Ajay Pal Sharma vs Jahangir Khan Clash in West Bengal : उत्तर प्रदेशातील ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे पोलिस अधिकारी अजय पाल शर्मा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच त्यांनी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांच्या घरावर धाड टाकून झाडाझडती घेतली. या कारवाईनंतर संतापलेल्या खान यांनी ‘सिंघम’ आणि ‘पुष्पा’ चित्रपटांचा संदर्भ देत शर्मा यांना अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला, त्याविषयीचा हा आढावा..

पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोगाने राज्यात ११ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यापैकी तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्याची जबाबदारी अजय पाल शर्मा यांच्याकडे देण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी शर्मा यांच्यावर आपल्या अधिकारांच्या मर्यादेबाहेर जाऊन काम केल्याचा आरोप केला. त्या संदर्भात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यात शर्मा हे आचारसंहितेचे उल्लंघन करीत असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, उच्च न्यायालयाने या याचिकेवर तूर्तास सुनावणी घेण्यास नकार दिला. शर्मा यांच्या आक्रमक कार्यपद्धतीमुळे तृणमूल काँग्रेसच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरल्याचे सांगितले जाते.

शर्मा यांनी नेमका काय इशारा दिला?

सोमवारी अजय पाल शर्मा यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये ते जहांगीर खान यांच्या घरी छापेमारी करताना दिसून आले. मतदारांना धमकावल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. या कारवाईदरम्यान खान हे त्यांच्या घरी नव्हते; पण त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला. व्हिडीओमध्ये शर्मा म्हणताना दिसतात की, नीट ऐकून घ्या, जर काही गडबड झाली तर असा उपचार करेन की नंतर रडूनही काही उपयोग होणार नाही. जहांगीर याची माणसे मतदारांना धमकावत असल्याची माहिती मला प्राप्त झाली आहे. त्याला सांगा, जर हे थांबले नाही तर मी प्रत्येक गोष्टीची नोंद घेऊन अशी कारवाई करेन की नंतर रडणेही त्याला वाचवू शकणार नाही.

जहांगीर खान यांचा आक्रमक पवित्रा

अजय पाल शर्मा यांच्या या इशाऱ्याला उत्तर देताना जहांगीर खान यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ‘सिंघम’ आणि ‘पुष्पा’ चित्रपटांचा संदर्भ दिला. काही अडचण असेल तर पोलिस निरीक्षकांनी स्थानिक पोलिस अधीक्षकांना कळवायला हवे, पण ते (शर्मा) थेट केंद्रीय दलासह माझ्या घरात घुसले. आम्ही फक्त जनतेसमोर झुकतो, त्यांच्यासमोर नाही. हे बंगाल आहे; जर अजल पाल शर्मा हे ‘सिंघम’ असतील तर मी ‘पुष्पा’ आहे. उत्तर प्रदेशातील भाजपा नियुक्त अधिकाऱ्यांची कोणतीही धमकी किंवा जबरदस्ती फाल्टा मतदारसंघात चालणार नाही, असा इशाराच जहांगीर खान यांनी दिला.

चंद्रिमा भट्टाचार्य यांचा तीव्र संताप

या प्रकरणावर पश्चिम बंगालच्या कॅबिनेट मंत्री आणि टीएमसी नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनीही तीव्र संताप व्यक्त केला. “पोलिस अधिकारी अजय पाल शर्मा यांना उत्तर प्रदेशात ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हटले जाते. अशा व्यक्तीला पश्चिम बंगालमध्ये का पाठवण्यात आले? ते आमच्या उमेदवाराच्या घरात घुसून धमकावत आहेत, जेव्हा शर्मा यांच्यासह पोलिसांनी खान यांच्या घराची झाडाझडती घेतली, तेव्हा घरात फक्त महिलाच होता. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पोलिस निरीक्षकाने ‘डोळे आणि कान’ उघडे ठेवून काम करायचे असते; पण शर्मा हे तर लोकांनाच धमकावत असल्याने आम्ही याचा निषेध करतो”, अशी टीका चंद्रिमा भट्टाचार्य यांनी केली.

अजय पाल शर्मा वादाच्या भोवऱ्यात

उत्तर प्रदेशात ‘सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे अजय पाल शर्मा आपल्या कार्यपद्धतीमुळे जितके चर्चेत राहिले आहेत, तितकेच त्यांच्याशी संबंधित वादही आता समोर येत आहेत. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यानंतर शर्मा हे अचानक प्रकाशझोतात आले होते. सध्या ते पोलिस उपमहानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. मात्र, तृणमूल काँग्रेसने त्यांच्या भूतकाळातील वादांवरून भाजपाला घेरले आहे. “निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशातील कुख्यात ‘सिंघम’ आणि योगी आदित्यनाथ यांचे लाडके ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ अजय पाल शर्मा यांची नियुक्ती केली आहे. हे तेच अधिकारी आहेत, जे ‘ठोक दो’ मानसिकतेसाठी ओळखले जातात. जानेवारी २०२० मध्ये रामपूरचे पोलिस अधीक्षक असताना शर्मा यांचे नाव एका घोटाळ्यात आले होते, त्यानंतर उन्नाव येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांची बदली करण्यात आली होती. तत्कालीन भाजपा सरकारलाही त्यांच्याविरोधात चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी लागली होती,” असे तृणमूल काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अखिलेश यादव नेमके काय म्हणाले?

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही अजय पाल शर्मा यांच्या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. “भाजपाने पश्चिम बंगालमध्ये निरीक्षकांच्या नावाखाली आपले एजंट पाठवले आहेत, पण याचा काहीही उपयोग होणार नाही, तिथे दीदींची सत्ता आहे आणि यापुढेही राहणार, असे अखिलेश यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. मूळचे पंजाबमधील लुधियाना येथील रहिवासी असलेले अजय पाल शर्मा सध्या प्रयागराज येथे ‘अतिरिक्त पोलिस आयुक्त’ (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून कार्यरत आहेत. पोलिस दलात रुजू होण्यापूर्वी त्यांनी ‘बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी’ (BDS) ही पदवी घेतली होती. पेशाने डॉक्टर असूनही त्यांची ओळख उत्तर प्रदेशातील सर्वात आक्रमक पोलिस अधिकाऱ्यांपैकी एक अशी आहे. आता त्यांच्या बंगालमधील सक्रियतेमुळे निवडणूक आयोग आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.