नवी दिल्ली : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते असे मानले जात होते. त्यावर भाजपने बुधवारी महाराष्ट्राच्या यादीत तावडेंचा समावेश करून शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्रात राजकीय विजनवासात जायची वेळ ओढवलेल्या विनोद तावडेंनी दिल्लीत येऊन फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतली. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये तोंडावर बोट ठेवून पक्षासाठी मेहनत घेतल्याचे फळ तावडेंना राज्यसभेच्या उमेदवारीच्या रुपात मिळाले आहे.
बिहारमध्ये तावडेंच्या ‘मार्गदर्शना’खाली काम केलेले नितीन नवीन पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष झाले असताना त्यांच्या नव्या चमूमध्ये खरेतर तावडेंनी राहणे अपेक्षित नाही. आताही त्यांचा समावेश होणार नाही असे नव्हे पण, तावडे दिल्लीच्या राजकारणात एक पाऊल पुढे गेले आहेत. राज्यसभेत महाराष्ट्राचे राजकारण पुढे नेण्यासाठी तावडेंच्या वाक्-चातुर्याचे कसब पणाला लागेल.
दिल्लीत आल्यानंतरही तावडेंचे लक्ष महाराष्ट्राकडे होते, गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत तावडेंना राज्यात परत जाण्याची अपेक्षा होती. पण, भाजपचे यश पाहिल्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच असतील हे स्पष्ट झाले. मग, फडणवांसींचे कट्टर स्पर्धक असणाऱ्या तावडेंची वाटचाल राष्ट्रीय राजकारणातच असेल हेही स्पष्ट झाले. २०१९ मध्ये फडणवीसांनी तावडेंना उमेदवारी न देऊन त्यांच्या राज्यातील राजकारणावर गदा आणली होती.
फडणवीसांच्या झंझावातात त्यांना राज्याच्या राजकारणात स्थान मिळण्याची शक्यता दुरावली होती. मग, तावडेंसाठी राजकीयदृष्ट्या टिकवण्यासाठी राष्ट्रीय राजकारणाचा पर्याय योग्य होता. तावडेंना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोलाचा आधार दिला. त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांच्यावर पक्ष संघटनेच्या, निवडणुकांच्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. त्या तावडेंनी यशस्वी करून दाखवल्या. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी पार पाडली. या मेहनतीचे कौतुक केले जात होते. राज्यसभेची उमेदवारी देऊन पक्षाने तावडेंच्या पाठीवर बक्षिसाची थाप मारली आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या बिहार निवडणुकीमध्ये तावडेंनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. बिहारचे ते साडेतीन वर्षे प्रभारी होते. त्यांनी बिहार पिंजून काढला, तिथली जातीची समीकरणे समजून घेतली. सम्राट चौधरींसह नव्या-जुन्या नेत्यांशी संवाद साधला. बिहारच्या नेत्यांवर नियंत्रण मिळवणे हे कठीण कामही त्यांनी करून दाखवले. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संपर्कात राहून भाजपच्या फायद्याचे समीकरण पदरात पाडून घेण्यातही तावडेंचा वाटा मोठा होता. नितीश कुमार यांच्या जनता दलाचा (सं) जाहीरनाम्याचा आराखडा तयार करण्यातही तावडेंचा समावेश होता, अशीही चर्चा रंगली होती. बिहारची कामगिरी फत्ते झाल्यावर शहांनी त्यांच्याकडे केरळचे निवडणूक प्रभारीपद दिले. केरळमध्ये एप्रिलमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे.
विनोद तावडेंनी महाराष्ट्रात पक्ष संघटनेत काम केलेले आहे. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. तिथून भाजपमध्ये आलेले नेते राष्ट्रीय स्तरावर चमकतात, तावडेही अपवाद नाहीत. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात ते शिक्षणमंत्री होते. त्यामुळे त्यांना शासन-प्रशासनाचीही अनुभव आहे. दिल्लीत आल्यावर तावडेंना हा सगळा अनुभव उपयोगी पडला. भाजपच्या पक्षीय राजकारणात मुरलेले असल्यामुळे गवगवा न करता पक्षात वावरण्याची शिस्त त्यांनी पाळली. बिहार जिंकल्यानंतर मिळणारी प्रसिद्धी वरिष्ठांच्या नजरेत येणार नाही याची अचूक दक्षता त्यांनी घेतली होती. बडबड्या राम माधव यांच्यासारख्या नेत्याचे मोदी-शहांनी काय केले हे तावडेंना माहीत असल्यामुळे न बोलता त्यांनी केंद्रात वाटचाल सुरू ठेवली होती. त्यामुळेच कदाचित तावडेंनी कधी फडणवीस यांच्याविरोधात जाहीर कटुता व्यक्त केली नाही. ‘माझा दिल्लीत प्रवास सुरू झाला आहे, इथे मी रमलो आहे’, असे तावडे खासगी गप्पांमध्येही सांगत.
माजी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या चमूमध्ये तावडे हेच सर्वात सक्रीय व कार्यक्षम राष्ट्रीय महासचिव होते. ‘एनडीए’च्या घटक पक्षांच्या बैठकींमध्ये समन्वय साधणे, आयारामांना घेण्यासाठी पक्षाने छाननी समिती नेमली होती, त्यात तावडे होते. राष्ट्रपती-उपराष्ट्रतींच्या निवडणुकांमध्ये प्रचार व संयोजनाची संपूर्ण जबाबदारी तावडेंकडे होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने दीडशेहून अधिक भाजपेतर मतदारसंघांमध्ये संघटना मजबूत करण्याची रणनिती आखली होती, त्या समितीचे प्रमुख सदस्य तावडे होते.
काही मंत्र्यांकडेही ‘प्रवासी मतदारसंघां’ची जबाबदारी दिली होती, त्याचे समन्वयकही तावडे होते. हे पाहिले तर तावडेंचा दिल्लीत आल्यानंतरच राजकीय प्रवास अत्यंत वेगाने होत होता पण, तो कोणाच्या नजरेला पडणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा तावडेंवर पूर्ण विश्वास होता हे खरे पण, तावडेंना वादाने दिल्लीतही गाठले. चंदिगढच्या महापौर निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. गेल्या वेळी ही निवडणूक मते बाद झाल्याच्या मुद्द्यावर वादात सापडली होती. यावेळी मात्र तावडेंनी विनावाद भाजपचा महापौर निवडून आणला. मते फुटण्याच्या भीतीने ‘आप’ व काँग्रेसने युती केली नाही असे सांगितले जाते. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीवेळी तावडेंभोवती उमेदवाराला पैसे पुरवल्याच्या कथित आरोपावरून वाद रंगला होता. तावडे अशा वादांशी दोन हात करून दिल्लीत टिकून राहिले. आता संसदेच्या वरिष्ठ सभागृहात तावडेंचा नवा राजकीय डाव पाहायला मिळेल.
