Tamil Nadu Election Result Thalapathy Vijay TVK Party Political Journey : तमिळनाडूच्या राजकारणात सुपरस्टार विजय (Vijay) आणि त्याच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) या नव्या पक्षाने आणलेले वादळ म्हणजे केवळ एका अभिनेत्याचा सत्तेतील प्रवेश नाही, तर तो तमिळ जनतेच्या बदलत्या मानसिकतेचा एक मोठा संकेत आहे.

संयमाने उभा राहणारा नेता

तमिळ चित्रपटसृष्टीत ‘थलपती’ म्हणून ओळखला जाणारा विजय हा गोंगाटातला आवाज नाही तर तो संयमाने शांततेतून निर्माण होणारा प्रभाव आहे. सेटवर तो फार कमी बोलतो, असे अनेक दिग्दर्शक सांगतात. एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने त्याला एका सीनबद्दल मत विचारले असता, विजयने फक्त मान हलवली… ना कौतुक, ना टीका… सीन ओके झाला. हीच शैली आज त्याच्या राजकीय प्रवासात दिसते, असे विश्लेषक मानतात. मोठमोठ्या भाषणांपेक्षा ‘कमीत कमी शब्दांत, जास्तीत जास्त अर्थ’ ही त्याची पद्धत प्रभावी ठरताना दिसते आहे.

अपयशातून आलेली संवेदनशीलता

S. A. Chandrasekhar यांचा मुलगा म्हणून उद्योगात आलेल्या विजयला सुरुवातीला ‘बापाने लाँच केलेला स्टार’ म्हणून हिणवले गेले. १९९० च्या दशकात त्याचे अनेक चित्रपट अपयशी ठरले. मदुराईतील एका थिएटर मालकाने त्याच्या चित्रपटाचे तिकीट दर अर्धे केले होते, हा प्रसंग त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट मानला जातो.

Thalapathy Vijay TVK Party political debut analysis | Tamil Nadu Politics actor Vijay success strategy | थलपती विजय टीव्हीके पक्ष तामिळनाडू राजकारण | विजय तमिळगा वेत्री कळघम राजकीय विश्लेषण
तामिळनाडू राजकारणात थलपती विजय आणि TVK पक्षाचा वाढता प्रभाव. (Image- Gemini)

अपयशातून शिक्षण

या अपयशाने विजयला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली, जनता काय स्वीकारते हे समजून घेणे महत्त्वाचे. त्यानंतर त्याने B आणि C सेंटरमधील प्रेक्षकांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यातूनच त्याचा ‘मास कनेक्ट’ तयार झाला. आता राजकारणातील प्रवेशानंतर हाच अभअयास त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरताना दिसतो आहे. लोकांना काय ऐकायचे आहे हे नव्हे, तर ते का ऐकू इच्छितात हे समजून घेणे महत्त्वाचे हे त्याने या निवडणूक निकालांमधून दाखवून दिले आहे.

फॅन क्लब्स: एक अदृश्य संघटनशक्ती?

रजनीकांत Rajinikanth यांचे फॅन क्लब्स भावनिक निष्ठेवर उभे राहिले आहेत, तर Kamal Haasan यांचे समर्थक बौद्धिक चर्चेत रमताना दिसतात. या पार्श्वभूमीवर विजयने वेगळी वाट निवडली, त्याच्या फॅन क्लब्सनी ‘संघटना’चे काम केले, जे राजकीय क्षेत्रात फारसे कुणाला लक्षात आले नाही. ती त्याच्या राजकीय प्रवेशाची पायाभरणी होती.

मिनी राजकीय यंत्रणा

तिरुनेलवेलीतील एका रक्तदान शिबिराचा किस्सा उल्लेखनीय ठरतो. हे शिबिर फक्त प्रतिकात्मक नव्हते; त्यासाठी रुग्णालयांशी समन्वय, डेटा व्यवस्थापन आणि स्वयंसेवकांचे नियोजन करण्यात आले होते. एका पत्रकाराने ते पाहून टिप्पणी केली होती… ‘हे फॅन क्लब नसून मिनी-राजकीय यंत्रणाच आहे.’ आज TVK चा पाया त्यावरच उभा आहे.

चित्रपटांतील ‘राजकीय रिहर्सल’

२०१० नंतर विजयच्या चित्रपटांमध्ये एक बदल दिसतो. Mersal, Sarkar यांसारख्या चित्रपटांनी थेट राजकीय भाष्य केले. पण अधिक महत्त्वाचे म्हणजे त्यातील संवाद… ते कोणताही वेगळा विचार न मांडता, थेट प्रेक्षकांच्या भावनांना भीडतात.

शाळांना भेटी

विजयने अनेक सरकारी शाळांना दिलेल्या भेटी फारशा चर्चेत आल्या नाहीत. या भेटींमध्ये तो विद्यार्थ्यांना एक वेगळाच प्रश्न विचारत असे “तुम्हाला या गावाबाहेर जायचे आहे का?”
हा प्रश्न केवळ शिक्षणाबद्दल नव्हता; तर तो त्या मुलांच्या आकांक्षेबद्दल होता.
तमिळनाडूच्या पारंपरिक राजकारणात आजवर ओळख (identity) महत्त्वाची राहिली आहे. विजय मात्र ‘aspiration politics’ कडे झुकताना दिसतो.

राजकारणात उशिरा प्रवेश: एक रणनीती

M. G. Ramachandran आणि J. Jayalalithaa यांसारख्या नेत्यांनी सिनेमातून राजकारणात यशस्वी प्रवेश केला. तरीही विजयने घाई केली नाही. एक खासगी चर्चेत त्याने म्हटले होते “वेळ आपल्या तयारीवर नाही, तर सिस्टीममध्ये रिकाम्या असणाऱ्या जागांवर ठरते.” हा दृष्टिकोन त्याच्या राजकीय गणिताची झलक दाखवतो. तो प्रत्येक पावलावर सध्या तरी वेगळा विचार करताना दिसतो आहे. आणि हा विचार पारंपरिक नाही तर नवा आणि वेगळा आहे

वडिलांपासून वेगळा मार्ग

S. A. Chandrasekhar यांनी विजयच्या नावाने पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा विजयने त्यापासून अंतर राखले. हा निर्णय केवळ कौटुंबिक नव्हता; तर त्याच्यासाठी तो राजकीय निर्णयच होता.
विजय स्वतःची ओळख ‘घरून आलेला वारसा’ म्हणून नव्हे, तर ‘स्वतःची निर्मिती’ म्हणून घडवू इच्छितो.

TVK: अद्याप विचारसरणी ठरलेली नाही

DMK आणि AIADMK या पक्षांची स्पष्ट वैचारिक विचारसरणी आहे. या पार्श्वभूमीवर TVK सध्या तरी ‘ओपन टेक्स्ट’ आहे. स्पष्ट विचारसरणी नसणे ही सध्या तरी या पक्षाची ताकद आहे. कारण त्यामुळेच विविध गट या नव्या पक्षाकडे आकर्षित झालेले दिसतात. मात्र हीच बाब भविष्यात त्यांच्यासाठी आव्हान ठरू शकते.

स्टारडम ते मतांचं राजकारण

चित्रपटातील लोकप्रियता थेट मतांमध्ये बदलतेच असे नाही. Kamal Haasan हे याचे सर्वात महत्त्वाचे उदाहरण ठरावे. विजयकडे मजबूत संघटनशक्ती आहे, पण निवडणूक म्हणजे केवळ उत्साह नसतो, तर बूथ लेव्हल मॅनेजमेंट, कोणत्या पक्षासोबत जायचे वा नाही याचा निर्णय आणि पक्षाची धोरणे यांची ती कसोटी असते.
पण सध्या तरी स्टारडमपासून सुरू झालेला विजयचा प्रवास यशस्वीरित्या मतांच्या राजकारणापर्यंत पोहोचलेला दिसतो.

घडत असलेला नेता…

विजयला आत्ताच ‘जिंकणारा नेता’ असे शिक्कामोर्तब करणे म्हणणे कदाचित घाईचे ठरेल. पण तो ‘घडत असलेला नेता’ आहे हे नक्की. तो मोठ्या घोषणांपेक्षा सूक्ष्म हालचालींवर विश्वास ठेवतो आणि यातच त्याच्या यशाचे गमक दडलेले आहे, असे दिसते.

तमिळनाडूच्या राजकारणात तो यशस्वी होईल की नाही, हा पुढचा प्रश्न आहे.
पण तो राजकारणाची भाषा बदलू शकतो का, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
आणि कदाचित, त्याचे उत्तर त्याच्या शांततेतच दडलेले आहे.