scorecardresearch

Premium

विखे-पाटील यांचे भाजपमध्येही खटके आणि संघर्ष सुरूच

विखे काँग्रेसमध्ये असताना जे चित्र ते व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यामधील वैमनष्याचे होते, तेच चित्र आज विखे व शिंदे या दोघा नेत्यांतील संबंधात निर्माण झालेले दिसतात.

vikhe patil ram shinde
विखे पाटील, राम शिंदे

मोहनीराज लहाडे

नगर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी पालकमंत्री राम शिंदे या भाजप नेत्यांमधील खटके जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहेत. विखे काँग्रेसमध्ये असताना जे चित्र ते व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यामधील वैमनष्याचे होते, तेच चित्र आज विखे व शिंदे या दोघा नेत्यांतील संबंधात निर्माण झालेले दिसतात. हे खटके एकाएकी उडालेले नाहीत, त्याला पूर्वसंदर्भ आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही आमदार शिंदे यांनी केलेली टीकाटिप्पणी पाहता दोघातील वाद आगामी काळातही धुमसत राहील, अशीच चिन्हे आहेत. या वादाला फडणवीस यांनी चहाच्या पेल्यातील वादळ असे संबोधले. मात्र हे सांगताना फडणवीस दोघांत वाद असल्याची कबुली दिली.

manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
Actor Vijay Antony reacts on Daughter Meera suicide
“मी तिच्याबरोबर मेलो,” १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; म्हणाला, “जिथे जात, धर्म, पैसा…”
chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
ramdas kadam on uddhav thackeray aaditya
“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”

 राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा, सन २०१९ च्या निवडणुकीत विखे व शिंदे यांच्यामध्ये पहिला खटका उडाला. राम शिंदे यांच्यासह पराभूत उमेदवारांनी एकत्र येत फडणवीसांकडे विखेंविरोधात तक्रार केली होती. मात्र त्याचे पुढे काय झाले, याची आठवण आज भाजपमध्ये कोणालाही नाही. दुसरीकडे भाजप, फडणवीस यांनी विखे यांना बळ देत वेळोवेळी त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. राम शिंदे यांचेही विधान परिषदेवर पूनर्वसन करत समतोलाचा प्रयत्न केला. मात्र आपल्या विरोधात शिंदे यांनी बांधलेली पराभूतांची मोट विखे यांनी सैल करण्यास सुरुवात केली. या प्रक्रियेत जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजी कर्डिले यांची वर्णी लागल्यानंतर विखेंविरोधात शिंदे एकटे पडले. पराभवाला विखेंना जबाबदार धरणाऱ्यांनी नंतर त्यांच्याशी जुळून घेतले.

केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत विखे यांनी सहकार परिषद आयोजित केली होती. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत राम शिंदे यांचे नाव नसल्याचा खटका उडाल्याची आठवण पदाधिकारी सांगतात. कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना आपल्या विरोधात मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना बदला, असा आग्रह शिंदे यांच्याकडून सुरू झाला. त्याची महसूल मंत्री विखे यांच्याकडून दखल घेतली गेली नाही. त्यातूनच शिंदे यांनी गौण खनिजच्या बेकायदा उत्खणनाचे प्रकरण विधीमंडळात उपस्थित केले. अखेर दोघा महसूल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली.

आता जामखेड बाजार समितीचे पदाधिकारी निवडीवरून विखे-शिंदे यांच्यामध्ये पुन्हा खटका उडाला. त्याची तीव्रता अधिक होती. तेथे विखे यांनी भाजपला सहकार्य केले नाही. विखे यांच्याशी बोललो होतो, तरीही त्यांनी सहकार्य केले नाही, अशी तक्रार शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली. याच दरम्यान नगर दक्षिण लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगत शिंदे यांनी दबावतंत्राचा वापरही केला. विखे यांनी त्याचा प्रतिवाद केला नाही. हा विषय पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर असल्याचे सांगत मौन बाळगले. आता कर्जत बाजार समितीच्या निवडीत पुन्हा जामखेडसारखीच परिस्थिती आहे. कर्जतमध्ये काय घडते यावर दोघातील दरी आणखी रुंदावणार की सांधली जाणार, हे अवलंबून आहे. जिल्ह्याचे प्रभारीपद स्वीकारुनही उपमुख्यमंत्री फडणवीस गेले वर्षभर नगरकडे फिरकले नव्हते. मात्र विखे-शिंदे वादाचा भडका उडाल्यानंतर आठवडाभरतच त्यांनी नगरला धाव घेतली. विखे यांच्या निवासस्थानी त्यांनी शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांशी बंद खोलीत खलबते केली. छोट्या गोष्टीवरून वाद घालू नका, असा सल्ला दिला.

शिंदे यांनी सभेत, पेल्यातील वाद पेल्यातच राहिले पाहिजे, तुमच्यासमोर जास्त बोलण्याची हिंमत आम्ही करू शकत नाही. मात्र कार्यकर्त्यांच्या मनात आहे त्यावर बोला, अशी विनंती फडणवीस यांना केली. विखे यांनीही शिंदे यांच्या वक्तव्याचा धागा पडत पकडत पक्षाच्या शिस्तीबाहेर आम्ही नाही. आपण एकाच घरात आहोत. आजही जबाबदारी माझ्यावरच आहे आणि उद्याही माझ्यावरच असणार आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, फडणवीस जो आदेश देतील तो शिरसावंद्य माणून काम करू, असे स्पष्ट केले. मात्र त्यानंतरही पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यामुळे थांबलो, विखेंकडून दुरुस्तीची अपेक्षा आहे, श्रेष्ठींनी सांगितल्याने यापूर्वीही आपण दोनदा थांबलो, आताही थांबत आहोत, मात्र जे झाले त्याची खंत मनात राहीलच, मी लढवय्या कार्यकर्ता आहे, पुन्हा असे प्रसंग येणार नाहीत याची जबाबदारी सर्वजण घेतील, ही शिंदे यांची वक्तव्ये वाद आगामी काळातही धुमसत राहील हेच दर्शवतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 10:59 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×