TVK Vijay Tamil Nadu Government Formation: तमिळनाडूत जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. परंतु, टीव्हीके पक्ष बहुमतापासून अद्याप दूर आहे. त्यामुळे विजय यांच्या सत्ता स्थापनेत अडथळा आला आहे. विजय यांच्या टीव्हीके पक्षाने आकड्यांची जुळवाजुळव करताना आज (गुरूवारी) इतर पक्षांना समर्थन मागितले. परंतु, समर्थन मागण्यासाठी टीव्हीकेच्या नेत्यांनी व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस पाठवल्याचे समोर आले आहे. सीपीआय, सीपीआय-एम आणि व्हीसीके या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे समर्थन मागणारे मेसेजेस यापूर्वी कधीही कोणाकडून आले नसल्याचे खासगीत मान्य केले.

टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी सलग दुसऱ्या दिवशी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेतली. बहुमत सिद्ध करण्यासाठी विजय यांनी राज्यपालांकडे दोन आठवड्यांचा कालावधी मागितल्याचे टीव्हीके मधील सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी अण्णाद्रमुक (AIADMK) पक्षाचे आमदार पुद्दुचेरीतील एका लक्झरी रिसॉर्टमध्ये दाखल झाले आहे. सत्तास्थापनेचा पेच अडकला असताना AIADMK नेते एलापद्दी के पलानीस्वामी हे आमदारांबरोबर बैठक घेणार आहेत.

सलग दुसऱ्या दिवशी घेतलेली राज्यपालांची भेट निष्फळ

टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी आज (गुरूवारी) सलग दुसऱ्यादिवशी लोक भवन येथे जाऊन राज्यपाल अर्लेकर यांची भेट घेतली. सर्वाधिक जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेसाठी आपल्याला आमंत्रण द्यावे, अशी विनंती विजयने पुन्हा एकदा राज्यपालांना केली. तसेच बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांनी राज्यपालांना दोन आठवड्यांची मुदत मागितली. परंतु, राज्यपालांनी विजय यांची विनंती मान्य केली नाही. तमिळनाडूत बहुमतासाठी आवश्यक असलेले ११८ आमदारांचे समर्थन असलेले कागदोपत्री पुरावे आधी सादर करावे, असे राज्यपालांनी विजय यांना सांगितले. अशी माहिती चर्चेत सहभागी सूत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली आहे.

टीव्हीके पक्षाकडे सध्या एकूण १०८ जागा आहेत. त्यापैकी दोन जागांवर विजय जिंकून आले आहेत. त्यामुळे त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. काँग्रेसच्या पाच आमदारांचे टीव्हीकेला समर्थन मिळाले आहे. त्यामुळे विजय यांच्याकडे सध्या ११३ आमदारांचे समर्थन आहे. बहुमतासाठी त्यांना ११८ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.

विजय यांच्या निलांकारी या निवासस्थानी आज (७ मे) टीव्हीके पक्षाची बैठक झाली. विजय यांचा आधी शपथविधी सोहळा होईल, त्यानंतर ते बहुमत सिद्ध करतील, अशी अपेक्षा टीव्हीकेच्या आमदारांना होती. परंतु, राज्यपालांनी ठेवलेल्या अटीमुळे आमदारांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, असे काही नेत्यांनी सुचवले. तर मुदतीत बहुमत सिद्ध न केल्यास पुन्हा निवडणुका होतील, अशी शक्यता बैठकीत काही नेत्यांनी व्यक्त केली. परंतु, सध्या निर्माण झालेला पेच हा कायद्याशी संबंधित नसून तो राजकीय आहे. मागील २४ तासांत टीव्हीकेच्या नेत्यांनी पाठिंबा मिळावा म्हणून डीएमकेच्या मित्रपक्षांना आवाहन केले आहे. सीपीआय, सीपीआय-एम, व्हीसीके आणि आययूएमएल या डीएमकेच्या मित्र पक्षांना टीव्हीकेने साद घातली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर पाठिंब्यासाठी मेसेजेस

डावे पक्ष व व्हीसीके पार्टीच्या नेत्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, टीव्हीके पक्षाकडून होणारा संवाद हा अधिकृतपणे होत नसून तो मुख्यत: व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेसद्वारे होत आहे. “सत्ता स्थापन करणारा पक्ष बहुमत न मिळाल्याने आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्याकडून आम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठिंब्यासाठी मेसेजेस येत आहेत. ते आमच्याकडे आले नाहीत, किंवा आमच्या कार्यालयातही आले नाहीत. त्यांच्या या पद्धतीने साधल्या जाणाऱ्या संवादाला काय समजावे? “, असे एका नेत्याने म्हटले.

“हे जेन झीचे जुळवाजुळवीचे राजकारण”

आणखी एका डाव्या पक्षाच्या नेत्याने म्हटले, “हे जेन झीचे जुळवाजुळवीचे राजकारण आहे. पण, आघाडी करण्यासाठी, एकत्र येण्यासाठी अधिकृतपणे संवाद साधण्याची पद्धत आहे. दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांप्रति आदर व विचारधारेत स्पष्टता, पारदर्शकता हवी.” दरम्यान, डावे पक्ष असलेल्या सीपीआय, सीपीआय एम आणि व्हीसीके या पक्षांनी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या विजय यांच्या पक्षाला सत्ता मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सीपीआयचे नेते एम. वीरपांडियन म्हणाले, शपथविधीपूर्वी बहुमत सिद्ध करण्याचा आग्रह धरणे चुकीचे आहे. घटनात्मक परंपरा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार बहुमत हे विधानसभेच्या पटलावर सिद्ध केले पाहिजे. डीएमकेच्या नेत्यांनी विजय यांना सत्ता स्थापनेची संधी मिळावी, असे सार्वजनिकरित्या म्हटले आहे. विजय यांना अडवण्याचा त्यांचा हेतू नसल्याचे काही नेत्यांनी सांगितले. विजय यांना सत्ता स्थापन करू द्या, असे एमके स्टॅलिन यांनी म्हटल्याचे एका डीएमके नेत्याने सांगितले.

द्रमुक आणि अण्णाद्रमुकमध्ये खलबतं

विजय यांची बहुमत जुळवताना दमछाक होत असताना दुसरीकडे द्रमुक – अण्णाद्रमुक एकत्र येऊन नवे राजकीय समीकरण तयार करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सरकार स्थापन करण्यात विजय अपयशी झाल्यास दुसरा पर्याय तयार ठेवण्यासाठी अण्णाद्रमुकने हालचाली सुरू केल्या आहेत. अण्णाद्रमुकचे आमदार पुद्दुचेरीतील एका रिसॉर्टमध्ये आहेत. दरम्यान, तमिळनाडूत विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्याने त्यांनीच सत्ता स्थापन करावी, असे द्रमुक व अण्णाद्रमुकच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटले आहे. विजय सरकार स्थापन करण्यासाठी अपयशी ठरले तर अण्णाद्रमुक हा पक्ष द्रमुकच्या बाहेरून पाठिंब्याने सरकार स्थापन करेल. छोट्या पक्षांना सरकारमध्ये संधी दिली जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.