BJP Rajya Sabha candidates राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजेच सात जागा रिक्त होणार आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी उशिरा मुंबईत भाजपा कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह १२ वरिष्ठ नेते उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत अशा नावांची निवड करण्यावर भर देण्यात आला जी अंतिम निर्णयासाठी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली जातील. ही चर्चा अनेक तास चालली, अशीही माहिती देण्यात आली आहे. या बैठकीत कोणत्या नावांना संधी देण्यावर चर्चा झाली? भाजपा अन् एनडीएसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची का मानली जात आहे? जागांचे एकूण गणित काय? जाणून घेऊयात….
बैठकीत नक्की काय चर्चा झाली?
या बैठकीत विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर आणि भागवत कराड यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या नावांवर चर्चा झाली. बैठकीत काही इतर नावांचाही विचार करण्यात आला. सूत्रांचे म्हणणे आहे की, पर्याय निवडताना पक्ष अनुभव, निष्ठा आणि प्रादेशिक प्रतिनिधित्वाचा विचार करत आहे. बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांनी आपली मते मांडल्याचे समजते.
राज्य पातळीवर कोणताही अंतिम निर्णय झाला नसला तरी सुचविलेल्या नावांची एक यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी आता दिल्लीतील भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली जाईल. शिफारसींवर चर्चा करण्यासाठी रविंद्र चव्हाण लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेण्याची शक्यता आहे. अंतर्गत चर्चेनंतर केंद्रीय नेतृत्वच अंतिम निर्णय घेईल, असे सांगण्यात आले आहे.
पक्षातील सूत्रांनुसार, २८ फेब्रुवारीपूर्वी उमेदवारांची घोषणा करण्याची भाजपाची इच्छा आहे, त्यामुळे पक्षातील संभ्रम टाळण्यासाठी आणि स्पष्टता आणण्यासाठी पक्षनेतृत्व प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रासारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात राज्यसभेची निवडणूक पक्षासाठी महत्त्वाची मानली जात आहे. या निवडीकडे पक्षवर्तुळातही बारकाईने लक्ष दिले जात आहे, कारण त्यातूनच अंतर्गत संतुलन आणि भविष्यातील नियोजनाची दिशा स्पष्ट होणार आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत पडद्यामागे चर्चा सुरू राहण्याची शक्यता आहे. पक्षाच्या सूत्रांनी ही प्रक्रिया नियमित असली तरी महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे.
रामदास आठवलेंचे नाव निश्चित?
भाजपाची ही कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर पार पडली, असे पक्ष सूत्रांनी सांगितले. भाजपाने संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी चार उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे. मित्रपक्ष असलेल्या आरपीआयचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेदेखील भाजपाच्या पाठिंब्याने रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तसेच सहाव्या उमेदवाराचा विजय कसा सुनिश्चित करता येईल यावर पक्ष काम करत असल्याचे एका नेत्याने सांगितले आहे. “विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता आम्ही पाच जागा सहज जिंकू शकतो, तर महाविकास आघाडी एक जागा जिंकू शकते,” असे ते म्हणाले. “आम्ही काही नावांवर चर्चा करत आहोत, परंतु या टप्प्यावर ती चर्चा उघड करणे योग्य ठरणार नाही,” असेही ते म्हणाले.
एनडीएची प्रतिष्ठा पणाला
निवडणूक आयोगाने बुधवारी १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत, त्यामुळे सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला वरिष्ठ सभागृहात आपले संख्याबळ वाढवण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचे संख्याबळ घटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक सात जागा रिक्त होत असून, यामध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार, आरपीआय (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह सात खासदारांचा कार्यकाळ संपत आहे.
त्याखालोखाल तामिळनाडूमध्ये सहा जागा रिक्त होत आहेत, ज्यात अद्रमुकचे एम. थंबीदुराई आणि द्रमुकचे तिरुची सिवा यांचा समावेश आहे. एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या इतर प्रमुख सदस्यांमध्ये काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी (तेलंगणा), आरएलएमप्रमुख उपेंद्र कुशवाहा (बिहार) आणि तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले (पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. भाजपा सूत्रांनी सांगितले की, पक्षाचे संख्याबळ वाढण्याची अपेक्षा आहे आणि नव्याने नियुक्त झालेले राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे पहिल्यांदाच वरिष्ठ सभागृहात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
“एनडीएची एकूण ताकद नक्कीच वाढेल, परंतु अचूक अंदाज वर्तवणे कठीण आहे कारण मित्रपक्षांचे अनेक राज्यसभा खासदार यावर्षी टप्प्याटप्प्याने निवृत्त होतील. तरीही वरिष्ठ सभागृहात स्वतःच्या जोरावर बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचण्याचा आम्हाला विश्वास आहे,” असे एका वरिष्ठ भाजपा नेत्याने सांगितले. सध्या २४५ सदस्यीय राज्यसभेत भाजपचे १०३ खासदार आहेत. विशेषतः महाराष्ट्र (२८८ पैकी १३१ आमदार) आणि बिहार (२४३ पैकी ८९ आमदार) मधील विधानसभेच्या वाढलेल्या संख्याबळामुळे पक्षाला जागा मिळण्यास मदत होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
एनडीएचे सध्याचे एकूण संख्याबळ १३३ आहे, परंतु काही भाजपा नेत्यांनी असेही नमूद केले की, विधानसभेतील वाढलेल्या संख्येमुळे एनडीएच्या मित्रपक्षांमध्येही स्पर्धा निर्माण झाली आहे. “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या मित्रपक्षांसोबतचे समीकरण संतुलित करणे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांची वाढती उपस्थितीदेखील चर्चेत महत्त्वाची ठरेल,” असे भाजपा सूत्रांनी सांगितले.
तसेच, उमेदवारांची निवड करताना प्रत्येक खासदारासाठी दोन टर्म या नियमाचाही विचार केला जाईल, यामुळे संघटनेतील अनुभवी नेते राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा होईल. राज्यसभा निवडणुकीत आसाममध्ये भाजपाची स्थिती मजबूत आहे, तिथे तीन जागा रिक्त होणार आहेत. १२६ सदस्यीय आसाम विधानसभेत भाजपाचे ६७ आमदार आहेत आणि मित्रपक्षांचे १९ आमदार आहेत. ओडिशामध्ये चार जागा रिक्त होत असून, तिथेही १४७ सदस्यीय सभागृहात ७९ आमदारांसह भाजपा फायद्यात आहे. तिथे बीजेडीकडे ५० आणि काँग्रेसकडे १४ आमदार आहेत. छत्तीसगड आणि हरियाणातही भाजपाची स्थिती भक्कम आहे, तिथे प्रत्येकी दोन राज्यसभा जागांसाठी मतदान होणार आहे.

