गेल्या सोमवारी मध्य कोलकातामधील ‘मुरलीधर सेन लेन’  हा अरुंद रस्ता भाजपा समर्थकांनी तुडुंब भरला होता. निमित्त होते चित्रपट अभिनेता आणि पक्षाचे नेते मिथुन चक्रवर्ती यांची उपस्थिती. मिथुन चक्रवर्ती हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार आणि इतर वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी पश्चिम बंगाल भाजपच्या मुख्यालयात आले होते.

मिथुन यांचे भाजपाच्या प्रदेश मुख्यालयात येणे म्हणजे बंगालच्या राजकारणात त्यांचे पुनरागमन झाले असे मानण्यात येत आहे. मार्च-एप्रिल २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत मिथुन यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र त्यानंतर ते सुमारे वर्षभर राजकीय कार्यक्रमांपासून दूर होतेते. प्रचार संपल्यानंतर सुमारे वर्षभराने मिथुन हे  प्रथमच भाजपच्या कार्यलयात आले होते. विद्यमान ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) भाजपाचा दारुण पराभव केला.

पक्षापासून सुमारे वर्षभर दूर राहिल्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात लोकसभा निवडणुकीसह इतर महत्वाच्या घडामोडींमध्ये मिथुन चक्रवर्ती यांच्या संभाव्य भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मिथुन चक्रवर्ती यांना भाजपा बंगालमधून राज्यसभेवर पाठवण्याचा विचार करू शकते. मात्र गेल्या निवडणुकीत मिथुन चक्रवर्ती प्रचारात सक्रिय असुन सुध्दा पक्षाला या निवडणुकांमध्ये यश मिळाले नाही. ही बाब मिथुन यांची वर्णी लागण्यात अडथळा ठरत आहे.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपाला बरेच राजकीय धक्के बसले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मार्चमध्ये झालेल्या १०८ नगरपालिकांपैकी एकही नगरपालिका भाजपाला जिंकता आली नाही. या निवडणुकांमध्ये भाजपा इतर डाव्या पक्षांपेक्षाही पिछाडीवर आहे. पाच आमदार आणि दोन खासदारांनी भाजपाला सोडचिट्ठी देत टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाच्या पक्षांतर्गत दुफळीमुळे अनेक नेते नाराज आहेत. अनेक नेते पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत.

मिथुन आणि राज्य भाजपा नेतृत्व या दोघांनीही तपशील सांगण्याचे टाळले. “पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. मी त्याची वाट पाहत आहे. यावर मी आत्ताच अधिक काही सांगू शकत नाही. पण मी राजकारणी नाही, मी मानवतावादी आहे. मला बंगालच्या लोकांसाठी काम करायचे आहे आणि मी ते करेन. पक्षाध्यक्षांच्या सूचनेनुसार मी येथे आलो आहे. मी माझ्या पक्षाचा छोटा कार्यकर्ता आहे. मी केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार काम करेन ”असे मिथुन यांनी पक्षाच्या नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर प्रदेश भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपाच्या एका जेष्ठ नेत्याने सांगितले की, “त्यांच्या पुनरागमनामुळे आमच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचे मनोबल निश्चितच उंचावेल. कार्यकर्ते बंगालमधील निवडणुकीत पक्षाला यश न मिळाल्याने निराश झाले आहेत.”