scorecardresearch

Uttar Pradesh : ‘बसपा’ला जनाधार मिळवून देण्यासाठी मायवतींचं नवं समीकरण ; कुशवाहा, राजभर यांच्यानंतर आता पाल बनले नवे प्रदेशाध्यक्ष

जाणून घ्या, विश्वनाथ पाल यांना प्रदेशाध्यक्षं बनवण्यामागे मायावतींचा काय आहे हेतू?

Mayawati new
(संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेशात मागील दहा वर्षांत सर्वात जास्तप्रमाणात जनाधार कोणत्या पक्षाने गमावला असेल, तर तो म्हणजे बहुजन समाज पार्टी(बसपा) आहे. याशिवाय मागील काही वर्षांत बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी त्यांच्या पक्षाच्या नेृत्वात अनेकदा बदल केल्याचेही दिसून आले आहे. त्यांनी चार वर्षांत चारवेळा बसपाच्या उत्तर प्रदेश युनिटचे अध्यक्ष आणि तीन वर्षांत पाचवेळा लोकसभेतील बसपा नेते बदलले आहेत. विशेष म्हणजे ज्या पक्षाने २००७ मध्ये स्वबळावर उत्तर प्रदेशात बहुमातचे सरकार बनवले होते, त्या पक्षाला २०१२ नंतर अशी उतरती कळा लागली की आता २०२२ मध्ये केवळ एकच आमदारासह हा पक्ष विधानसभेत दिसत आहे.

मायावतींनी पक्षाला वर आणण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले, मात्र दरवेळी त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे दिसून आले. सातत्याने होणाऱ्या पराभवामुळे पक्षातील नेतेही पक्षापासून दूर गेले आहेत. आता मायावतींनी आपला १५ वर्ष जुना दलित, मुस्लीम, ब्राह्मण हा सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला सोडला आहे. त्या आता पुन्हा दलित, मुस्लीम ऐक्याचं राजकारण करताना दिसत आहेत. याशिवाय त्यांची ओबीसी वर्गावरही नजर आहे. हेच कारण आहे की राम अचल राजभर, आरएस कुशवाह यांच्यानंतर त्यांनी भीम राजभर यांना प्रदेशाध्यक्ष बनवले. मात्र ओबीसी वर्गातील जातींना जोडण्यात त्यांना फार काही यश आले नाही. मात्र मायावतींनी अपेक्षा सोडलेली नाही. याच दरम्यान पक्षाचे जुने नेते अयोध्येतील विश्वनाथ पाल यांना बसपाचे नवीन प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेशात ओबीसींची ५० टक्क्यांहून जास्त मतदार संख्या आहे. राज्यात ७९ ओबीसी जाती आहेत, यामध्ये यादवेतर जातींची मतांची टक्केवारी ४० टक्के आहे. भाजपापासून सपा आणि बसपा सर्वच पक्षांची नजर या मतांवर आहे. आता मायावतींनी विश्वनाथ पाल यांना प्रदेशाध्यक्ष बनवून याच ४० टक्के मतांवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

मायावतींनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे की, “विश्वनाथ पाल, बसपाचे जुने, मिशनरी कर्मठ व प्रमाणिक कार्यकर्ते आहेत. मला पूर्णपणे विश्वास आहे की, ते विशेषता अतिमागास जातींनी बसपाशी जोडून, पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी जीवतोड काम करून, त्यामध्ये यशस्वी होतील.”

राजकीय अभ्यासकांच्या मते, मायावतींनी विश्वनाथ पाल यांची निवड करून हे स्पष्ट केले की, राजभर मतपेटी पेक्षा आता पक्षाने पाल मतपेटीवर लक्ष केंद्रीत केले आहे. तसं पाहीलं तर राजभर मतपेटीचा कल हा परंपरागत बसपाकडे राहिलेला आहे. ओमप्रकाश प्रकाश राजभर हेही बसपाचे नेते होते. २०१७ मध्ये भाजपाने या मतपेटीवर लक्ष केंद्रीत केले आणि सुभासपासह आघाडी केली. ओम प्रकार राजभर योगी सरकारमध्ये मंत्रीही झाले, परंतु याचसोबत भाजपाने आपल्याकडेही या समजाच्या नेत्यांची जुळवाजुळव सुरू केली. यंदाच्या विधनासभा निवडणुकीत ओम प्रकाश राजभर यांच्या सुभासपाने समाजवादी पार्टीसोबत आघाडी केली आणि त्यांचा थेट सामना भाजपाशी झाला. या संपूर्ण राजकारणात बसपा कुठेच दिसली नाही. एवढंच काय प्रदेशाध्यक्ष भीम राजभर आपल्या गृहजिल्ह्यातील मऊ इथे तिसऱ्या क्रमांकावर राहीले. जिथे मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बास अन्सारीने सुभासपाच्या तिकीटावर विजय मिळवला. या अगोदर मुख्तारही बसपामध्ये होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-12-2022 at 15:51 IST

संबंधित बातम्या