Mamata Banerjees election strategy बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता भाजपा पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू येथील निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू करणार आहे. बिहारप्रमाणेच या राज्यांमध्येदेखील एनडीए सत्ता स्थापन करील, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. परंतु, पश्चिम बंगालमध्ये भाजपासमोर अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विशेष सखोल फेरतपासणीवर (एसआयआर) तीव्र आक्षेप घेताना दिसत आहेत. सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस (टीएमसी) भारताच्या निवडणूक आयोगाकडून चालवल्या जाणाऱ्या या प्रक्रियेच्या विरोधात आहे. मात्र, असे असले तरी त्यांचे हजारो कार्यकर्ते संपूर्ण राज्यात पसरले आहेत.
हे कार्यकर्ते मतदारांना फॉर्म भरण्यास, आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यास आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे फॉर्म जमा करण्यास मदत करण्यासाठी ते घरोघरी जात आहेत. या माध्यमातून, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने मतदारांशी संपर्क साधला आहे. ते लोकांना सरकारने सुरू केलेल्या योजनांची माहिती देत आहेत आणि त्यांना आणखी काय हवे आहे, हे विचारत आहेत. अशा प्रकारे तृणमूल काँग्रेसने आपला निवडणूक प्रचार सुरू केला आहे. या संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेसकडून केला जात आहे. भाजपाच्या पराभवासाठी ममता बॅनर्जींची रणनीती काय? एसआयआरमुळे भाजपाच्या अडचणी वाढणार का? समजून घेऊयात…
पश्चिम बंगालमधील ‘एसआयआर’चा मुद्दा
विशेष सखोल फेरतपासणीने (एसआयआर) पश्चिम बंगालमधील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. राज्यातील कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीत मागे राहायचे नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील मतदारांची संख्या २००२ मधील ४.५८ कोटींवरून सध्या ७.६३ कोटींवर पोहोचली आहे म्हणजे ६६ टक्क्यांची वाढ झाली आहे. सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाल्यास ३.०५ कोटी नवीन मतदार यादीत समाविष्ट केले जाणार आहेत.
बंगालमधील मतदार यादीत वाढ
पश्चिम बंगालमधील नऊ जिल्हे असे आहेत, जेथे मतदारांची संख्या ७० टक्के किंवा त्याहून अधिक वाढली आहे. उत्तर दिनाजपूरमध्ये १०५.४९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. इतर जिल्हे जिथे मतदारांची संख्या वाढली आहे, ते खालीलप्रमाणे:
- मालदा: ९४.५८%
- मुर्शिदाबाद: ८७.६५%
- दक्षिण २४ परगणा: ८३.३०%
- जलपाईगुडी: ८२.३%
- कूचबिहार: ८२.३%
- उत्तर २४ परगणा: ७२.१८%
- नदिया: ७१.४६%
- दक्षिण दिनाजपूर: ७०.९४%
भाजपाकडून केला जातोय घुसखोरीचा आरोप
सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये म्हणजेच उत्तर दिनाजपूर, मुर्शिदाबाद, दक्षिण २४ परगणा, जलपाईगुडी व कूचबिहारमध्ये मतदारांच्या संख्येत ८० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे. त्यावरूनच भाजपाने घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला आहे. हे नवीन मतदार घुसखोर असल्याची टीका भाजपाकडून केली जात आहे. भाजपाने आरोप केला आहे की, लोकसंख्यावाढीचे कारण बांगलादेशी मुस्लीम आहेत, जे बांगलादेशातून बेकायदा पद्धतीने आले आहेत. भाजपाने त्यांची ओळख पटवून त्यांना परत पाठवण्याची शपथ घेतली आहे.
दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे म्हणणे आहे की, त्यात बहुतेक हिंदू आहेत, जे धार्मिक अत्याचारातून वाचण्यासाठी शेजारच्या देशातून स्थलांतरित झाले आहेत. तृणमूल काँग्रेसने भाजपाला असाही प्रश्न विचारला आहे की, जर बांगलादेशी घुसखोर आलेच असतील, तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या केंद्र सरकारला त्यांना रोखण्यात अपयश का आले? आपल्या वक्तव्यांनी ममता बॅनर्जी भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ममता बॅनर्जींकडून एसआयआरचा विरोध
मतदार यादीत फेरफार केल्याचा आणि एका विशिष्ट समुदायाचा मतदानाचा हक्क रोखण्यासाठी त्यांना लक्ष्य केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केला आहे. त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. त्यांनी बोंगाव येथे एसआयआरविरोधी सभेला संबोधित केले. त्यांनी लोकांना आश्वासन दिले की कोणीही त्यांची नावे मतदार यादीतून हटवू शकत नाही. कारण- निवडणूक आयोगाला एकही नाव वगळण्याचा अधिकार नाही.
बिहारचे नाव न घेता, त्यांनी सांगितले की, त्यांना शेजारच्या राज्यातील भाजपाचा खेळ माहीत आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपाला आव्हान दिले की, जर त्यांना किंवा त्यांच्या लोकांना बंगालमध्ये लक्ष्य केले गेले, तर त्या देशभरात रस्त्यावर उतरतील आणि संपूर्ण देशाला हादरवून सोडतील. विश्लेषकांचे मत आहे की, तृणमूल काँग्रेस या संधीचा फायदा घेत आहे. परिणामी एसआयआरचा मुद्दा आगामी निवडणुकीत भाजपासाठी अडचणीचा ठरू शकतो.
