवाना देण्याचं वचनही या नेत्यांनी दिलं होतं. मात्र, त्यातील एकही आश्वासन आजपर्यंत पूर्ण झालं नाही”, असा आरोप सिंग यांनी केला आहे.
“आम्ही आठ वर्ष वाट पाहिली. मात्र सत्तेत आल्यावर भाजपा नेत्यांनी आम्हाला मदत केली नाही. पोटनिवडणुकीसाठी तिकीट देण्याची माझी मागणीदेखील फेटाळण्यात आली. त्यामुळे आम्ही आता अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यावर एक खटला प्रलंबित असल्यानं माझी पत्नी ही निवडणूक लढवत आहे”, असं सिंग यांनी सांगितले. मुझफ्फरनगर दंगलीशी संबंधित एका प्रकरणात दोषी ठरल्यानंतर भाजपाचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सैनी यांना अपात्र ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर खटौलीची जागा रिक्त झाली आहे. त्यांच्या पत्नी राजकुमारी सैनी ही निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून आरजेडीने गुज्जर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मदन भैया यांना उमेदवारी दिली आहे. माजी आमदार असलेल्या मदन भैयांना समाजवादी पक्षानेदेखील पाठिंबा दिला आहे. येत्या ५ डिसेंबरला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.