scorecardresearch

खलिस्तानसमर्थकांवरील कारवाईनंतर विश्व हिंदू परिषदेने आम आदमी पक्ष, केंद्र सरकारचे केले कौतुक

विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणाले, “देशाचे पंतप्रधान हे भारतीय आणि हिंदू धर्माभिमानी आहेत. या वेळेला आपण सर्वांनी एकत्र येऊन हे स्वीकारायला हवे की, देशाचा प्रश्न हा वादाचा विषय असू शकत नाही.”

vishwa hindu parishad on Amritpal singh AAP Punjab Govt
स्वयंघोषित धर्मगुरू अमृतपाल सिंह, विश्व हिंदू परिषदेचे नेते सुरेंद्र जैन आणि कार्याध्यक्ष आलोक कुमार

‘वारिस पंजाब दे’चा नेता अमृतपाल सिंह याच्यावर कारवाई केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेने आम आदमी पक्षाच्या पंजाब सरकारवर कौतुकाचा वर्षाव केला, तसेच केंद्र सरकारचे आभार मानले. हिंदू नववर्षाचे स्वागत करत असताना विहिंपने सांगितले की, पंजाब सरकारने स्वयंघोषित धर्मगुरू अमृतपालवर कारवाई करण्याची इच्छाशक्ती आणि जिद्द दाखवली. भारताला आव्हान देणाऱ्यांच्या विरोधात मागील दोन दिवसांपासून राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितरीत्या कारवाई करत आहेत. विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, काही लोकांनी बरीच वातावरणनिर्मिती केली होती, आता केंद्र आणि राज्य सरकारने चिरडण्याची भूमिका घेतल्यानंतर भारतासोबत संघर्षाला तयार असणारे ते लोक कुठे गेले?

खलिस्तानसमर्थकांच्या विरुद्ध बोटचेपी भूमिका घेतल्याचा आरोप भाजपाकडून ‘आप’वर करण्यात येत होता. भगवंत मान सरकार कट्टरतावाद्यांच्या विरोधात मवाळ भूमिका घेत असल्याची टीका करण्यात आली. त्यानंतर आता विहिंपने केलेले वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे. आलोक कुमार यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तानसमर्थकांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. तसेच भारत सरकारने या हल्ल्याचा तीव्र निषेध ब्रिटिश उच्चायुक्तालयाकडे नोंदविल्याबाबत त्यांनी भारत सरकारचे अभिनंदन केले. “देशाचे पंतप्रधान हे भारतीय असून हिंदू धर्माभिमानी आहेत. या वेळेला आपण सर्वांनी एकत्र येऊन हे स्वीकारायला हवे की, देशाचा प्रश्न हा वादाचा विषय असू शकत नाही. देशातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन खलिस्तानसमर्थकांनी कॅनडा, यूकेमध्ये जो गोंधळ सुरू केलाय, त्याच्या विरोधात भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

हे वाचा >> अग्रलेख: अमृतकालातील विषवल्ली

विश्व हिंदू परिषदेच्या नववर्षाच्या कार्यक्रमात सरचिटणीस मिलिंद परांडेदेखील सहभागी झाले होते. ते म्हणाले की, सध्या देशात हिंदूंसाठी अतिशय उपयुक्त असे वातावरण आहे. मागच्या वर्षभरात विहिंपचा चांगला विस्तार झाला आहे. वर्षभरात आम्ही १.३३ लाख गावांत पोहोचलो असून ७२ लाख लोकांना आम्ही नव्याने जोडले आहे. विहिंपचे सहसचिव सुरेंद्र जैन म्हणाले की, हे वर्ष ‘हिंदू जन जागरणाचे’ वर्ष म्हणून ओळखले जाते. येत्या वर्षात देशातील अनेक प्रलंबित प्रश्नांची उकल केली जाणार आहे. अयोध्येतील राम मंदिराचेदेखील उद्घाटन केले जाणार आहे.

हे वाचा >> पंजाबमधील उच्छाद कसा निस्तरायचा?

“आपल्या आयुष्याचा प्रत्येक कप्पा हिंदुत्वाने व्यापलेला आहे. हिंदू शक्तिशाली झाला तर देश बलशाली होईल. हीच बाब राष्ट्रद्रोही घटकांना रुचलेली नाही. त्यामुळे हे घटक देशात आणि देशाबाहेर ‘टुलकिट गँग’ म्हणून काम करत आहेत. काही जण देशाचा अवमान करत आहेत, तर काही जण आपल्या एकात्मतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, कुणी आपल्या शास्त्रांवर संशय घेत आहे, तर काही लोक आपल्या महान नेत्यांचा अवमान करत आहेत. पण या सर्व लोकांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी, ते एक पराजय निश्चित असलेले युद्ध लढत आहेत,” अशी प्रतिक्रिया सुरेंद्र जैन यांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी यांनी परदेशात भारतीय लोकशाहीवर प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. नड्डा तर म्हणाले की, राहुल गांधी हे राष्ट्रद्रोह्यांच्या टुलकिटचे कायमचे भाग झाले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 17:20 IST

संबंधित बातम्या