सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या निमित्ताने एकगठ्ठा होऊ पाहणारा समाज व त्याचे नेतृत्व केवळ आपल्याकडेच आहे, असा भास निर्माण करत गेली ३० वर्षे विधान परिषदेत असणाऱ्या विनायक मेटे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपने बाजूला केले आहे. शिवसंग्रामचा भाजपा किंवा तत्पूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादीला किती उपयोग झाला हे त्या पक्षाच्या नेत्यांनाच माहीत. पण मेटेंनी आपणच समाजाचे नेते अशी केलेली प्रतिमा ५६ आरक्षण मोर्चाच्या निमित्ताने फारशी सशक्त नव्हतीच हे स्पष्ट होऊ लागले होते. कदाचित त्यांच्यातील या मर्यादेचा अंदाज आल्याने त्यांच्या उमेदवारीवर फुली मारली गेली असावी. पण असे करताना तुम्हीच लोकनेते व्हावेत, असे सांगत त्यांचे सांत्वन करण्यासाठी खास प्रवीण दरेकर यांना बीड येथे कार्यक्रमासाठी पाठविण्यात आले.

एका बाजूला मेटे यांना विधान परिषदेतून बाजूला केले जात असतानाच आता मराठा समाजाला केंद्रभूत मानून बहुजनांचे प्रश्न सोडविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य नावाची संघटना सुरू केली आहे. शिवसेनेकडून फसविले गेल्याची भावना आता कोल्हापुरी दाटून भरलेली आहे. अशा काळात समाज म्हणून उभे राहिलेले संघटन राजकीय अर्थाने वापरण्यासाठी अन्य पक्षांच्या पाठी आता भाजपाही पुढाकार घेऊ शकतो. त्यामुळे शिवसंग्रामची राजकीय गरज किती यावर प्रश्नचिन्ह लावले जाऊ लागले होते.

दरम्यान मेटे यांचा उपयोग आक्रमक पंकजा मुंडे यांना डिवचण्यासाठी म्हणूनही करण्यात आला. पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली की विनायक मेटे यांनी घेतलेल्या जाहीर कार्यक्रमास भाजपचे नेते हजेरी लावायचे. यावरून पंकजा मुंडे समर्थक भाजप नेत्यांच्या कार्यक्रमातून निघून जायचे किंवा गैरहजर राहायचे. आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा समाजात निर्माण झालेला एकोपा राजकीय व्यासपीठ म्हणूनही वापरता येईल का, याचे प्रयोग सर्वच पक्षांकडून विधानसभा निवडणुकीमध्ये करण्यात आले. पण ध्रुवीकरणाची शक्ती संपली की हे नेते अडगळीत टाकण्याची प्रक्रिया अन्य पक्षाप्रमाणे इथेही सुरू होते. त्यात आता विनायक मेटे यांचाही समावेश नाही ना, अशी शंका बीड जिल्ह्यात घेतली जात आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचं ‘आस्ते कदम’, बहुमत असूनही जुळवाजुळवीचं राजकारण!

मराठा महासंघाच्या नावाखाली मेटे यांनी राजकारण सुरू करताच त्या वेळी या दबावातूनच त्यांना विधान परिषदेत येण्यासाठी काँग्रेसने मदत केली होती. हा इतिहास आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून काम करणाऱ्या मेटे यांनी काँग्रेस -राष्ट्रवादीच्या या बळावरच बीड जिल्ह्यात संघटन उभे केले. अन्य जिल्ह्यात शिवसंग्रामचा विस्तार व्हावा असे प्रयत्नही झाले पण त्याला फारसे यश मिळाले नाही.

२००३ ते २००९ या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असणाऱ्या विनायक मेटे यांना गोपीनाथ मुंडे यांनी भाजपमध्ये सक्रिय केले. देवेंद्र फडणवीस यांनीही बीड जिल्ह्यात प्रोत्साहन दिले. आता मात्र त्यांना विधान परिषदेतील उमेदवारी नाकारण्यात आली. एकूणच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या सर्वच पक्षांनी राजकीय उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला. आता तशी गरज आणि मेटे यांची स्वत:ची ताकदही मर्यादित असल्याने त्यांना दूर करण्यात आल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinayak mete maratha community politics in beed bjp mlc election candidate print politics news pmw
First published on: 15-06-2022 at 09:49 IST