अलिबाग– कोकण पदवीधर मतदारसंघासाठी २६ जूनला मतदान होणार आहे. निवडणुकीचा प्रचार करताना सर्वच उमेदवारांचा कस लागत असल्याचे दिसून येत आहे. विस्तीर्ण मतदारसंघाचे विस्तीर्ण क्षेत्र आणि विखुरलेले मतदार यामुळे मतदारांपर्यंत पोहोचणे आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रप्रपंचाचा आधार घेतला जात आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र प्रमुख लढत ही भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात होणे अपेक्षित आहे. या मतदारसंघात पालघर, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्‍ह्यांचा समावेश आहे. यंदा मतदारसंघासाठी सुमारे २ लाख २३ हजार २२२ मतदारांची नोंदणी झाली आहे. गेल्या वेळेसच्या तुलनेत यंदा १ लाख २० हजार अधिक मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे २ लाख २३ हजार मतदारांपर्यंत पोहोचणे सर्वच उमेदवारांसाठी आव्हानात्मक ठरले आहे.

हेही वाचा – पालकमंत्री खाडे यांच्या विरोधात त्यांच्या निकटवर्तीयाचाच उमेदवारीचा दावा

मतदारसंघाचे विस्तीर्ण क्षेत्र आणि विखुरलेले मतदार यामुळे सर्वच मतदारांपर्यंत पोहोचणे आव्हानात्मक ठरले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणे प्रत्येक गावात जाऊन प्रचार करणे अशक्य असल्याने उमेदवारांनी पत्राद्वारे मतदारांशी संवाद साधण्याचे प्रयत्न केले आहेत. निरंजन डावखरे यांनी प्रचाराच्या सुरवातीच्या टप्प्यात सहा वर्षांतील कार्य अहवाल प्रत्येक मतदाराला पोस्टाने पाठवला. यानंतर शेवटच्या टप्प्यात पत्राद्वारे पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन केले.

काँग्रेसचे रमेश कीर यांनीही पोस्टाच्या माध्यमातून मतदारांशी थेट पत्रव्यवहार केला. कोकण आणि कोकण हितासाठी आजवर काम करत आलो आहे. यापुढेही काम करण्याची संधी द्या अशी साद घातली आहे. शिक्षक, पदवीधर आणि बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करीन अशी ग्वाही त्यांनी या माध्यमातून दिली आहे.

हेही वाचा – मुंबई पदवीधरमध्ये चुरशीची लढत

दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या या पत्रप्रपांचामुळे पोस्टाचे काम वाढले आहे. पदवीधर मतदारांचे पत्ते शोधून पत्र पोहोचवण्याचे काम पोस्टमन करत आहेत. या निमित्ताने त्यांच्या कामावरचा ताणही काहीसा वाढला आहे. ईमेल, व्हॉट्सअ‍ॅपच्या, फेसबुक, ट्विटरच्या जमान्यात, पत्रव्यवहाराचा वापर आणि महत्व खूपच कमी झाले आहे. मात्र पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सर्वात विश्वासार्ह माध्यम असे महत्व आले आहे. त्यामुळे दोन्ही पत्रव्यवहारांना पसंती दिल्याचे या निमित्ताने पहायला मिळत आहे.

जिल्हानिहाय मतदारांची आकडेवारी

जिल्हा मतदार २०२४

पालघर – २८ हजार ९२५

ठाणे – ९८ हजार ८६०

रायगड – ५४ हजार २०८

रत्नागिरी – २२ हजार ६८१

सिंधुदुर्ग – १८ हजार ५४८