नीरज राऊत 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सद्यस्थितीत अनेक तरुण विविध प्रकारचे शिक्षण घेतल्यानंतरही बेरोजगार असून याला देशातील व्यवस्था जबाबदार आहे असे मत झाल्याने व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विचाराने झपाटले गेल्याने स्वयंरोजगार सोडून १९ वर्षांपूर्वी माकपचे काम सुरू केलेले  विनोद भिवा निकोले हे डहाणू विधानसभा मतदारसंघातून आज आमदार आहेत. ४७ वर्षांचे विनोद निकोले हे माकपचे राज्यातील एकमेव आमदार आहेत. 

हेही वाचा- पंकज गोरे : रांगड्या शिवसेनेत उच्चविद्याविभूषित आणि कार्यमग्न कार्यकर्ता

गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या विनोद निकोले यांचे प्राथमिक शिक्षण डहाणू तालुक्यातील आशागड जवळील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शाळेत झाले. कोसबाड येथील गोखले एज्युकेशन संस्थेच्या शाळेत माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर डहाणू शहरातील बाबुभाई पोंदा कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेत बारावीपर्यंत शिक्षण घेतले. उच्च शिक्षणासाठी पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला, मात्र घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी प्रथम वर्ष परीक्षा दिल्यानंतर शिक्षकाला रामराम ठोकला.

निकोले यांचे कुटुंब भूमिहीन असल्याने उदरनिर्वाहाचे साधन नव्हते. एका चुलत भावाच्या मदतीने डहाणूच्या इराणी रोड येथे त्यांनी लहानसे कॅन्टीन सुमारे दोन वर्षे चालवले. त्यांच्या कॅन्टीनवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड एल.बी धनगर चहा पिण्यासाठी नेहमी येत असत. त्यांच्या सोबत विविध विषयांवर चर्चा करताना ते मार्क्सवादी विचारांनी प्रभावित झाले.

हेही वाचा- वसंत मोरे : जनतेच्या मनातील नेता

आपण शिक्षण घेऊनही बेरोजगार राहिल्याची खंत त्यांना नेहमी सलत राहिली. मात्र आपल्यासह आपल्या अवतीभवती असणाऱ्या अनेक तरुणांना भेडसावणाऱ्या बेरोजगारीच्या प्रश्नाला देशातील व्यवस्था जबाबदार असल्याची निकोले यांची धारणा झाली. ही परिस्थिती बदलण्यासाठी तसेच येणाऱ्या पिढीला सक्षम बनवण्यासाठी चळवळीमध्ये स्वतः उतरणे आवश्यक वाटले व त्यांनी आपल्या स्वयंरोजगाराचा त्याग करत २००३ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून प्रवेश घेतला.

पक्षातील विविध ज्येष्ठ मंडळींकडून त्यांनी मार्क्सवादाचे धडे घेतले. प्रारंभी एक हजार रुपये व आमदारकीची निवडणूक लढवेपर्यंत तीन हजार रुपयांच्या मानधनावर ते आपल्या कुटुंबाजी गुजराण करत. संघटित व असंघटित कामगार क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षांपासून पक्षाशी संलग्न संघटनांसोबत काम केले. डहाणू, तलासरी,  पालघर, मोखाडा, जव्हार, शहापूर इत्यादी तालुक्यात त्यांनी ३५ पेक्षा अधिक उद्योगांमध्ये कामगार संघटनेचे प्रतिनिधित्व केले व कामगारांचे हित जपण्यासाठी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगारांचे त्यांनी प्रतिनिधित्व करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे डहाणू विधानसभा क्षेत्रात सन २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या तत्कालीन आमदारास पराभूत करत निकोले यांनी विधानसभा गाठली. त्यानंतर पक्ष संघटनेचे बळकटीकरण करणे तसेच आपल्या मतदारसंघातील व जिल्ह्यातील समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते एकमेव आमदार असल्याने विधिमंडळात त्यांनी विविध प्रश्न तसेच राज्य सरकारच्या विविध धोरणात्मक निर्णयांवर विषयावर पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा- निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का! तीन दशकांपासून सक्रिय असलेल्या बड्या नेत्याचा राजीनामा

क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात त्यांना विशेष रूची असून आदिवासी तरुणांना क्रीडा क्षेत्रात चमक दाखवता यावी यासाठी डहाणू व तलासरी तालुक्यात अद्यावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात पक्ष संघटनेची संलग्न विविध संस्थांशी त्यांचा संबंध आहे. पक्षाचा मानधनावर कार्यरत असणारा एक सामान्य कार्यकर्ता आमदारपदापर्यंत पोहोचला असून पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागाचा विकास कामासाठी विनोद निकोले यांच्या माध्यमातून नवा चेहरा पुढे आला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod bhiwa nikolay moves from self employment to politician print politics news dpj
First published on: 06-11-2022 at 10:04 IST