Vande Mataram vs Jana Gana Mana Controversy : ‘‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत एकत्र गायचे असेल, तर राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम’च्या सर्व सहा कडव्यांचे गायन अनिवार्य असेल, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत . केंद्रीय गृह मंत्रालयाने त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. त्यावरून पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय वादंग निर्माण झाला. सत्ताधारी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर टीकेचा भडिमार केला. केंद्र सरकारच्या या नवीन निर्देशामुळे राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान होत असल्याचा आरोप अनेकांनी केला. त्यामुळे वंदे मातरम विरुद्ध जन गण मन या वादाने बंगालचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.
तृणमूल काँग्रेसची भाजपावर टीका
केंद्रीय गृह मंत्रालयाने २८ जानेवारी रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार, शासकीय कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमच्या सर्व सहा कडव्यांचे गायन बंधनकारक करण्यात आले आहे. हा निर्णय १९३७ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाने ठरवलेल्या आणि १९५० मध्ये संविधान सभेने स्वीकारलेल्या दोन-कडव्यांच्या गीतापासून पूर्णत: वेगळा आहे. त्यावरून पश्चिम बंगालमधील विविध राजकीय पक्षांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह काही हिंदुत्ववादी संघटना नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या विरोधात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते व राज्याचे शिक्षणमंत्री ब्रत्य बासू यांनी केला आहे.
आरएसएसवरही घेतले तोंडसुख
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या हिंदुत्ववादी संघटनांना रवींद्रनाथ टागोर यांची मुक्त विचारसरणी कधीच आवडली नाही. टागोर अजूनही अनेक देशांमध्ये शिकवले जातात. राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम’ अनिवार्य करणे हा श्रेणीक्रम लादण्याचा प्रयत्न आहे. या प्रक्रियेमुळे रवींद्रनाथ टांगोर यांचा अपमान झाला आहे, असे बासू म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार असल्याने भाजपाकडून जाणूनबुजून हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण ममता बॅनर्जी यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हा विषय आपोआपच मागे पडेल, असा टोलाही बासू यांनी भाजपाच्या नेत्यांना लगावला आहे.
पंतप्रधान मोदींच्या भाषणावरूनही टीका
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचा उल्लेख ‘बंकिम दा’ असा केला होता. त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी त्यांच्या या विधानावर आक्षेप घेतला होता. याच मुद्द्याला हाताशी धरून राज्याच्या अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी ही अधिसूचना त्या ‘जखमेवर मलम’ चोळण्यासाठी काढली आहे, असा प्रश्न उपस्थित केला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे दिवंगत नेते जवाहरलाल नेहरू यांना लक्ष्य केले होते. मुस्लीम लीगच्या मोहम्मद अली जिन्ना यांच्या दबावाखाली येऊन नेहरूंनी ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीतामधील काही ओळी वगळल्या होत्या. त्यांच्या याच विश्वासघाताने देशात फाळणीची बीजे पेरली गेली, असा आरोप मोदींनी केला होता.
इतर पक्षही भाजपाविरोधात मैदानात
तृणमूल काँग्रेस सरकारमधील एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेसने १९३७ मध्ये वंदे मातरमची दोन कडवी स्वीकारली गेली होती, जेणेकरून देशाची धर्मनिरपेक्ष मूल्ये अधोरेखित होतील. केंद्र सरकारच्या निर्देशावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय-एम) नेत्यांनीही तीव्र टीका केली. भाजपाने आता बंगालमधील महापुरुषांवरून राजकारण सुरू केले आहे. यापूर्वी त्यांनी कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस या बंदराचे नाव बदलून श्यामा प्रसाद मुखर्जी केले. आता ते बंकिमचंद्र चटोपाध्याय यांना रवींद्रनाथ टागोर यांच्यापेक्षा श्रेष्ठ दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्रीय अमित शाह यांना रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चटोपाध्याय कोण आहेत हे तरी माहीत आहे का, असा प्रश्न माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य सुजन चक्रवर्ती यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : बॅलेट पेपरवरील निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय; भाजपाला पराभवाचा धक्का, तेलंगणात काय घडले?
काँग्रेसचे नेते नेमके काय म्हणाले?
स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही ‘वंदे मातरम’चा नारा दिला नाही. त्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाचा सन्मानही केला नाही. भाजपाच्या नेत्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चटोपाध्याय कोण आहेत, हे काय समजणार? असा टोलाही चक्रवर्ती यांनी लगावला. ‘वंदे मातरम’वरून बंगालमध्ये राजकीय वादंग उठला असताना काँग्रेसनेही या वादात उडी घेऊन भाजपाच्या नेत्यांवर चांगलेच तोडसुख घेतले. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने हा वाद उकरून काढला आहे. राज्यातील मतदारांमध्ये फूट पाडण्याचा भाजपाच्या नेत्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी केली.
निवडणुकीआधी भाजपाची कोंडी?
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी विरोधी पक्षांचे सर्व आरोप फेटाळून लावले. भाजपाच्या प्रत्येक अधिवेशनात वंदे मातरम हे गीत गायले जाते आणि त्याला पूर्ण प्रतिष्ठा बहाल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे रवींद्रनाथ टांगोर यांचे महत्त्व कमी केल्याचा विरोधकांचा आरोप पूर्णपणे खोटा आहे, असे चौधरी यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधी केंद्र सरकारने ‘वंदे मातरम’बाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेमुळे भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी सत्ताधारी पक्षाला आयते कोलीत मिळाले आहे. त्यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते सत्ताधाऱ्यांना कसे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

