कोकण शिक्षकमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला ? | Voting percentage increase in Kokan teachers constituency election, who will get benefit? | Loksatta

कोकण शिक्षकमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला ?

गेल्या निवडणूकीत मतदारसंघासाठी ८२.०५ टक्के मतदान झाले होते. यावेळी ९१.०२ टक्के मतदान झाले.

Kokan teachers constituency, election, Voting percentage. BJP, Peasants and Workers Party of India
कोकण शिक्षकमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला ? ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

हर्षद कशाळकर

अलिबाग- कोकण शिक्षक मतदारसंघात तब्बल ९१.०३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामुळेच गेल्या निवडणूकीच्या तुलनेत यंदा वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शेकापचे बाळाराम पाटील यांचा कार्यकाळ संपल्याने कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली. पाचही जिल्ह्यात मतदारांचा उत्साह या निमित्ताने पहायला मिळाला. ठाणे १५ हजार ३०० पैकी १३ हजार ५९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, हे प्रमाण ८८.६६ टक्के एवढे होते. पालघर जिल्ह्यात ६ हजार ८४४ पैकी ६ हजार ०१४ जणांनी मतदान केले. म्हणजेच ८७.८७ टक्के मतदान झाले. रायगड जिल्ह्यात १० हजार १०१ मतदारांपैकी ९ हजार ४५० जणांनी मतदानाचे कर्तव्य बजावले. इथे ९३.५६ टक्के मतदान झाले. रत्नागिरी जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात मतदान झाले. ४ हजार १२० पैकी ३ हजार ९०३ जणांनी मतदान केले. ९४.७३ टक्के होते. सिंधुदूर्ग जिल्ह्यात २ हजार १६४ मतदार होते. यापैकी २ हजार ०१८ जणांनी मतदान केले. हे प्रमाण ९७.४१ टक्के होते. मतदार संघातील ३८ हजार ५२९ मतदारापैकी ३५ हजार ०७० मतदारांनी मतदान केले. म्हणजेच एकूण ९१.०२ टक्के मतदान झाले.

हेही वाचा… स्थगितीच्या श्रेयासाठी काँग्रेसमध्येच संघर्ष! गोंडवाना विद्यापीठ सभागृह नामकरण प्रकरण

गेल्या निवडणूकीत मतदारसंघासाठी ८२.०५ टक्के मतदान झाले होते. यावेळी ९१.०२ टक्के मतदान झाले. मतदारांनी निवडणूकीत भरभरून मतदान केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. त्यामुळे वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. या मतदार संघासाठी एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख ही भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे आणि शेकापचे बाळाराम पाटील यांच्यात अपेक्षित आहे. दोन्ही उमेदवारांनी आपआपल्या मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती. त्यामुळे मतदानाचे प्रमाण यंदा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पहायला मिळाले.

हेही वाचा… शरद पवार, नितीन गडकरी यांच्या कोल्हापूर दौऱ्यात राजकीय, निवडणुकीची बांधणी

भाजपकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र पाटील यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचाराची धुरा संभाळली, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी विशेष मेहनत घेतली. उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकरही ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासाठी प्रचारात उतरले होते. म्हात्रे यांना बाळासाहेबांची शिवसेना, रिपब्लिकन पक्षाने पाठींबा जाहीर केला आहे. त्याच बरोबर शिक्षक परिषदेची मदतही त्यांच्या पथ्यावर पडणार आहे.

हेही वाचा… भांडी, कुंडी, साडीच्या माध्यमातून महिला मतांची पेरणी

तर दुसरीकडे बाळाराम पाटील यांच्या प्रचारासाठी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे राजन विचारे, भास्कर जाधव उतरले होते. बाळाराम पाटील यांच्यासाठी रयत शिक्षण संस्था, पुरोगामी शिक्षक संघटना, कोकण एज्युकेशन सोसायटी आणि पिएनपी एज्युकेशन सोसायटी, तसेच टीडीएस संघटनांची मदत महत्वाची ठरणार आहे. या शिवाय महाविकास आघाडीच्या पाठिंब्या त्यांच्या पथ्यावर पडणार आहे.

दोन तुल्यबळ उमेदवारांमधील लढत म्हणून या लढतीकडे पहायले जात आहे. यात मतदारांनी कौल कोणाच्या बाजूने दिला हे २ तारखेला स्पष्ट होणार आहे.

शेकापसाठी निवडणूक महत्त्वाची.

गेल्या काही वर्षात शेकापला रायगडात उतरती कळा लागली आहे. रायगड जिल्ह्यातून विधानसभा निवडणुकीत पक्षाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकलेला नाही. कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात माजी आमदार विवेक पाटील यांना अटक झाल्यामुळे पक्षाची वाताहत झाली आहे. अशावेळी पनवेल उरण परिसरात संघटनात्मक पातळीवर पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवेल असे बाळाराम पाटील हे एकमेव नेतृत्व पक्षाकडे शिल्लक आहे. त्यांचा या निवडणूकीत पराभव झाला तर त्याची मोठी किंमत पक्षा चुकवावी लागू शकते. त्यामुळे हा विजय पक्षाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.

हेही वाचा… ना आढावा ना चर्चा, मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा केवळ सत्संगासाठी?

खालसा झालेले संस्थान भाजपला हवेच…

निवडणूकीच्या सुरवातीला भाजप उमेदवार निवडताना चाचपडत होता. अखेर शिवसेना प्रणित शिक्षक सेनेच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पक्षात घेऊन त्यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे या निवडणूकीत सुरवातीला भाजप बॅकफुटवर असल्याची चर्चा होती. मात्र नंतर त्यांनी सर्व प्रचार यंत्रणा निवडणूकीत उतरविल्याचे पहायाला मिळाले. गेल्या निवडणूकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भाजपने यावेळी विशेष दक्षता घेतली. शिक्षण परिषदेच्या मतांचे विभाजन होऊ नये यासाठी प्रयत्न केले. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी व्यापक प्रयत्न आणि प्रचार सभांचे आयोजन केले. कुठल्याही परिस्थितीत खालसा झालेले कोकण शिक्षक मतदारसंघाचे संस्थान परत मिळवण्याच्या उद्देशाने भाजपने यंत्रणा कामाला लावल्याचे पाहायला मिळाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 11:24 IST
Next Story
स्थगितीच्या श्रेयासाठी काँग्रेसमध्येच संघर्ष! गोंडवाना विद्यापीठ सभागृह नामकरण प्रकरण