पुणे : भोंदू अशोक खरात प्रकरणात वादग्रस्त ठरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागलेल्या रूपाली चाकणकर यांच्या जागी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या पदासाठी पुणे जिल्ह्याला प्राधान्य दिले असून दौंडमधील नागवडे यांना संधी दिली आहे.
खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांना या पदावरून काढण्यात आले. त्यामुळे मार्च महिन्यापासून हे पद रिक्त होते. त्या पदावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नागवडे यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी नागवडे यांना दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त होती. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या पदासाठी पुणे जिल्ह्याला प्राधान्य दिले असून दौंडमधील वैशाली नागवडे यांना संधी दिली आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्राबल्य आहे. गेल्या काही महिन्यांपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवक; तसेच जिल्हा परिषद, नगरपंचायतीमधील सदस्यांच्या बैठका घेऊन पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेत आहेत. महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यातील नागवडे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.
वैशाली नागवडे कोण?
वैशाली नागवडे या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील आहेत. त्या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या आहेत. अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर नागवडे यांनी चाकणकर यांच्यावर उघडपणे टीका केली होती. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्षपद आणि प्रदेश सरचिटणीस या पदावर काम केले आहे. २०१७ आणि २०२० मध्ये त्यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राहू-खामगाव या गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना अपयश आले. २०२० च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या पूनम दळवी यांनी त्यांचा ६९१ मतांनी पराभव केला होता.
महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्तच
रूपाली चाकणकर यांच्या राजीनामामुळे महिला आयोगाचे अध्यक्षपद अद्याप रिक्त आहे. या पदावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कोणाची निवड करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाले आहे. ….. युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
