West Bengal Politics : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला जेमतेम एक महिना बाकी असताना पश्चिम बंगालच्या राजकारणात घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे पश्चिम बंगालमधील विविध शहरांत दौरे आणि सभा, मेळावे वाढले आहेत. या सभा आणि मेळाव्यांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. असं असताना भाजपाने पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे.
या चर्चांचं कारण म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट भाजपाचे राज्यसभा खासदार अनंत राय महाराज यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपा खासदार अनंत महाराज यांच्याशी तृणमूल काँग्रेस पक्ष का जुळवून घेत आहे? त्यामागचं गणित नेमकं काय? ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही भेट महत्वाची का? या मागील कारणं काय आहेत? थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
राजबंशी समाजाचे नेते नागेन रॉय ऊर्फ अनंत महाराज यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याहस्ते ‘बंग विभूषण पुरस्कार’ स्वीकारला. अनंत महाराज आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे यावेळी एकाच व्यासपीठावर दिसून आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात थेट अनंत महाराज यांच्या तृणमूल काँग्रेसमधील प्रवेशाबाबतच्या चर्चा रंगल्या. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकारण चांगलंच तापलं.
अनंत महाराज यांचं खरं नाव हे नागेंद्र रॉय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी वेगळ्या ‘ग्रेटर कूचबिहार’ला केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची मागणी केलेली आहे. पण या कारणांवरून अनंत महाराज आणि भाजपाचं केंद्रीय नेतृत्व आणि तृणमूल काँग्रेसचे मतभेद दिसून आलेले आहेत. मात्र, यातच अनंत महाराज आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे एका व्यासपीठावर आल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं.
या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनंत महाराजांचं कौतुक केलं. तसेच तृणमूल काँग्रेस नेते अरुप बिस्वास आणि इंद्रनील सेन यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “आम्ही अनंत महाराजांना मनापासून सुभेच्छा देत आहोत की ते निरोगी राहोत आणि समाजासाठी काम करत राहोत. आम्हाला अभिमान आहे की ते येथे उपस्थित आहेत.” बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, “आज जसं आपल्याकडे राजबंशी समुदायाचे अनंत महाराज आहेत, तसंच आपल्याकडे बौरी, बागडी, मटुआ समुदायातील लोकांचाही आदर आहे.”
यावेळी अनंत महाराज यांच्या वक्तव्यानेही सर्वांचं लक्ष वेधलं. ते म्हणाले की, “केंद्र सरकार आमच्या समुदायाशी भेदभाव करतंय, सरकारचं आमच्याकडे दुर्लक्ष होतंय. आमच्याकडे गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्ष केलं जात आहे.” दरम्यान, यावेळी अनंत महाराज यांना ते केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे असल्याचे लक्षात आणून देताच त्यांनी म्हटलं की, “मी भारताच्या विकासाबाबतही बोलू शकत नाही का? आपण देशाचा भाग नाही का?”
पश्चिम बंगालमधील राजबंशी समुदायाचं राजकीय समीकरण काय?
पश्चिम बंगालमधील अनुसूचित जाती (एससी) गटात राजबंशी हा सर्वात मोठा समुदाय आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, पश्चिम बंगालच्या २१.४ दशलक्ष अनुसूचित जाती लोकसंख्येपैकी १८ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या या समुदायाची आहे. कूचबिहार, जलपाईगुडी, अलीपुरद्वार आणि उत्तर दिनाजपूरच्या काही भागात मोठ्या प्रमाणात वसलेला हा समुदाय उत्तर बंगालमधील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिका बजावतो. त्यामुळे तृणमूल काँग्रेसने यावर आता अधिक लक्ष दिल्याचं दिसून येत आहे.
पश्चिम बंगालच्या प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते या पुरस्काराच्या कार्यक्रमात महाराजांची उपस्थिती शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चित होती. बंग बिभूषण पुरस्कार प्राप्त होणाऱ्या नावांची यादी पाहिली तर फक्त अनंत महाराजांचं नाव नंतर पेनाने लिहिलं गेलं होतं. कारण त्यांना समारंभासाठी निश्चित करण्यात आलेलं नव्हतं. पण नंतर त्यांचं नाव यादीत समाविष्ट करण्यात आलं.
दरम्यान, भाजपाने २०२३ मध्ये राजबंशी समुदाय असलेल्या मतदारांमधील त्यांच्या प्रभावावर अवलंबून राहून अनंत महाराजांना बंगालमधून राज्यसभेवर उमेदवारी दिली होती. तर तृणमूल काँग्रेसनेही सातत्याने या राजबंशी समुदायाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. २०१७ मध्ये राज्य सरकारने राजबंशी भाषा अकादमीसह राजबंशी विकास मंडळाची स्थापना केली. २०२० मध्ये सरकारने पंचानन बर्मा यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर केली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवूनही उत्तर बंगाल तृणमूल काँग्रेससाठी आव्हान निर्माण करत आहे. या प्रदेशात त्यांनी जिंकलेली एकमेव संसदीय जागा कूचबिहार – येथेही राजबंशी मतदार केंद्रित आहेत.
अनंत महाराजांचं तृणमूल काँग्रेससाठी महत्त्व
तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनुसार अनंत महाराजांनी यापूर्वी कूचबिहारला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा न देण्याच्या पक्षाच्या भूमिकेविरुद्ध भाष्य करून भाजपा नेतृत्वाला आव्हान दिलं होतं. त्यानंतर काही दिवसांतच बॅनर्जी यांनी अनंत महाराजांच्या निवासस्थानी भेट दिली होती. तेव्हाही अनंत महाराज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा होत्या, पण त्यांनी प्रवेश केला नाही.

