सुहास सरदेशमुख

विधान परिषेदत १९९६ ते २०२२ पर्यंत  सातत्याने उमेदवारी मिळविणारे, भाजप- राष्ट्रवादी आणि पुन्हा भाजप असा राजकीय प्रवास करताना सत्ताधारी मराठा समाजातील सर्व सामान्यांचे प्रश्न निराळे आहेत, तो समाज अडचणीत आहे, अशी मांडणी सातत्याने करणारे नेते अशी विनायक मेटे यांची ओळख. मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्याला आरक्षण हेच उत्तर आहे, अशी मांडणी करण्यात अग्रेसर असणारे मेटे यांनी लोकविकास मंच, शिवसंग्राम हे स्वत:चे दोन पक्ष काढले. १९९९ मध्ये लोकविकास मंच हा पक्ष त्यांनी राष्ट्रवादीमध्ये विलीन केला. पण पुढे गोपीनाथ मुंडे यांना साथ देत त्यांनी शिवसंग्रामचे अस्तित्व जपले.बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील राजेगावसारख्या लहान गावात ते वाढले. मुंबईला गेले, तेव्हा परिस्थिती हलाखीची होती. भाजी विक्रीचा व्यवसाय करत मराठवाड्यातून मुंबईत कामाला येणाऱ्यांचे  संघटन त्यांनी बांधले. याच काळात मराठा सेवा संघाचे अण्णासाहेब पाटील यांच्या संपर्कात आले. त्यांचे कार्य पुढे चालवित त्यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने केली.

१९९५ च्या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांच्याबरोबर गाठीभेटी वाढत गेल्या. बीडच्या राजकारणातील व्यक्ती म्हणून मुंडे यांनी विनायक मेटे यांना बळ दिले. तेव्हा मराठा समाजाचे पाठबळ भाजपला मिळावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत होते. अण्णासाहेब पाटील, किसनराव वरखंडे यांचे समर्थन मिळवून देण्यात विनायक मेटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. यातूनच त्यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यायची असे ठरले. मागील महिन्यातील विधान परिषदेचा अपवाद वगळता विनायक मेटे नेहमी वरिष्ठ सभागृहाचे सदस्य राहिले. नव्या राजकीय घडामोडीनंतर मेटे यांना उमेदवारी नाकारली तरी १२ सदस्यांच्या यादीत त्यांचे नाव घेऊन त्यांना सत्तापदी घेतले जाईल, असा त्यांच्या समर्थकांचा दावा होता. पण काळाच्या मनात वेगळेच होते. दुर्दैवी अपघातामध्ये विनायक मेटे यांचे निधन झाले.

मराठा समाजाचे आरक्षण हा विषय विनायक मेटे यांनी सर्वप्रथम हाती घेतला. आरक्षणाच्या सामाजिक उतरंडीपेक्षा मराठा समाजातील प्रश्न आर्थिक स्वरुपाचे आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे बदलेले स्वरुप राज्य सरकारने लक्षात घ्यावे यासाठी मेटे यांनी प्रयत्न केले. असे करताना शहरी भागात मराठा संघटन बांधले गेले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी शहरी भागात त्याचा प्रभाव जाणवेल अशी कामाची रचना त्यांनी ठरवून घेतली होती. भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शीर्षस्थ नेत्यांबरोबर संबंध प्रस्थापित करताना स्वत:चा पक्ष असावा लागतो. या आधारेच राजकीय पटमांडणी सोयीची होते, हे जाणून विनायक मेटे हे नेहमी सत्तेच्या जवळ असणारे आमदार होते.

अलीकडच्या काळात बीडच्या राजकारणात पंकजा मुंडे यांच्यापेक्षाही मेटे यांना भाजप नेतृत्वाकडून बळ दिले जात होते. त्यामुळे सत्तासोपानामध्ये ते मोठे नेते आहेत, असे विधान  देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले होते. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी मेटे यांना प्रोत्साहन दिले.दुष्काळी भागातील माणसांचे प्रश्न सोडविताना सामूहिक विवाहांना चालना देणारा नेता अशीही त्यांची ओळख होती. त्यांनी स्वत:चा विवाहदेखील सामूहिक विवाह सोहळयात केला होता. शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत असताना शेतीच्या व्यवसायातील मराठा समाजाचे प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या नेत्याचे अपघाती निधन सर्वसामांन्यांच्या मनाला चटका लावणारे आहे.