अहिल्यानगर : शहरातील भाजपच्या पारंपारिक मानसिकतेला छेद देत पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी भाजप व आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी स्वतंत्र युती महापालिका निवडणूक निमित्ताने केली.. या युतीने महापालिकेत दोन्ही पक्षांना यापूर्वी कधी मिळाले नाही, एवढे अभूतपूर्व यश मिळवले. अर्थात राज्यात सर्वत्र भाजपची सरशी होताना, ती नगर शहरातही होणे अपेक्षितच असले तरीही शहरातील सरशीमध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक संख्याबळाचा आयाम देत नगरकरांनी या नव्या युतीवर शिक्कामोर्तब केले.
नगरकरांनी शहरात शिवसेना व भाजप यांची दीर्घकाळाची युती अनुभवली. या युतीने महापालिकेवरही सत्ता गाजवली. शिवसेना (एकत्रित ) किंवा भाजप विरुद्ध जगताप कुटुंबियांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी असाच सामना महापालिकेत वेळोवेळी रंगला. भाजपला अपवादात्मकच संधी मिळाली. शिवसेना (एकत्रित) व राष्ट्रवादी (एकत्रित) यांनी एकमेकांविरुद्ध लढत आलटून-पालटून सत्ता मिळवली. अशा पार्श्वभूमीवर नगरकरांसाठी पूर्णतः नवीन असलेली, शिवसेनेला (शिंदे गट) बाजूला ठेवून केलेली, भाजप-राष्ट्रवादी यांच्या स्वतंत्र युतीला मोठे यश मिळवून दिले. या नव्या युतीला भाजप अंतर्गत मोठा विरोध होता.
या अनैसर्गिक युतीला नगरकर पाठिंबा देतील का असा प्रश्न शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला होता. यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे गट) व भाजप यांची महायुती एकत्रित सामोरी गेली. त्यावेळी शहरात ठाकरे गट महापालिकेत सत्तारूढ होता व सुजय विखे आणि संग्राम जगताप यांच्या विरोधात होता. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातील बहुसंख्य शिंदे गटात सहभागी झाले. त्याच्याच परिणामातून शिंदे गटाला बाजूला ठेवत केवळ भाजप व राष्ट्रवादी यांच्या स्वतंत्र युतीला चालना मिळाली.
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा विजयी झालेले आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या भूमिकेत अचानक बदल करत आक्रमक हिंदुत्वाची वाटचाल सुरू केली. पूर्वी हीच भूमिका भाजप सोबत असताना शिवसेनेची होती. राष्ट्रवादीचे नेतृत्व अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाची वेगळी विचारधारा असल्याचे सांगत असले तरी संग्राम जगताप यांनी त्याला न जुमानता आपली भूमिका कायम ठेवली. त्यांच्या या भूमिकेचा भाजपसोबत जाण्यासाठी मदत झाली. अशीच वेगळी भूमिका पूर्वी शिवसेनेला पाठिंबा देताना संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने घेतली, त्यावेळी शरद पवार यांनी १९ नगरसेवकांवर कारवाई केली होती. आता वेगळा विचार मांडणाऱ्या संग्राम जगताप यांच्यावर अजित पवार यांना कारवाईची भूमिका घेता आलेली नाही, उलट जगताप यांच्या भूमिकेला जनाधार मिळाला.
अर्थात याला जोड मिळाली ती विकास कामांच्या भूमिकेची. शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध होऊ लागला, त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले. त्यातून नगरकरांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि त्यांनी राष्ट्रवादी – भाजप या नव्या युतीवर शिक्कामोर्तब केले. या युतीने शहर विकासाला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा मतदारांनी निकालातून व्यक्त केली आहे. अर्थात दोन्ही पक्षाचे नेतृत्व सत्ताधारी असल्याने आता प्रश्न निधीचा नाही तर रोजगार निर्मितीला चालना देण्याचा असणार आहे.
निवडणूक निकालाने शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये राजकीय पक्षांच्या कशा मतपेढ्या तयार झाल्या आहेत, याकडे लक्ष वेधले जात आहे. मध्यवर्ती भागावर अद्यापही शिवसेनेचे (शिंदे गट) प्राबल्य टिकून आहे. सावेडी व केडगाव उपनगरात भाजप. बोल्हेगाव, सारसनगर उपनगरात राष्ट्रवादीचा दावा निर्माण झाला आहे. मुस्लिम बहुल भागाने कॉंग्रेस, एमआयएम यांना साथ दिली. एमआयएमने शहरात प्रथमच खाते उघडले आहे. कॉंग्रेसने तर हा भाग वगळून प्रचार देखील केला नाही.
