West Bengal Election BJP vs TMC Battle : देशातील विविध राज्यात भाजपाला अनपेक्षित यश मिळाले असले तरीही पश्चिम बंगालमध्ये पक्षाला अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एकदा आपल्या सहकाऱ्यांनी बोलताना याबाबत एकदा खंतही व्यक्त केली होती. त्यांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्व होते. कारण, पश्चिम बंगाल हे जनसंघाचे दिवंगत नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे मूळ कार्यक्षेत्र आहे. १९५१ मध्ये त्यांनी याच राज्यातून भारतीय जनसंघाची स्थापना केली, जो पुढे भारतीय जनता पक्ष म्हणून उदयास आला. विशेष म्हणजे, वाजपेयी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात डॉ. मुखर्जी यांचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून केली होती. जनसंघाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे पहिले धडे गिरवले होते. त्यामुळेच पक्षाच्या विचारधारेची पाळेमुळे असलेल्या राज्यात भाजपाला पाय रोवण्यासाठी इतका संघर्ष करावा लागत आहे, ही सल वाजपेयींच्या मनात शेवटपर्यंत कायम होती.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज (बुधवारी) मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा राज्यात मोठी झेप घेण्याच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बंगालमध्ये भाजपाची सत्ता येईल की नाही, हे अद्याप स्पष्ट नसले तरीही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पक्षाच्या कामगिरीत मोठी सुधारणा होईल, असे कयास बांधले जात आहेत. २०२१ मध्ये भाजपाने बंगालमधील २९४ पैकी ७७ जागा जिंकल्या होत्या; तर २०१६ मध्ये हा आकडा केवळ तीन जागांपुरताच मर्यादित होता. यादरम्यान २०२६ मध्ये २००६ ची पुनरावृत्ती होईल की २०११ चा इतिहास पुन्हा लिहिला जाईल? असा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चिला जात आहे.

२००६ मध्ये ममता बॅनर्जी यांना राज्यात सत्ता मिळवण्याची खात्री होती. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली डाव्यांनी २३५ जागा जिंकून विक्रमी यश मिळवले. त्यानंतर सिंगूर आणि नंदीग्राममधील जमीन अधिग्रहण विरोधी आंदोलनांनी राज्याची समीकरणे झपाट्याने बदलली. ममता बॅनर्जी यांनी या संधीचे सोने केले आणि २०११ मध्ये राज्यातील डाव्यांची ३४ वर्षांची सत्ता संपुष्टात आली. अटल बिहारी वाजपेयी यांचे पश्चिम बंगालमधील सत्तास्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. गेल्या पाच वर्षांत पक्षाने राज्यात आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. मात्र, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या तुलनेत भाजपाचे पक्ष संघटन अजूनही कमकुवत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

गेल्या काही वर्षांत राज्यातील बेरोजगारीचा दर वाढल्याने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात सर्वच स्तरांमध्ये नाराजी आहे. याच मुद्द्याला हाताशी धरून भाजपाने सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. सत्ताविरोधी लाटेची भावना भाजपाच्या पथ्यावर पडू शकते, अशीही चर्चा रंगू लागली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेत्यांकडून विकासाची कोणतीही कामे होत नसल्याचा आरोप राज्यातील अनेक मतदारांनी केला आहे. दुसरीकडे, भाजपाने ममता बॅनर्जी यांच्यावर ‘मुस्लिम तुष्टीकरणाचा’ आरोप करत हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला आहे. ‘घुसखोर’ विरोधातील भाजपाच्या घोषणेला राज्याच्या काही भागांत हिंदूंचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. फाळणीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे उच्चवर्णीय समाजातील काहींमध्ये असलेली मुस्लिमविरोधी भावना आता उघडपणे बाहेर येत आहे. दक्षिण २४ परगणा या तृणमूलच्या बालेकिल्ल्यातही मुस्लीम महिलांनी मान्य केले की, राज्यात पूर्वी हिंदू-मुस्लीम असा भेदभाव नव्हता; पण आता तो वाढतच चालला आहे.

पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येण्यासाठी भाजपाने जोर लावला असला तरीही हिंदी पट्ट्यात दिसणारे आक्रमक हिंदुत्व येथे अद्याप पूर्णपणे रुजलेले नाही. बंगालमधील हिंदू समुदायावर स्वामी विवेकानंद व रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा मोठा प्रभाव असल्याचे दिसून येते. राज्यातील धर्म आणि संस्कृती एकमेकांत मिळलेली असल्याने येथे हिंदू-मुस्लिमांचे ध्रुवीकरण होणे जवळपास अशक्य मानले जाते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यंदाच्या निवडणूक प्रचारात बंगाली अस्मितेचा मुद्दा अत्यंत जोरकसपणे मांडला आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर ठाम आहे. त्यामुळेच बंगालमधील ही लढत काही अंशी ‘हिंदू राष्ट्रवाद विरुद्ध बंगाली राष्ट्रवाद’ अशीही झाली आहे. राज्यात भाजपाचे सरकार आल्यास दिल्लीतून राज्यकारभार चालवला जाईल, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात आहे.

गेल्या वेळच्या चुकांमधून शिकत भाजपाने यंदा राज्यात आपल्या प्रचाराची रणनीती बदलली आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वगळता भाजपाने मुख्य सभांमध्ये हिंदी भाषिक नेत्यांना फारसे स्थान दिले नाही. पश्चिम बंगालमधील भाजपाचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांनी पडद्यामागून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला. भाजपासमोरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे, पक्षाकडे राज्याचा चेहरा म्हणून ओळखला जाणारा कोणताही खंबीर बंगाली नेता नाही. त्यामुळे ही लढत थेट ‘दीदी विरुद्ध मोदी’ अशीच रंगली आहे. तसेच, यंदाच्या निवडणुकीत मतदारांच्या याद्यांमधील बदल आणि त्यावरून निर्माण झालेला असंतोष हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसने या प्रक्रियेला विरोध असतानाच भाजपाने त्याचे समर्थन केले आहे. एकंदरीत आक्रमक भाजपा आणि तितक्याच जिद्दीने पाय रोवून उभ्या असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यातील या संघर्षात नेमकी कोण बाजी मारणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.