पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला (एसआयआर) सुरुवात झाली असून, त्यासाठी राजकीय पक्षांकडून मतदान केंद्र प्रतिनिधी (बीएलए) नेमण्यातही पुण्यात भाजपने बाजी मारली आहे. भाजपच्या सहा हजार कार्यकर्त्यांची फळी कामाला लागली असताना, काँग्रेसला सर्वांत कमी म्हणजे अवघे २२५ ‘बीएलए’ मिळू शकले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ‘बीएलए’ म्हणून काम करण्यासाठी एकाही कार्यकर्त्यांची नेमणूक केली नसल्याने त्यांच्यावर नामुष्की ओढावली आहे. दोन्ही ‘राष्ट्रवादी’ आणि शिवसेना यांना भाजपच्या खालोखाल कार्यकर्ते मिळाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

राज्यात ३० जूनपासून मतदार केद्र अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत घरोघरी भेटी देऊन मतदार नोंदणीसाठी अर्ज वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. २९ जुलैपर्यंत हे काम चालणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी ‘बीएलए’च्या नेमणुका करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या आहेत. त्यासाठी दर बुधवारी राजकीय पक्षांबरोबर बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी ठरविले आहे. त्यानुसार या बैठकांना सुरुवात झाली आहे. 

‘बीएलए’ नेमण्यात भाजप आघाडीवर आहे. भाजपने सहा हजार २०१ कार्यकर्त्यांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यांच्याकडून आपल्या हक्काच्या मतदारांचे नाव हे यादीत कसे राहील, याची खबरदारी घेण्यात येत आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपच्या तुलनेत अन्य पक्षांना सर्व ठिकाणी ‘बीएलए’ नेमता आलेले नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने ३ हजार २७०, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला अवघे ९९० ‘बीएलए’ नेमता आले आहेत. शिवेसना (शिंदे) पक्षाने दोन हजार ९७१ कार्यकर्त्यांना या कामासाठी नेमले आहेत. शिवेसना (ठाकरे) पक्षानेही दोन हजार १६८ कार्यकर्त्यांकडे हे काम सोपविले आहे. काँग्रेस, मनसे आणि बहुजन समाज पक्ष यांना आतापर्यंत कार्यकर्तेच मिळू शकले नसल्याची स्पष्ट झाले आहे. काँग्रेसला जेमतेम २२५ ‘बीएलए’ नेमला आले आहेत. बहुजन समाज पक्षाने अवघे पाच कार्यकत्यांची या कामासाठी नियुक्ती केली आहे. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्या सखोल पुनरीक्षण मोहिमेकडे लक्ष देण्याचे आदेश देऊनही मनसेकडून एकाही ‘बीएलए’ची नेमणूक करण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी याबाबतचा आढावा घेण्यात आला. त्यावरून ही बाब निदर्शनास आली आहे. 

‘बीएलए’चे काम काय?

‘एसआयआर’ मोहिमेत ‘बीएलओं’च्या मदतीसाठी राजकीय पक्षांकडून ‘बीएलए’ नेमण्यात येणार आहेत. ‘बीएलओ’ हे प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत. मतदाराची दुबार नोंद असल्यास त्याबाबतचा अहवाल ‘बीएलओ’ हे मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना सादर करणार आहेत. मतदाराच्या नावात दुरुस्ती, नाव वगळणे किंवा सुधारणा करणे हे काम मतदार नोंदणी अधिकारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून करणार आहेत. मात्र, त्यासाठी ‘बीएलओ’ हे पडताळणी करणार आहेत. त्यासाठी ‘बीएलए’ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ‘बीएलए’ हे प्रशासन आणि राजकीय पक्ष यांच्यातील महत्त्वाचा दुवा असणार आहेत. राजकीय पक्षांचे संबंधित भागातील स्थानिक कार्यकर्ते हेच ‘बीएलए’ आहेत. त्यांना स्थानिक मतदारांची माहिती असल्याने त्यांचे सहकार्य मिळाल्यास मतदार यादी अद्ययावर होणार आहे. 

मतदारयादीचे शुद्धीकरण करून खऱ्या मतदारांनाच यादीत स्थान देणे हा ‘एसआयआर’ मोहिमेचा उद्देश आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला राजकीय पक्षांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी ‘बीएलए’ नेमणे आवश्यक आहे. मात्र, पुण्यात भाजप वगळता अन्य पक्षांकडे कार्यकर्त्यांची वानवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.