संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभेच्या १९९५ मधील निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार असताना अवघ्या ०.५९ मताने पराभूत झाल्यानंतर १९९९ मध्ये थेट कॉंग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मिळालेला कलाटणी, मतांच्या फाटाफुटीमुळे शेकापचे गणपतराव देशमुख यांचा पराभव, पहिल्या पसंतीची अवघी १३ मते मिळूनही काँग्रेसचे विजय सावंत यांचा विजय तर २१ मते मिळूनही विद्यमान परिवहनमंत्री अनिल परब यांचा १२ वर्षांपूर्वी झालेला पराभव अशी धक्कादायक निकालांची परंपरा विधान परिषद निवडणुकांना आहे. आता २० जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत धक्कादायक निकालांची ही परंपरा कायम राहणार का आणि त्याचा झटका नेमका कोणाला बसणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज्यसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीमुळे शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव होऊन भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला. छोटे पक्ष व अपक्ष आमदारांची मते फुटल्याने महाविकास आघाडीला हा मोठा धक्का बसला. आता विधान परिषदेच्या सोमवारी २० जूनला होणाऱ्या निवडणुकीत दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली आहे. कोण पराभूत होणार याचीच चर्चा रंगली आहे.

राज्यातील सत्तेचे कुतूहल अद्यापही मंत्र्यांच्या देहबोलीत!

राज्यातील विधान परिषद निवडणुकीतही असेच काही धक्कादायक निकाल लागले आहेत. राज्यात १९९६ मध्ये नऊ जागांसाठी झालेली विधान परिषदेची निवडणूक माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे चांगलीच गाजली होती. १९९५ मध्ये लातूर मतदारसंघात पराभव झाल्याने विलासरावांनी विधान परिषद निवडणुकीत नशीब अजमविले. काँग्रेसने उमेदवारी देण्यास नकार दिल्याने विलासरावांनी ‘मातोश्री’चे द्वार ठोठावले होते. शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. तेव्हा छगन भुजबळ, शिवाजीराव देशमुख, रामदास फुटाणे (काँग्रेस), अण्णा डांगे व निशिगंधा मोगल (भाजप), शिशिर शिंदे, रविंद्र मिर्लेकर व प्रकाश देवळे (शिवसेना) हे राजकीय पक्षांचे उमेदवार निवडून आले होते.

नवव्या जागेकरिता दोन अपक्ष लालसिंह राठोड आणि विलासराव देशमुख यांच्यात लढत झाली होती. विलासरावांना पहिल्या पसंतीची १९ तर राठोड यांना २० मते मिळाली होती. पुढील पसंतीक्रमानुसार राठोड यांना २४६८ तर विलासरावांना २४०९ मते मिळाली. शेवटी सर्व मते मोजून झाल्याने विलासराव हे ०.५९ मतांनी पराभूत झाले. ‘तेव्हा अर्ध्या मताने पराभूत झाल्याचे दु:ख झाले होते. पण तेव्हा पराभूत झालो नसतो तर १९९९ मध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली नसती, अशी भावना नंतर विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे विलासरावांना पराभूत करणारे राठोड हे त्यांचे मित्र होते.

सर्वाधिक ११ वेळा विधानसभेवर निवडून आलेले गणपतराव देशमुख हे १९९५च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. शेकापने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. पण पुरोगामी लोकशाही आघाडीची मते फुटल्याने गणपतरावांचा त्या निवडणुकीत पराभव झाला होता.

२०१० च्या निवडणुकीत पहिल्या पसंतीची सर्वात कमी मते मिळालेले काँग्रेसचे विजय सावंत हे विजयी झाले होते. भाजपच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांना २४, शिवसेनेचे अनिल परब (विद्यमान परिवहनमंत्री) २१ तर काँग्रेसचे विजय सावंत यांना १३ मते मिळाली होती. २६१९ मतांचा कोटा होता. विजय सावंत यांना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मते मिळाल्याने ते कोटा पूर्ण करू शकले. शेवटी शोभाताई फडणवीस यांना २४१५ तर परब यांना २२९१ मते मिळाली. म्हणजेच सावंत यांच्यापेक्षा पहिल्या पसंतीची आठ मते अधिक मिळूनही परब पराभूत झाले होते.

शेकाप आमदार जयंत पाटील यांचा राग पुन्हा अनावर, पोलीस अधिकाऱ्याला प्रोटोकॉल सांगत खुर्चीतून उठवले

२००८ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडे पुरेशी मते असतानाही पक्षाचे उमेदवार सुधाकर गणगणे हे पराभूत झाले होते. पक्षांतर्गत वादातूनच तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना या पराभवातून झटका देण्यात आला होता. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील नाराजीचा फटका कोणाला बसतो का याचे तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vilasrao deshmukh defeat in mlc election shivsena congress bjp print politics news pmw
First published on: 18-06-2022 at 10:59 IST