पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी २३ व २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत आहेत. यंदा प्रचारासाठी २०२१ च्या तुलनेत कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे पारंपरिक व आधुनिक पद्धतींचा वापर उमेदवार करत आहेत. रॅली, सभांचे आयोजन केले जात आहे. मतदारांची दाढी करणे, घरात जाऊन पोळ्या लाटणे, मतदारांबरोबर खेळात सहभागी होणे, अशी कामे उमेदवार प्रचारादरम्यान करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांआधी वातावरण कसे आहे? प्रचारासाठी उमेदवार काय काय करत आहेत? ते जाणून घेऊयात.
विद्यमान आमदार करताहेत मतदारांची दाढी, कटिंग
तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) उमेदवार नरेश चंद्र बाऊरी हे बीरभूम जिल्ह्यातील दूब्रजपूर मतदारसंघात उभे आहेत. मागील आठवड्यात ईदच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रचारा दरम्यान ‘हंडी फोड’ या खेळात सहभाग घेतला. डोळ्यांवर पट्टी बांधून फोडावी लागणारी हंडी त्यांना फोडता आली नाही, तेव्हा भाजपाला निवडणुकीत असे पराभूत करायचे आहे, असा संदेश त्यांनी मतदारांना दिला. दूब्रजपूर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. बाऊरी यांच्यासमोर विद्यमान भाजपा आमदार अनूप कुमार साहा यांचे आव्हान आहे. साहा यांनी कटिंगच्या दुकानात जाऊन हातात कात्री आणि ब्लेड घेऊन मतदारांची दाढी करत प्रचार केला. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
आमदार असूनही माझे पाय जमिनीवर आहेत, हे मतदारांना दाखवून देणे हा माझा उद्देश होता, असे कटिंगच्या दुकानात जाऊन मतदारांची दाढी करणारे भाजपा आमदार अनूप कुमार साहा म्हणाले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला ते म्हणाले, “सगळ्यांशी संवाद साधणे माझ्यासाठी महत्वाचे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दाढी करण्यासाठी खूर्चीवर बसते, त्यावेळी मला त्याच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. कटिंग करणाऱ्यांबद्दल माझ्यात असलेला आदरयुक्त भाव मी यातून दाखवतोय. आपल्याला बदल आवश्यक आहे, हे मी मतदारांना सांगतोय”, असे साहा म्हणाले.
टीएमसीचे उमेदवार नरेश चंद्र बाऊरी हे २०१६ मध्ये दूब्रजपूरमधून निवडून आले होते. त्यानंतर २०२१ मध्ये दूब्रजपूरमधून बाऊरी यांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे या जागेवर भाजपाचे साहा निवडून आले. दरम्यान, दूब्रजपूर हा टीएमसीचा बालेकिल्ला मानला जात होता.
मातीच्या घरात जाऊन केला चुलीवर स्वयंपाक
तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षाचे उमेदवार पार्थ हजारी हे हुगळी जिल्ह्यातील परसुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पार्थ हजारी यांनी मतदारांच्या घरात जाऊन मातीच्या चुलीवर स्वयंपाक करत पोळ्या केला. ते ज्या घरात गेले त्या घरातील गॅस संपला होता. पार्थ हजारी यांनी एलपीजी टंचाईबद्दल भाजपावर टीका केली. हा मुद्दा उचलून धरणार असल्याचे ते म्हणाले. “मी या आधीही पोळ्या केल्या आहे. सध्या अनेक कुटुंब गॅस सिलिंडर नसल्यामुळे त्रास सहन करत आहेत. मी फक्त त्यांना एक मदत करण्याचा प्रयत्न केला. एका ‘लोकल बॉय’ला उमेदवारी दिल्याने इथल्या लोकांमध्ये उत्साह आहे. मी या भागातील मुलगा आहे. लोकांनी मला ओळखावे म्हणून मी प्रत्येकाच्या घरी गेलो”, असे हजारी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला म्हणाले.
दरम्यान, परसुरा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान आमदार बिमान घोष पुन्हा निवडणूक लढवत आहेत. प्रचारादरम्यान ते एका शेतात पेरणी करताना आढळून आले. ग्रामीण मतदारांशी असलेले संबंध दाखवून दिल्याचे ते म्हणाले.
उमेदवाराने शेण उचलून थापल्या गौऱ्या
अरामबाग मतदारसंघातील हतबसंतपूर भागात टीएमसीने मिता बाग यांना उमेदवारी दिली आहे. मिता बाग यांनी प्रचारादरम्यान एका मतदाराला गाईचे शेण उचलण्यात मदत केली. त्या शेणाच्या गौऱ्या बनवण्याचे काम तो मतदार करत होता. त्यावेळी टीएमसीच्या उमेदवारांनी ‘जय बांगला’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर त्याच भागात एक ८० वर्षांचा वृद्ध त्यांच्या प्रचारात सहभागी झाला. प्रचारात तो नाचू लागला. त्यावेळी मिता बाग यांनी त्याचा उत्साह पाहून आनंद व्यक्त केला. मिता बाग म्हणाल्या, “मी कायम आनंदी असते. मी लोकांना आपलं समजून लोकांमध्ये मिसळते. त्यामुळे हे माझ्यासाठी काहीच नाही”, असे बाग म्हणाल्या.
भाजपा उमेदवाराने निकालाआधीच लावून घेतला गुलाल
झारग्राम जिल्ह्यातील गोपीवल्लभपूर मध्ये भाजपाने राजेश महातो यांना उमेदवारी दिली आहे. प्रचारादरम्यान ग्रामीण भागातील मतदारांबरोबर महातो हे भक्तीगीतांचा आनंद लुटताना दिसून आले. तसेच निवडणुकीत जिंकण्याआधीच ते गुलालाने माखलेले दिसून आले. प्रचारादरम्यान महातो यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाचा वापर केला. घरोघरी गुलाल घेऊन महातो यांनी प्रचार केला. दरम्यान, गोघाट मतदारसंघ सध्या भाजपाकडे आहे. या मतदारसंघात टीएमसीने निर्मल माझी यांना उमेदवारी दिली आहे. निर्मल माझी हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. एका खेड्यातील मतदाराच्या मातीच्या घरात ते स्वयंपाक करताना आढळून आले. तसेच मतदारांची स्टेथस्कॉपच्या सहाय्याने आरोग्य तपासणी त्यांनी केली. गोघाटमधील भाजपा उमेदवार प्रशांत दिगार हे बटाट्याच्या शेतात आढळून आले. बटाटे लावण्यात ते शेतकऱ्यांना मदत करत होते.
पश्चिम बंगालमध्ये अशाप्रकारे सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या प्रकारच्या क्लृप्तींचा वापर करत आहेत. कोणी न्हाव्याच्या दुकानात, कोणी बटाट्याच्या शेतात, कोणी शेण उचलताना, कोणी पोळ्या लाटताना आढळून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये २३ व २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
