मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलेल्या राज्यातील पुरोगामी व्यक्तींच्या घरांवर अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’च्या ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ संघटनेने ‘जवाब दो’ आंदोलनाचा सपाटा लावला आहे. या आंदोलनाविषयी आंबेडकरी चळवळीतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूरचे कवी यशवंत मनोहर, नाशिक येथील प्रा. रावसाहेब कसबे, पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांच्या घरांवर सम्यक विद्यार्थी संघटनेने आंदोलन केले. लातूरचे काँग्रेस खासदार डॉ. शिवाजी काळगे तसेच सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या राखीव मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना ‘सम्यक’च्या आंदोलनास सामोरे जावे लागले आहे.

हेही वाचा : ‘एक देश, एक निवडणूक’, राज्यावर परिणाम नाही; पालिका निवडणुकांबाबत संदिग्धता

संविधान रक्षणासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याच्या पत्रावर ८० व्यक्तींच्या सह्या होत्या. त्या पत्रकावर ज्यांच्या सह्या आहेत, त्या व्यक्तींना या आंदोलनाच्यावतीने लक्ष्य करण्यात येत आहे.

संविधान रक्षणासाठी आघाडीला मतदान करा, असे या तथाकथित पुरोगाम्यांनी पत्रक काढले होते. आता काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाने आरक्षण संपवण्याची भाषा केली. म्हणून त्यांना आम्ही सनदशीर मार्गाने जाब विचारत आहोत. – सिद्धार्थ मोकळे, ‘वंचित’चे प्रदेशाध्यक्ष

विचारवंतांच्या घरांवरील निदर्शने निषेधार्ह असली तरी अनपेक्षित नाहीत. राजकारणात वंचित पीछेहाटीवर आहे. उलटपक्षी भाजपबरोबर वाटाघाटी करण्याची त्यांची ताकद घटू लागलेली आहे. त्यामुळे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ उक्तीनुसार त्यांचे वर्तन चालू आहे. – प्रज्ञा दया पवार, कवयित्री