BJP West Bengal victory swearing-in ceremony on Pochise Boishakh: पश्चिम बंगालच्या राजकारणात प्रदीर्घ काळानंतर मोठी उलथाणूपालथ झाली असून भारतीय जनता पार्टीने (भाजपा) बहुमताचा आकडा पार केला आहे. टीएमसी आणि डाव्यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर आज ९ मे रोजी, म्हणजेच ‘पोचिशे बोईशाख’ला मुख्यमंत्री शपथ घेणार. पण असे का, या दिवसाला एवढे अनन्यसाधारण महत्त्व कशासाठी, ते जाणून घेऊया.
नव्या सरकारचा शपथविधी कधी?
पश्चिम बंगालच्या राजकारणात अभूतपूर्व असा निकाल लागला असून, भारतीय जनता पार्टीने (भाजपा) राज्यात १९० पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली असून त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. जवळपास अर्धशतकाहून अधिक काळ चाललेला डाव्या पक्षांचा आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी)चा अखंड सत्ताकाळ संपुष्टात आला आहे. या पार्श्वभूमीवर बंगालच्या राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात एकच प्रश्न चर्चेत होता, तो म्हणजे, नव्या सरकारचा शपथविधी बंगालच्या सर्वात भावनिक सांस्कृतिक दिवसांपैकी एका दिवशी म्हणजे ‘पोचिशे बोईशाख’लाच का होणार?
‘पोचिशे बोईशाख’ची राजकीय कुजबूज
या चर्चेला सुरुवात झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानातून. २७ एप्रिल रोजी बाराकपूर येथील अखेरच्या प्रचारसभेत त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले होते की, “या निवडणुकीतील ही माझी शेवटची सभा आहे. ४ मेच्या निकालानंतर मी नक्कीच भाजपच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहीन, याची मला खात्री आहे.” मोदींच्या या विधानानेच संकेत दिले होते की भाजपला विजयाबाबत प्रचंड आत्मविश्वास होता. मात्र त्यांनी कोणतीही ठरावीक तारीख जाहीर केली नव्हती. तरीही, बंगालमध्ये ९ मे ही तारीख वेगाने चर्चेत आली, कारण त्या दिवशी ‘पोचिशे बोईशाख’ आहे.

‘पोचिशे बोईशाख’ म्हणजे काय? बंगालसाठी त्याचे महत्त्व काय?
‘पोचिशे बोईशाख’ हा बंगाली दिनदर्शिकेतील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस म्हणजे महान कवी, साहित्यिक आणि विचारवंत रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन. २०२६ मध्ये हा दिवस ९ मे रोजी येत आहे.
टागोर हे केवळ साहित्यिक नव्हते, तर बंगालच्या सांस्कृतिक आत्म्याचे प्रतीक होते. त्यांनी रचलेले ‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत आहे. त्यांच्या आयुष्यात ते स्वतः ‘पोचिशे बोईशाख’ला आपला वाढदिवस साजरा करत असत. विशेष म्हणजे, त्यांच्या निधनाच्या काही आठवड्यांपूर्वी त्यांनी “He Nutan, Dekha Dik Arbar” हे गीत खास या दिवसासाठी रचले होते.
बंगालमधील सांस्कृतिक भावना
बंगालमध्ये हा दिवस केवळ उत्सव नसून एक सांस्कृतिक भावना आहे. शाळा, महाविद्यालये, सांस्कृतिक संस्था आणि सामान्य नागरिक या दिवशी टागोरांच्या स्मृतींना अभिवादन करतात.
९ मे रोजी शपथविधी; शक्यता कितपत वास्तववादी?
राजकीय दृष्टिकोनातून पाहता, ९ मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता पूर्णतः नाकारता येत नाही, पण ती अत्यंत वेगवान प्रक्रियेवर अवलंबून आहे.
निवडणुकीचे निकाल ४ मे रोजी जाहीर झाले आहेत. त्यानंतरची घटनात्मक प्रक्रिया पुढीलप्रमाणे असते:
- विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर करणे
- राज्यपालांकडून सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण
- भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अधिकृतपणे घोषित करणे
- मंत्रिमंडळाची प्राथमिक रूपरेषा ठरवणे
या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारणतः ६ ते ९ दिवस लागतात. मात्र, ९ मे हा निकालानंतर केवळ पाचवाच दिवस आहे. त्यामुळे, सर्व काही अत्यंत वेगाने पार पडल्यासच हा मुहूर्त साधता येईल. कोणत्याही टप्प्यावर विलंब झाला, उदाहरणार्थ मुख्यमंत्रीपदाच्या नावावर तर मात्र शपथविधी १० मे किंवा त्यानंतर ढकलला जाऊ शकतो.
भाजपसाठी ‘पोचिशे बोईशाख’ का ठरू शकतो ‘मास्टरस्ट्रोक’?
भाजपने या निवडणुकीत केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक स्तरावरही बंगालमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न केला. प्रचारादरम्यान पक्षाने वारंवार “बंगालची संस्कृती, भाषा आणि परंपरा आम्हाला समजते” असा संदेश दिला.
गृहमंत्री अमित शाह यांनी बंगाली भाषक मुख्यमंत्री देण्याचे आश्वासन दिले होते. तर मोदी यांनी स्वतः धोतर परिधान करून प्रचारसभेत हजेरी लावली होती आणि बंगाली गाण्यांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
या परिस्थितीत, टागोरांच्या जयंतीदिवशी शपथविधी घेणे हा केवळ राजकीय कार्यक्रम न राहता एक सांस्कृतिक संदेश ठरू शकतो. भाजप बंगालवर राज्य करायला नाही, तर बंगालचा एक अविभाज्य भाग व्हायला आलेला पक्ष आहे, असा संदेश भाजपाला द्यायचा आहे, अशी माहिती भाजपातील एका वरिष्ठ फळीतील नेत्याने दिली.
बदलाचा नवा अध्याय
या निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बंगालमध्ये ४९ वर्षे अखंड चाललेला डाव्या पक्षांचा आणि त्यानंतर टीएमसीचा सत्ताकाळ संपुष्टात येणे.
१९७७ पासून सुरू झालेला डाव्या आघाडीचा काळ, आणि २०११ पासून सुरू झालेली ममता बॅनर्जी यांची सत्ता; या दोन्ही टप्प्यांनी बंगालच्या राजकारणावर सखोल परिणाम केला. आता प्रथमच राज्यात उजव्या विचारसरणीचे सरकार सत्तेवर येणार आहे.
मुख्यमंत्री कोण? सर्वात मोठा सस्पेन्स
या विजयाइतकाच मोठा प्रश्न म्हणजे भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार? पक्षाने संपूर्ण प्रचारादरम्यान मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. त्यामुळे आता अनेक नावे चर्चेत आहेत. स्थानिक बंगाली नेतृत्वाला संधी देण्याचा पक्षाचा कल दिसत असला, तरी अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडूनच होणार आहे.
पुढे काय?
आता सर्वांचे लक्ष पुढील काही दिवसांतील घडामोडींवर केंद्रित झाले होते:
- ममता बॅनर्जींचा राजीनामा केव्हा येणार?
- राज्यपाल सत्तास्थापनेसाठी भाजपाला केव्हा आमंत्रित करणार?
- भाजप मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचे नाव जाहीर करणार?
- आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शपथविधी ९ मेलाच होणार का?
तारीख कोणतीही असली, तरी क्षण ऐतिहासिकच
आता ही ९ मेची तारीख गाठण्यासाठी राज्यपालांनी कालच ममता बॅनर्जी यांचे सरकार बरखास्त केले. एकूणात आज ९ मे रोजी पश्चिम बंगालमध्ये होणारा हा भाजपाचा मंत्रिमंडळाचा शपथविधी ऐतिहासिक ठरणार हे निश्चित. पंतप्रधान मोदी यांनी निकालानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले होते की, “पश्चिम बंगालमध्ये सूर्य उगवला आहे, ज्याची अनेक पिढ्यांनी आतुरतेने वाट पाहिली.” या विधानाचा अर्थ केवळ सत्ताबदल नाही, तर बंगालच्या राजकीय आणि सांस्कृतिक प्रवाहात होणारा मोठा बदल असा घेतला जात आहे. हा नवा अध्याय आज ‘पोचिशे बोईशाख’सारख्या सांस्कृतिक महत्त्वाच्या दिवशी सुरू होणार आहे. अर्थात म्हणूनच आजचा हा दिवस बंगालच्या राजकारणात ऐतिहासिक म्हणून नोंदवला जाईल.
