जम्मू-काश्मीरमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या सर्व सहा कडव्यांचे गायन करण्यात आल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटले. या मुद्द्यावरून काँग्रेस आणि त्यांचा मित्रपक्ष असलेल्या सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्समध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले. श्रीनगरमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. यावरून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी नॅशनल कॉन्फरन्सला लक्ष्य करताना आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या शहाणपणाचा आणि निर्णयाचा आदर करण्याचा सल्ला दिला. तसेच इंडिया आघाडीतील इतर घटकपक्षांनीही ‘वंदे मातरम्’ गीताची केवळ पहिली दोन कडवीच गायला हवी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

काँग्रेस नेत्याने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले?

वेणुगोपाल यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समधील मतभेद आणखीनच तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष बाब म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचे सरकार असूनही ‘वंदे मातरम्’ गायनाचा मुद्द्यावरून दोन्ही पक्षांची वेगवेगळी भूमिका असल्याचे दिसून येते. सोमवारी झालेल्या चित्रपट महोत्सवातील उद्घाटन सोहळ्यातील व्हिडीओ शेअर करत वेणुगोपाल म्हणाले की, ‘वंदे मातरम्’ची संपूर्ण कडवी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी कल्पिलेल्या आणि जोपासलेल्या समन्वयवादी व बहुविधतावादी विचारसरणीशी सुसंगत नाही. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. राजेंद्र प्रसाद, आचार्य नरेंद्र देव, मौलाना आझाद, सरोजिनी नायडू आणि जे. बी. कृपलानी यांचा विचारपूर्वक घेतलेला निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च आहे. या निर्णयावर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या मार्गदर्शनाचाही मोठा प्रभाव होता, असेही त्यांनी नमूद केले.

काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्सला काय सल्ला दिला?

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसचा निवडणूकपूर्व मित्रपक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सला आवाहन करताना वेणुगोपाल पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिकांनी वंदे मातरम् संदर्भात घेतलेल्या विचारपूर्वक भूमिकेचे आपण पालन करायला हवे. आम्ही अत्यंत आदर आणि नम्रतेने आमच्या मित्रपक्षांना विनंती करतो की, त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या शहाणपणाचा व निर्णयाचा मान राखावा आणि त्यांनी स्वीकारलेल्या या सुंदर व ऐतिहासिक गीताच्या पहिल्या दोन कडव्यांचे गायन करण्यासाठी आमच्यासोबत उभे राहावे. या गीताचे सांप्रदायीकरण होऊ नये, म्हणूनच विचारपूर्वक केवळ पहिली दोनच कडवी निवडली गेली होती. हा धोका जसा त्यावेळी होता, तितकाच आजही आहे. या निर्णयाचे पालन करणे म्हणजेच आपल्या प्रजासत्ताकाचे धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक स्वरूप टिकवून ठेवणे होय, असेही वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले.

वंदे मातरम् बाबत काँग्रेसची नेमकी भूमिका काय?

जम्मू-काश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कारा यांनीही इंडिया आघाडीतील घटकपक्षांकडून ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण सहा कडव्यांचे गायन केले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रीय प्रतीक, गीते आणि परंपरांना विशेष स्थान आहे. आपल्या देशासारख्या विविधतेने नटलेल्या राष्ट्राला एकत्र बांधून ठेवण्याच्या क्षमतेतच त्यांची खरी ताकद आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यलढ्यादरम्यान आणि त्यानंतर प्रजासत्ताकाच्या घटनात्मक प्रवासात या गीताच्या स्थानाचा झालेला विचारपूर्वक विकास दुर्लक्षित करून आमच्या मित्रपक्षाने वंदे मातरम्‌चे संपूर्ण गायन करणे ही चिंतेची बाब आहे, असे कारा यांनी म्हटले आहे. दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात वंदे मातरम् हे गीत सर्वांसाठी प्रेरणादायी बनले होते. मात्र, त्याची पहिली दोन कडवी सोडल्यास इतर कडव्यांमध्ये हिंदू धार्मिक संकल्पनेचे संदर्भ असल्याने त्यावर दीर्घकाळापासून राजकीय आणि धार्मिक वाद सुरू आहे. १९५० मध्ये संविधान सभेने या गीताला राष्ट्रगीताइतकाच समान दर्जा दिला होता, तसेच राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने गायनासाठी यातील पहिली दोनच कडवी स्वीकारण्यात आली होती.

नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेसला कसे प्रत्युत्तर दिले?

यादरम्यान इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनी वंदे मातरम् गीताच्या दोनच कडव्यांचे गायन करायला हवे ही काँग्रेसची भूमिका नॅशनल कॉन्फरन्सला फारसी रुचली नाही. त्यांनी थेट काँग्रेसच्या नेत्यांचीच जुने उदाहणे देऊन पलटवार केला. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे निकटवर्तीय आणि नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार तन्वीर सादिक यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अधिकृत कार्यक्रमांत वंदे ‘मातरम्’ची संपूर्ण कडवी गायली गेल्याचे व्हिडीओ शेअर केले. “जनाब तारिक हमीद कारा साहेब, कृपया जरा काँग्रेस मुख्यमंत्र्यांकडे पाहा आणि तुमचे बहुमूल्य विचार सर्वांसोबत मांडून शंका निरसन करा. धन्यवाद! असा खोचक टोला त्यांनी लगावला.

पीडीपीचा नॅशनल कॉन्फरन्सवर जोरदार हल्लाबोल

जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचा पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीनेही (PDP) या वादावरून सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशासाठी महत्वाच्या असलेल्या प्रत्येक मुद्द्यावर आजवर ठाम भूमिका घेतली; पण त्यांचा मित्रपक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सने ऐनवेळी नांगी टाकली आणि भाजपापुढे पायघड्या घातल्या. वक्फ दुरुस्ती विधेयकावर कोणताही निषेध नाही, एसआयआर घोटाळ्याबाबत तोंडातून एक शब्दही काढला नाही. याउलट त्यांनी सत्ताधारी भाजपाच्या भूमिकांचा अप्रत्यक्षपणे स्वीकारच केला आहे, पीडीपीचे आमदार वाहीद पारा यांनी केली. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचा भाजपाला छुपा पाठिंबा असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.