scorecardresearch

वडील आणि मुलगा दोघांचीही आमदारकी गेली; आझम खान आणि अब्दुल्ला खानच्या मतदारसंघावर भाजपाचा झेंडा?

उत्तर प्रदेश राज्यातील रामपूर जिल्ह्यात मागच्या चार वर्षात सहावेळा निवडणुका होत आहेत. आधी आझम खान आणि आता त्यांचा मुलगा अब्दुल्ला खान यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

Samajwadi party leader azam khan abdullah khan
समाजवादी पार्टीचे नेते आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला खान

उत्तर प्रदेश राज्यात १० मे रोजी दोन विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक संपन्न होत आहे. माजी मंत्री आझम खान यांचे पुत्र अब्दुल्ला आझम खान हे रामपूर जिल्ह्यातील सार विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. मात्र त्यांची आमदारकी रद्द झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. १५ वर्षांपूर्वी घडलेल्या एका गुन्ह्यात नाव गुंतल्यानंतर अब्दुल्ला खान यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, या शिक्षेनंतर अब्दुल्ला खान यांची आमदारकी अपात्र ठरविण्यात आली. सध्या राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर हा विषय आणखी चर्चेत आला. विशेष म्हणजे ज्या रामपूर जिल्ह्यात ही पोटनिवडणूक होत आहे, त्या जिल्ह्यात मागच्या चार वर्षांत तब्बल सहा वेळा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक संपन्न झाली आहे.

रामपूर जिल्ह्यातील सारव्यतिरिक्त मिर्झापूर जिल्ह्यातील छाँबे (अनुसूचित जातीसाठी राखीव) या विधानसभा मतदारसंघातील आमदार राहुल प्रकाश कोल यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिकामी झाली. अपना दल पक्षाच्या राहुल कोल यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत आघाडीत निवडणूक लढवत असताना त्यांना ४७.२९ टक्के मते मिळाली होती.

हे वाचा >> योगी आदित्यनाथांविरोधातील द्वेषपूर्ण भाषण भोवलं; आझम खानना तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

अब्दुल्ला खान यांनी २०१७ आणि २०२३ मध्ये सार विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र विशेष न्यायालयाने त्यांना २००८ मधील एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे १५ फेब्रुवारी रोजी त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर अब्दुल्ला खानची आमदारकी रद्द झाली होती. त्या वेळी आपल्या वयाबद्दलची खोटी माहिती सादर केल्याबद्दल त्याला आमदारकी गमवावी लागली होती.

अब्दुल्ला खान यांचे वडील आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनादेखील मागच्यावर्षी रामपूर सदर विधानसभा मतदारसंघातून आपली आमदारकी गमवावी लागली आहे. २०१९ साली भाषणात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली. डिसेंबर महिन्यात याठिकाणी पोटनिवडणूक होऊन सपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात भाजपाने अनपेक्षितपणे विजय मिळवला.

हे वाचा >> ८९ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटकेत असणारे आझम खान २७ महिन्यानंतर तुरुंगाबाहेर; समर्थकांनी स्वागतासाठी केली मोठी गर्दी

गतवर्षी रामपूर सदर येथे झालेल्या निवडणुकीचा निकाल पाहता या वेळी सारमध्ये होणारी निवडणूक चुरशीची होणार असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. समाजवादी पक्ष आणि भाजपा या निवडणुकीत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०२२ च्या निवडणुकीत भाजपा आणि अपना दलची आघाडी होती, त्या वेळी सार विधानसभा मतदारसंघ अपना दलच्या वाट्याला आला होता. याठिकाणी अब्दुल्ला खानने ६० हजारांचे मताधिक्य घेऊन निवडणूक जिंकली. २०१७ साली भाजपा उमेदवाराच्या विरोधात मिळालेल्या मताधिक्यापेक्षा ही संख्या सात हजारांनी अधिक होती.

रामपूर जिल्ह्यात मागच्या चार वर्षात सहा वेळा निवडणूक झाली

 • फेब्रुवारी २०१९ – लोकसभा निवडणूक
 • ऑक्टोबर २०१९ – रामपूर शहर विधानसभा पोटनिवडणूक
 • फेब्रुवारी २०२२ – विधानसभा निवडणूक
 • जून २०२२ – लोकसभा पोटनिवडणूक
 • डिसेंबर २०२२ – रामपूर शहर पोटनिवडणूक
 • मे २०२३ – सार विधानसभा पोटनिवडणूक

निवडणुकीचा कार्यक्रम अशाप्रकारे

 • पोटनिवडणुकीची अधिसूचना – १३ एप्रिल
 • उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची मुदत – २० एप्रिल
 • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – २४ एप्रिल
 • मतदान – १० मे
 • निवडणुकीचा निकाल – १३ मे

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 17:23 IST

संबंधित बातम्या