पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज (२९ एप्रिल) दुसऱ्या व शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. संध्याकाळी उशीरा मतदानाची प्रक्रिया आटोपत आल्यानंतर एक्झिट पोल जाहीर होतील. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली. आता एक्झिट पोलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही वेळातच एक्झिट पोल समोर येतील. केरळ व आसाममध्ये ९ एप्रिल रोजी मतदान झाले, तर २३ एप्रिल रोजी तमिळनाडूत मतदान पार पडले. तसेच २३ एप्रिल रोजीच पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहेत.

२०२१ मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल काय दर्शवत होते, ते जाणून घेऊयात. एक्झिट पोलसाठी सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांचे अंदाज २०२१ मध्ये आसाम व तामिळनाडू बाबत अचूक ठरले होते. आसाममध्ये भाजपाला, तर तामिळनाडू डीएमकेला बहुमत मिळेल असे एक्झिट पोलमधून समोर आले होते. तर केरळबाबतही एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले. केरळमध्ये लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटला बहुमत मिळेल असे एक्झिट पोलमधून समोर आले होते. केरळबाबतही थोड्या फार फरकाने एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले होते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला फटका बसेल असे एक्झिट पोलमधून सांगण्यात आले होते. ममता बॅनर्जींचा निसटता विजय होईल, असे अंदाज वर्तवण्यात आले होते. पश्चिम बंगालबाबत २०२१ च्या एक्झिट पोलमधून काय समोर आले होते, ते जाणून घेऊयात.

पश्चिम बंगाल

२०२१ ची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर एक्झिट पोल जाहीर झाले होते. त्यात ममता बॅनर्जींचा निसटता विजय होईल, असेच अंदाज वर्तवण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने दमदार कामगिरी केली होती. तर भाजपाला पश्चिम बंगालमध्ये बहुमत मिळेल असे अंदाज इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया व जन की बात या दोन संस्थांनी वर्तवले होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला जवळपास शंभरहून अधिक जागा मिळतील, असा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोल सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला होता.

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने २१५ जागा जिंकल्या, तर त्यावेळी तृणमूल काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या गोरखा जनमुक्ती मोर्चाला एक जागा जिंकता आली. भाजपाने ७७ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेस व त्याचा मित्रपक्ष असलेल्या इंडियन सेक्युलर फ्रंटला फक्त एकच जागा जिंकता आली. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागा असून बहुमतासाठी १४८ जागा जिंकण्याची आवश्यकता असेल.

पश्चिम बंगाल एक्झिट पोल २०२१

२०२१ मध्ये टुडे’ज चाणक्यचे एक्झिट पोल प्रत्यक्ष निकालाच्या थोडेसे जवळ जाणारे ठरले. १६९ ते १९१ जागा तृणमूल काँग्रेस पक्षाला, तर ९७ ते ११९ जागा भाजपाला मिळतील, असे अंदाज वर्तवण्यात आले होते. तर जन की बातने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये प्रचंड तफावत होती. भाजपाला १६२ ते १८५ जागा मिळून बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. एक्झिट पोलची सरासरी पाहता, एक्झिट पोलने तृणमूल काँग्रेसच्या कामगिरीचा ६१ जागांनी कमी अंदाज लावला होता, तर भाजपच्या जागांचा ४९ जागांनी जास्त अंदाज लावला होता .

तामिळनाडू

तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेची सत्ता जाऊन डीएमकेची सत्ता येईल, असा अंदाज सर्वच एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला होता. तो खरा ठरला. डीएमकेच्या जागांमध्ये वाढ होईल, असा अंदाज प्रत्येक संस्थेच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला होता. डीएमके व त्याच्या मित्रपक्षांनी १५९ जागांवर जिंकल्या, तर एआयएडीएमकेला उर्वरित ७५ जागा जिंकता आल्या. तामिळनाडूत विधानसभेच्या एकूण २३४ जागा आहेत, बहुमतासाठी ११८ जागा जिंकणे आवश्यक आहे.

तमिळनाड एक्झिट पोल २०२१

टीव्ही९-पोलस्ट्रेट, शायनिंग इंडिया न्यूज आणि पॅट्रिओटिक व्होटर यांनी वर्तवलेले अंदाज प्रत्यक्ष निकालाच्या जवळ जाणारे ठरले. या संस्थांनी डीएमकेला अनुक्रमे १४३ ते १५३ जागा, १४७ ते १७७ जागा आणि १५३ जागा मिळतील असे अंदाज वर्तवले होते. ते बऱ्यापैकी निकालाशी मिळते जुळते ठरले. सरासरी पाहता, एक्झिट पोलनी डीएमकेच्या कामगिरीचा ७ जागांनी जास्त अंदाज लावला होता, तर एआयएडीएमकेच्या जागांचा १२ जागांनी कमी अंदाज लावला होता.

केरळ

केरळमधील एक्झिट पोलने एलडीएफ (LDF) पुन्हा सत्तेत येईल असा अचूक अंदाज वर्तवला होता. परंतु, एलडीएफला मोठ्या प्रमाणात विजय मिळेल, असे कोणत्याही अंदाजातून समोर आले नव्हते. विरोधी आघाडी असलेल्या यूडीएफला अधिक जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला होता. २०२१ मध्ये, एलडीएफने ९९ जागा मिळवून सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली, तर यूडीएफला केवळ ४१ जागांवर समाधान मानावे लागले. केरळच्या १४० सदस्यीय विधानसभेत बहुमताचा आकडा ७० आहे.

केरळ एक्झिट पोल २०२१

‘न्यूज २४-टुडेज चाणक्य’चा एक्झिट पोल प्रत्यक्ष निकालाच्या सर्वात जवळ होता, त्यांनी एलडीएफला ९३ ते १११ जागा आणि यूडीएफला २६ ते ४४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. सरासरी पाहता, निवडणूक अभ्यासकांनी एलडीएफच्या कामगिरीचा १७ जागांनी कमी अंदाज लावला होता, तर यूडीएफच्या जागांचा १५ जागांनी जास्त अंदाज लावला होता.

आसाम

निवडणूक झालेल्या या चार राज्यांपैकी, २०२१ मध्ये आसामचे एक्झिट पोल सर्वात अचूक ठरले होते. भाजप पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज त्यांनी केवळ काही जागांच्या फरकाने अचूक वर्तवला होता. २०२१ मध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ७५ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना ५० जागा मिळाल्या होत्या आणि १ जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली होती. आसामच्या १२६ सदस्यीय विधानसभेत बहुमताचा आकडा ६४ आहे.

आसाम एक्झिट पोल २०२१

‘टीव्ही९ भारतवर्ष-पोलस्ट्रेट’ आणि ‘इंडिया अहेड-पी मार्क’ यांनी त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवला होता, परंतु इतर सर्व निवडणूक अभ्यासकांनी भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असे म्हटले होते. ‘इंडिया न्यूज-जन की बात’ आणि ‘न्यूज २४-टुडेज चाणक्य’ यांचे अंदाज निकालाच्या सर्वात जवळ होते. त्यांनी भाजपाला अनुक्रमे ७० ते ८१ जागा आणि ७० जागा मिळतील, तर काँग्रेसला अनुक्रमे ४५ ते ५५ जागा आणि ५६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. सरासरी पाहता, निवडणूक अभ्यासकांनी भाजपच्या कामगिरीचा ४ जागांनी कमी अंदाज लावला होता, तर काँग्रेसच्या जागांचा ४ जागांनी जास्त अंदाज लावला होता.