Priyanka Gandhi on Vande Mataram Controversy : काँग्रेसने राष्ट्रीय गीताचे तुकडे केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेतील विशेष चर्चेदरम्यान केला. जवाहरलाल नेहरू यांनी १९३७ साली मुस्लीम लीगसमोर वाकून ‘वंदे मातरम’मधील प्रमुख ओळी वगळल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. पंतप्रधान मोदींच्या या आरोपांवर काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी इतिहासातील काही घटनांचा दाखला देत प्रियंका यांनी पंतप्रधानांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारला सध्या वंदे मातरम या विषयावर चर्चा का हवी आहे, यामागची कारणेही त्यांनी सांगितली. नेमक्या काय म्हणाल्या प्रियांका गांधी? त्याविषयीचा हा आढावा…
‘वंदे मातरम’वरील चर्चेमागील उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारकडून जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका प्रियांका यांनी केली. लोकांना भूतकाळात गुंतवून ठेवून सरकारचे अपयश, सध्याच्या समस्या आणि भविष्यातील आव्हानांपासून त्यांचे लक्ष विचलित करण्याचा हा आणखी एक प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सरकारच्या हेतूवर उभे केले प्रश्नचिन्ह
पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवल्यानंतर प्रियांका गांधींनी त्यांच्या आरोपांना मुद्देसूद प्रत्युत्तर देण्यासाठी इतिहासातील काही घटनांचा आधार घेतला. ‘वंदे मातरम’ हे गीत देशाच्या आत्म्याचा भाग असून ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे. आपल्या राष्ट्रीय गीतावरून वाद कसा असू शकतो? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय गीताला वादात ओढून पाप केले आहे, अशी टीका प्रियांका यांनी केली. या चर्चेमागील केंद्र सरकारचा हेतू काय आहे यावरही त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.
वंदे मातरम विषयावर चर्चा कशासाठी? प्रियांका गांधी
पंतप्रधानांना आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट करायची असल्याने वंदे मातरमच्या विषयावरून वाद घडवून आणला जात आहे. स्वातंत्र्यलढ्याचे ज्यांनी नेतृत्व केले त्यांच्यावर आरोप करण्याची केंद्र सरकारला संधी हवी आहे. बेरोजगारी आणि महागाई यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. “आम्ही भूतकाळातच गुंतून राहावे असे केंद्र सरकारला वाटते, कारण त्यांच्याकडे वर्तमान आणि भविष्यासाठी पाहण्याची क्षमता उरलेली नाही. पंतप्रधान मोदी पूर्वीसारखे राहिलेले नाहीत; त्यांचा आत्मविश्वास ढासळत आहे आणि त्यांच्या धोरणांमुळे देश कमकुवत होत आहे. सरकारमधील माझे मित्र शांत आहेत, कारण त्यांनाही ही गोष्ट आतून माहीत आहे,” असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आरोप
“वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला संविधान सभेने मान्यता दिली होती. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, आचार्य नरेंद्र देव, सरदार पटेल, रवींद्रनाथ टागोर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या दिग्गजांचे या गीताला समर्थन होते. पंतप्रधानांनी राष्ट्रीय गीताच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पंतप्रधानांनी या महान पुरुषांचा अपमान केला आहे. संविधान सभेचे सदस्य असलेल्या महान नेत्यांना त्यांनी कमी लेखून आपली संविधानविरोधी वृत्तीच दाखवली आहे,” असा आरोपही प्रियांका गांधी यांनी केला.
‘नेहरूंवर चर्चा करा आणि विषय संपवा’
पंतप्रधान मोदी यांनी संसदेतील आपल्या भाषणातून जवाहरलाल नेहरू यांना लक्ष्य केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना, सरकारने नेहरूंवरील सर्व आरोपांची यादी प्रसिद्ध करावी आणि संसदेत त्यावर चर्चा करून हा विषय कायमचा निकाली काढावा, असा सल्ला प्रियांका यांनी दिला. जनतेने आम्हाला या सभागृहात त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठवले आहे. त्यामुळे संसदेतील चर्चेचा वेळ फक्त त्यासाठीच वापरला गेला पाहिजे. सध्या जशी वंदे मातरम या विषयावर चर्चा होत आहे, तशीच इंदिरांनी काय केले, राजीव यांनी काय केले… घराणेशाही काय आहे… नेहरूंनी कोणत्या चुका केल्या, या विषयांवर एकदा चर्चा होऊन द्या आणि नंतरच आपण बेरोजगारी, महागाई, महिलांच्या समस्या यावर चर्चा करूया,” असा टोलाही प्रियांका यांनी लगावला.
हेही वाचा : भाजप-शिंदे वादात रवींद्र चव्हाण नरमले…आता लक्ष गणेश नाईकांकडे?
नेहरू टागोर यांच्या पत्राचा दिला दाखला
नेहरू आणि नेताजी बोस यांच्या तसेच, नेहरू व रवींद्रनाथ टागोर यांच्यामधील पत्रव्यवहारातील संबंधित उतारे प्रियांका यांनी वाचून दाखवले. ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत म्हणून निवडण्यामागील घटनांचा कालक्रम समजून घेतला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. मोदींनी नेहरूंच्या २० ऑक्टोबर १९३७च्या पत्राचा उल्लेख केला होता. त्यासंदर्भात प्रियंका म्हणाल्या की, नेहरूंनी नेताजींना लिहिलेल्या पत्राच्या तीन दिवस आधी नेताजींनी नेहरूंना पत्र लिहून ‘वंदे मातरम’वर काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये चर्चा करण्याची गरज व्यक्त केली होती. पण, त्याचा उल्लेख तुमच्या पंतप्रधानांनी उल्लेख केला नाही. नेहरूंच्या सगळ्या विधानांचा मोदींनी उल्लेख केला नाही. नेहरू पत्रात म्हणाले होते की, यात काही शंका नाही की ‘वंदे मातरम’ विरुद्धचा सध्याचा आक्रोश हा मुख्यत्वे जातीयवाद्यांनी निर्माण केलेला आहे. या नेहरूंच्या विधानावर मोदी गप्प का आहेत हे तुम्हाला (भाजपला) समजले असेलच.
गुरुदेव टागोर यांचा पत्राचाही केला उल्लेख
गुरुदेव टागोरांच्या पत्राचाही प्रियंका यांनी यावेळी उल्लेख केला. गुरुदेव म्हणतात की नेहमी गायली जाणारी दोन कडवी इतकी गहन आहे की त्यांना उर्वरित कवितेपासून व पुस्तकातील त्या उताऱ्यांपासून ही कडवी वेगळी करण्यात कोणतीही अडचण आली नाही. स्वातंत्र्यलढ्यादरम्यान नेहमीच हीच दोन कडवी गायली जात होती. ते गाताना आपले प्राण अर्पण करणाऱ्या शेकडो शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी हे गाणे योग्य ठरेल. नंतर जोडलेल्या कडव्यांचा ‘सांप्रदायिक’ म्हणून अर्थ लावले जाऊ शकतात आणि सध्याच्या परिस्थितीत ते वापरणे अयोग्य ठरेल, असे टागोरांनी सांगितले होते. हाही मुद्दा मोदी विसरले, असा टोमणा प्रियांका यांनी मारला.
