पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषदेच्या एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली; पण या निवडीनंतर पुण्यातील राजकारणावर संशयाचे मळभ आले आहेत. काकडे यांची निवड करून खासदार पार्थ पवार हे मैत्रीला जागले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात इच्छुकांमध्ये नाराजी पसरली. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात विसंवाद, तर काँग्रेसमध्ये नेत्यांवर शंका घेण्यात आल्याने वातावरण कलुषित झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. काकडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी भाजपमधून ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केला आणि उमेदवारी मिळविली. विक्रम काकडे हे खासदार पार्थ पवार यांचे मित्र आहेत. आमदारकीची संधी देऊन खासदार पवार यांनी मैत्री राखली. मात्र, त्यांच्याच पक्षात नाराजी उफाळून आली आहे.

‘राष्ट्रवादी’तील निष्ठावंत नाराज

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सुनिल टिंगरे हे इच्छुक होते. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांची मनधरणी करण्यात आल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. टिंगरे यांच्याशिवाय पिंपरी-चिंचवडमधून माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, नगरसेवक नाना काटे आदी इच्छुक होते. पिंपरी-चिंचडवलाही डावलण्यात आल्याने ‘राष्ट्रवादी’त नाराजी पसरली असल्याचे दिसून येत आहे.

महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जुंपली

महाविकास आघाडीच्या वतीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला देण्यात आली. या पक्षाचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, या पक्षाने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली. या निर्णयावरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’त जुंपली. ‘राष्ट्रवादी’ने विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली. मात्र, हा निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या चर्चेनंतर झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

काँग्रेसमधील वातावरण कलुषित

या निवडणुकीच्यानिमित्ताने काँग्रेसमध्ये नेत्यांवरच संशय व्यक्त करण्यात आला. पुणे शहराचे माजी प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर आरोप केला आहे. सपकाळ यांची या निवडणुकीतील भूमिका संशयास्पद असल्याची तक्रार शिंदे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केल्याने काँग्रेसमधील वातावरण कलुषित झाले आहे. भाजपविरुद्ध संघर्ष करण्याची संधी असताना काँग्रेसला मैदानाबाहेर ठेवण्याचे षडयंत्र कोणी रचले? कोणाच्या दबावाखाली हा निर्णय झाला? कोणत्या नेत्यांनी काँग्रेसच्या हिताशी तडजोड केली? या संपूर्ण प्रक्रियेत काँग्रेसचे नुकसान करून कोणाचा राजकीय फायदा साधला गेला? असे सवाल शिंदे यांनी खरगे यांना पाठविलेल्या पत्रात उपस्थित केले आहेत.