West Bengal Assembly Election 2026: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. २३ एप्रिल व २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे. पश्चिम बंगालमधील प्रेसिडेन्सी विभाग हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या विभागात विधानसभेचे एकूण १११ मतदारसंघ आहेत. भाजपाने तृणमूल काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. ममता बॅनर्जींच्या गडाला सुरूंग लावून सत्तेत येण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. प्रेसिडेन्सी विभागात ममता बॅनर्जींचे वर्चस्व कसे आहे? हा विभाग ममता बॅनर्जींसाठी सत्तेचा मार्ग कसा मोकळा करतो? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

तृणमूल काँग्रेसची प्रेसिडेन्सी विभागावर घट्ट पकड

प्रेसिडेन्सी विभाग हा पश्चिम बंगालमधील पाच प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. या विभागात उत्तर कोलकाता, दक्षिण कोलकाता, हावडा, नादिया, उत्तर २४ परगणा आणि दक्षिण २४ परगणा या महत्वाच्या जिल्ह्यांचा समावेश होतो. २०११ मध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पहिल्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर या विभागातील मतदारसंघांवरील पकड मजबूत केली आहे. उत्तर आणि दक्षिण कोलकात्यामध्ये विधानसभेच्या एकूण १४ जागा आहेत. तर हावडा जिल्ह्यात १६, नादियामध्ये १७, उत्तर २४ परगणामध्ये ३३ आणि दक्षिण २४ परगणामध्ये ३१ जागा आहेत.

माकपचे वर्चस्व टीएमसीने कसे संपवले?

२००६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत माकप (CPI-M) च्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने प्रेसिडेन्सी विभागातील विधानसभेच्या एकूण १११ जागांपैकी ७२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये २०११ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडीने प्रेसिडेन्सी विभागातील विधानसभेच्या ८९ जागांवर विजय मिळवला. माकपचे या भागातील वर्चस्व संपवले. त्यानंतर २०१६ व २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने प्रेसडेन्सी विभागात १११ पैकी अनुक्रमे ९१ व ९६ जागा जिंकल्या. दरम्यान, २०२१ मध्ये भाजपाने पश्चिम बंगालमध्ये मोठी मजल मारत प्रमुख विरोधी पक्ष होण्याची किमया साधली. भाजपाने विधानसभेच्या ७७ जागा जिंकल्या होत्या.

प्रेसिडेन्सी विभाग आणि मुख्यमंत्री

प्रेसिडेन्सी विभाग हा पश्चिम बंगालच्या राजकारणात सर्वात महत्वाचा मानला जातो. याच विभागातून पश्चिम बंगालच्या पाच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. माकपचे (सीपीआय – एम) ज्योती बसू यांनी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बरानगर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी सातगाछिया मतदारसंघातून निवडणूक लढवली. ज्योती बसू यांनी सलग पाचवेळा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री पद सांभाळले. माकप (सीपीआय-एम) चेच बुद्धदेव भट्टाचार्य यांनी देखील याच विभागातील मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी दोन वेळा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री पद सांभाळले.

अल्पसंख्याक समुदाय टीएमसीची व्होट बँक?

पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०११, २०१६ आणि २०२१ च्या पोटनिवडणुकीत कोलकात्याच्या भवानीपूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. प्रेसिडेन्सी विभागातील हावडा, उत्तर आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक समुदाय मोठ्या संख्येने आहे. या समुदायाला ममता बॅनर्जींच्या टीएमसी पक्षाची व्होट बँक मानले जाते. “प्रेसिडेन्सी विभागातील १११ जागांवर आमचा विजय होणार हे निश्चित आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्ही या भागांत तसेच संपूर्ण बंगालमध्ये आमची स्थिती मजबूत केली आहे. हा आमचा सर्वात भक्कम बालेकिल्ला आहे. त्यामुळे भाजपा पश्चिम बंगालमध्ये आम्हाला पराभूत करण्याचा विचार तरी कसा करू शकतो?”, असा सवाल टीएमसीच्या एका वरीष्ठ नेत्याने उपस्थित केला आहे.

भाजपाचे मतुआ समाजावर लक्ष ?

भाजपाने तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या प्रेसिडेन्सी विभागातील १११ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. उत्तर २४ परगणा व नादिया या दोन जिल्ह्यांमध्ये मतुआ समाज मोठ्या प्रमाणात असून हा समाज भाजपाचा मतदार मानला जातो. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने प्रेसिडेन्सी विभागात १११ पैकी फक्त १४ जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी ९ जागा ह्या एकट्या नादिया जिल्ह्यात जिंकल्या होत्या. तर उर्वरित ५ जागा भाजपाने उत्तर २४ परगणा जिल्ह्यात जिंकल्या होत्या.

टीएमसीकडून बोगस मतदान आणि गैरप्रकार, भाजपाचा आरोप

भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, “प्रेसिडेन्सी विभागात तृणमूल काँग्रेसच्या विरोधात भाजपाची संघटनात्मक बांधणी कमकुवत आहे. तृणमूल काँग्रेसने या भागात आपली यंत्रणा सक्रिय करत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केले व बोगस मतदान केले. पण, यावेळी त्यांना तसे करता येणार नाही. निवडणूक आयोगाने कर्तव्याचे पालन केले तर या विभागात आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळतील. आम्ही केवळ दक्षिण २४ परगणा आणि हावडा जिल्ह्यातच जिंकणार नसून प्रेसिडेन्सी विभागातील निम्म्याहून अधिक जागांवर विजय मिळवू.”

भाजपाची व्होट बँक तृणमूल काँग्रेसला समर्थन देणार, टीएमसीचा दावा

भाजपचे राज्यसभा खासदार राहूल सिन्हा म्हणाले, “यावेळची निवडणूक पूर्णपणे वेगळी आहे. निकाल पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटेल. तृणमूलचे बालेकिल्ले निवडणुकीनंतर कसे ढासळतात, ते तुम्हाला पाहायला मिळेल. लोक बदल घडवून आणण्यासाठी मतदान करतील.” तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते अरुप चक्रवर्ती म्हणाले, “मतदारयाद्यांच्या फेरतपासणीमुळे लोकांमध्ये भाजपा विरोधात संताप आहे. त्यामुळे प्रेसिडेन्सी विभागात आमच्या जागा आणखी वाढतील. या भागातील मतुआ समुदायाने गेल्या निवडणुकीत भाजपला मतदान केले होते, परंतु आता या ‘एसआयआर’ (SIR) मुळे त्यांनाच सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे.” एसआयआरमुळे भाजपाची व्होट बँक देखील तृणमूल काँग्रेसला समर्थन देईल, असे अरूप चक्रवर्ती म्हणाले.