मुंबई : लोकसभा निवडणुकीचा सत्ताधारी महायुतीच्या विरोधातील कौल तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या अखेरच्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत आपापल्या आमदारांची मते फुटू नयेत याचे सर्वच राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान आहे. विशेषत: शिंदे गट आणि अजित पवार गटाला आपापले आमदार सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे.

विधान परिषदेच्या एक तृतीयांश म्हणजेच २७ जागा रिक्त असताना विधानसभेतून निवडून द्यायच्या ११ जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. विद्यमान विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी विधान परिषदेची ही अखेरची निवडणूक असेल. लोकसभा निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडखोर आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा मूळ राष्ट्रवादी वा शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा…पवार विरुद्ध पवार! आपल्याच काकांना शह देणाऱ्या कोणत्या पुतण्याचे राजकारण ठरणार यशस्वी?

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीला १५० पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघांतून आघाडी मिळाली. शिवसेना शिंदे गटाची कामगिरी तुलनेत बरी असली तरी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा पार धुव्वा उडाला. यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये चुळबूळ सुरू झाली आहे. अजित पवारांबरोबर गेलेले १० ते १५ आमदार संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या साऱ्या घडामोडींमुळेच अजित पवार गटाने आपल्या आमदारांची बैठक बोलावून खुंटा बळकट करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, शिंदे गटाच्या आमदारांमध्येही त्यांच्या भवितव्याबद्दल चिंता आहे.

विधान परिषदेसाठी गुप्त मतदान असते. विधानसभेसाठी आपली उमेदवारी पक्की करण्याकरिता बंडाच्या पवित्र्यात असलेले आमदार पक्षाच्या विरोधात मतदान करू शकतात. याचा खरा धोका हा अजित पवार गट आणि शिंदे गटाला अधिक आहे. दोन्ही पक्षातील कुंपणावरील आमदार विरोधात मतदान करू शकतात. याबरोबरच काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न महायुतीकडून होऊ शकतात. यामुळेच भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे व शिंदे गट, राष्ट्रवादीतील शरद पवार आणि अजित पवार गट यापैकी कोणत्याही पक्षांचे आमदार विरोधी मतदान करू शकतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही अखेरची संधी असल्याने आमदार मंडळी आपले ‘हात ओले’ करून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतांची फाटाफूट किती होते यावरच महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल.

हेही वाचा…ओळख नवीन खासदारांची : भास्कर भगरे, (दिंडोरी, राष्ट्रवादी शरद पवार गट) ; सामान्य शिक्षक

महायुतीचा प्रयत्न यशस्वी होणार का ?

विधानसभेचे संख्याबळ घटल्याने निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांच्या कोट्यात घट झाली आहे. भाजपचा पाच जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न असेल. शिवसेना शिंदे गट दोन तर अजित पवार गटही प्रत्येकी दोन जागांसाठी प्रयत्नशील आहेत. याचाच अर्थ महायुती ९ जागांसाठी प्रयत्न करण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. पण दोघांची मते एकत्र केल्यास एक उमेदवार निवडून येऊ शकतो. शेकापचे जयंत पाटील हे नेहमीच पुरेशी मते नसतानाही निवडून येण्याचा ‘चमत्कार’ करतात. यंदा ते चमत्कार करणार का, याचीही उत्सुकता आहे.

१४ जागा रिक्त, कोटा कमी

विधानसभेच्या १४ जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी १० जागा या आमदारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त आहेत. चार जागा या आमदारांच्या निधनाने रिक्त आहेत. परिणामी २७४ सदस्यांमधून ११ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. जागा कमी झाल्याने निवडून येण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या २३ मतांची आवश्यकता असेल.

हेही वाचा…हातकणंगलेत मुख्यमंत्री शिंदे यशाचे किमयागार

निवृत्त होणारे ११ आमदार पुढीलप्रमाणे :

विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), महादेव जानकर (भाजप मित्र पक्ष), अनिल परब (शिवसेना ठाकरे गट), मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट), डॉ. वजाहत मिर्झा व डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), बाबाजानी दुराणी (राष्ट्रवादी), जयंत पाटील (शेकाप).