UP Election, Jantar Mantar 2.0 : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगातील अनियमिततेवरून वातावरण तापले आहे. दिल्लीत विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधातील संघर्ष तीव्र केला आहे. १० ऑक्टोबरला कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) पुकारलेल्या ‘जंतरमंतर २.०’ आंदोलनामुळे या संघर्षाला नवे वळण मिळू शकते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनीही अधिक आक्रमकपणे लावून धरली आहे. त्यातच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्याविरोधातील संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

एकीकडे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असताना भाजपाही आता पुढाकार घेण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत आंदोलन हाताळताना सरकारने यावेळी अधिक कठोर भूमिका घेतल्याचे दिसते. मुंबईत २ ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर सीजेपीने केलेले आंदोलन शांततेत पार पडले होते. मात्र, १० ऑक्टोबरपासून सीजेपीने ‘जंतरमंतर 2.0’ आंदोलन पुकारल्यानंतर सरकारने निर्बंध अधिक कडक केले. मध्य दिल्लीतील अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत, मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आणि ५७ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत; तर दिल्लीत येणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. तसेच, इतर शहरांतील नागरिकांनी दिल्लीत येणे टाळावे असे आवाहनही करण्यात आले.

मात्र, या आंदोलनांचा प्रत्यक्ष राजकारणावर किती परिणाम होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत, तर येथील मतदारांवर रस्त्यावरील या आंदोलनांचा कितपत प्रभाव पडेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकीकडे विरोधकांकडून ‘मतचोरी’च्या मुद्द्यावर आंदोलन सुरू ठेवले गेले आणि दुसरीकडे भाजपाने आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवला तर विरोधकांची मुद्द्यांची धार कमी होऊ शकते. कारण मे महिन्यात झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सत्तेत आली आणि आता पश्चिम बंगालमधील दोन पोटनिवडणुकांमध्येदेखील भाजपानेच विजय मिळवला आहे, त्यामुळे भाजपाची स्थिती मजबूत झाल्याचे दिसून येते.

भाजपाच्या मते, निवडणुकीतील विजय हाच जनमताचा खरा कौल असतो. मात्र, काँग्रेस या भूमिकेशी सहमत नाही. मतदार याद्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित होत असतील तर निवडणुकीतील विजयाला जनमताचा निर्णायक पुरावा कसे मानता येईल, असा काँग्रेसचा युक्तिवाद आहे.

उत्तर प्रदेशातच खरी कसोटी

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर आणि गुजरात या राज्यांमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, या सगळ्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष असणार आहे. कारण येथील निकालाचा राज्याच्या राजकारणापलीकडे राष्ट्रीय राजकारणावरही प्रभाव पडत असतो.

राज्य आकाराने मोठे आहे किंवा येथील समीकरणांवरूनच पंतप्रधानांचे दावेदार ठरतात. भारताला आतापर्यंत मिळालेल्या १४ पंतप्रधानांपैकी आठ जण उत्तर प्रदेशातून निवडून आले आहेत. दरम्यान, ही निवडणूक सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही महत्त्वाची असली, तरी भाजपासाठी तिचे महत्त्व अधिक आहे. केंद्रात १३ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर यंदा उत्तर प्रदेश गमावल्यास भाजपाच्या राजकीय ताकदीला धक्का बसू शकतो, त्यामुळे उत्तर प्रदेशातील लढाई ही केवळ एका राज्याची निवडणूक नसून, राष्ट्रीय राजकारणातील पुढील समीकरणांसाठी ती कसोटी ठरणार आहे.

दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात सलग तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवले, तर राष्ट्रीय राजकारणातील त्यांचे स्थान अधिक बळकट होऊ शकते. राम मंदिर दानचोरी प्रकरणामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिमा डागाळली असली तरी योगी आदित्यनाथांनी या वादापासून स्वत:ला दूर ठेवले आहे.

गेल्या काही वर्षांत योगी आदित्यनाथ यांनी देशभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे इतर राज्यांतील निवडणुकांच्या प्रचारासाठीही भाजपाची त्यांच्यावर मदार असणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही योगी आदित्यनाथ यांना पाठिंबा आहे. भागवत यांनी अनेकदा योगींचे कौतुक केले आहे. भाजपाच्या अनेक समर्थकांना योगी हे ‘हिंदू सभ्यतेचा’ अजेंडा पुढे नेणारे नेते वाटतात. मात्र, उत्तर प्रदेशात जर विरोधकांनी विजय मिळवला, तर राज्याच्या राजकारणासोबतच राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांनाही बळ मिळू शकते. अखिलेश यादव मुख्यमंत्रिपदी आल्यास समाजवादी पक्षाचा प्रभाव वाढू शकतो, तर राहुल गांधी यांच्या राजकारणालाही हिंदी भाषिक राज्यात नवी चालना मिळू शकते.

दरम्यान, उत्तर प्रदेशातून भाजपाने जाहीर केलेल्या राज्यसभा उमेदवारांच्या यादीमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. या यादीतील अनेक नावे अनुभवी राजकीय नेत्यांनाही फारशी परिचित नाहीत. पक्षाने उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या आठही विद्यमान खासदारांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे ठरवले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनाही खासदार पदावरून बाजूला व्हावे लागू शकते.

भाजपाने राज्यसभेसाठी उमेदवार निवडताना पक्षापासून दुरावलेल्या समाजघटकांना पुन्हा जवळ आणण्यावर भर दिल्याचे दिसते. आठ उमेदवारांपैकी तीन जण इतर मागासवर्गीय (OBC), तीन उच्चवर्णीय आणि दोन दलित समाजातील आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी ‘PDA’ म्हणजेच मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याक या समीकरणाच्या आधारे बिगर यादव ओबीसी मतदारांना आपल्याकडे वळवले होते. यावेळी त्यांनी या समीकरणात ‘पंडित’ समाजालाही जोडले आहे. अखिलेश यादव आपल्या पक्षाला एक आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न करत असून, कॉर्पोरेट जगाशीही संपर्क वाढवत आहेत. दुसरीकडे, वर्षानुवर्षे भाजपाचा मुख्य पाठिराखा असलेला ब्राह्मण समाज आता पक्षावर काहीसा नाराज दिसत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या काळातील ‘राजपूत राज’ची भावना, मागासवर्गीयांच्या बाजूने झुकलेले युजीसीचे (UGC) नियम आणि राम मंदिरातील दानचोरीचे प्रकरण, यामुळे ब्राम्हण समाजातील असंतोष वाढला आहे.

एकेकाळी इंदिरा गांधी यांच्या काळात ब्राह्मण, मुस्लीम आणि दलित हे काँग्रेसचे प्रमुख मतदार होते. हे समीकरण काँग्रेसला निवडणुकांमध्ये यश मिळवून देत असे. उत्तर प्रदेशात ब्राह्मण मतदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसने आराधना मिश्रा या ब्राह्मण महिला नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मात्र, संघटनात्मक कमकुवतपणामुळे काँग्रेससमोरील आव्हान मोठे आहे. शिवाय, निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या नियुक्तीमुळे पक्षाला ठोस काम करण्यासाठी फारसा वेळ मिळणार नाही, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे, त्यामुळे ब्राह्मण मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे पाहावे लागणार आहे.