पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काल (२९ एप्रिल) दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रचारादरम्यान भाजपाशी झुंज दिली. बुधवारी (काल) सकाळी मतदानाला सुरूवात झाल्यानंतर ममता यांनी त्यांचे कोलकात्यातील कालीघाट येथील निवासस्थान सोडले. त्या चेटला जिल्ह्यात दाखल झाल्या. चेटलाचे महापौर व ममता यांचे सहकारी फिरहाद हाकीम यांची ममतांनी भेट घेतली. हाकीम विधानसभा निवडणूक लढवत आहेत. ममता व हाकीम यांनी चेटलातील एका मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली. पाहणीनंतर ममता म्हणाल्या, मतदानासाठी “बाहेरून आलेले” काही पोलीस पर्यवेक्षक भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत.
“लोकांना त्यांचे मतदान करायचे आहे. अशा प्रकारे मतदान होईल का? ते (पर्यवेक्षण करणारे पोलिस) भाजपाच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. निवडणूक आयोग उघडपणे आमचा छळ करतोय. आम्ही न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस त्यांना बजावली, पण तरीही बाहेरून असंख्य पर्यवेक्षक आणले जात आहेत”, असे ममता बॅनर्जींनी त्यांच्या निवासस्थानापासून त्यांच्या बरोबर तिथपर्यंत आलेल्या पत्रकारांना सांगितले.
ममता बॅनर्जींचे गंभीर आरोप
चेटला येथून ममता बॅनर्जी त्यांच्या भवानीपूर मतदारसंघातील चक्रबेरीया भागात दाखल झाल्या. तिथे त्यांनी तृणमूल काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य अशीम बासू यांची भेट घेतली. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा मंगळवारी रात्री घरात घुसल्याचा आरोप बासू यांनी केला. “मी काल रात्री झोपू शकलो नाही. ते आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि एजंट्सना थेट लक्ष्य करत होते. कायदेशीर वॉरंट नसताना मध्यरात्री छापेमारी केली जात होती. आमच्या कार्यकर्त्यांना खोट्या आरोपांखाली ताब्यात घेतले जात होते. मतदानाशी संबंधित कर्तव्यांपासून कार्यकर्त्यांना रोखले जात होते”, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बासू यांची भेट घेतल्यानंतर सांगितले. “भाजपाकडून भय दाखवण्याचे राजकारण होत आहे. दबाव आणि सुरक्षा यंत्रणांचा निर्दयीपणे वापर केल्याने बंगालमध्ये काहीही परिणाम होणार नाही. जितका तुम्ही आमचा छळ कराल, तितकेच मजबूत आम्ही बनू”, असे ममता म्हणाल्या.
ममता बॅनर्जी व सुवेंदू अधिकारी समोरासमोर
चक्रबेरीया भागात ममता बॅनर्जी या त्यांच्या समर्थकांसह असताना, त्याचवेळी पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते, भाजपाचे नेते व ममतांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुवेंदू अधिकारी तिथे दाखल झाले. त्यांच्याबरोबर सीआरपीएफचा मोठा फौजफाटा होता. तृणमूल काँग्रेस व भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला. “ममता इतक्या लोकांना घेऊन का फिरत आहेत?”, असा सवाल अधिकारी यांनी उपस्थित केला. “लोक मतदानासाठी बाहेर पडले आहेत. बदल घडवून आणण्यासाठी ते मतदान करत आहेत. भवानीपूरमध्ये ९० टक्के मतदान होईल, अशी मला अपेक्षा आहे. यावेळी भाजपाचे एजंट्स सर्वच मतदान केंद्रांवर बसू शकत आहेत”, असे सुवेंदू अधिकारी म्हणाले. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत अधिकारी यांनी ममतांचा नंदिग्राम मतदारसंघातून पराभव केला होता. यावेळी सुवेंदू अधिकारी हे दोन ठिकाणांहून – नंदिग्राम आणि भवानीपूरमधून निवडणूक लढत आहेत. भवानीपूरमध्ये त्यांची लढत ममता बॅनर्जी यांच्याविरोधात आहे.
सुवेंदू अधिकारी मतदान केंद्रावर पोहोचताच राडा
भवानीपूरमधील जय हिंद भवन येथील मतदान केंद्रावर सुवेंदू अधिकारी आले असता तिथे उपस्थित तृणमूल काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जय बांगला, चोर-चोर अशा घोषणा दिल्या. त्या बदल्यात सुवेंदू अधिकारी यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून सीआरपीएफ जवानांना लाठीचार्ज करावा लागला. दुपारी घडलेल्या या घटनेने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पश्चिम बंगाल विधानसभेच्या दोन तृतीयांश जागा भाजपा जिंकेल, असा दावा अधिकारी यांनी केला. ७१ वर्षीय ममता बॅनर्जी या आता वृद्ध झाल्या आहेत, त्या माझ्याशी लढू शकत नाहीत. त्या २०० हून अधिक मतांनी त्यांच्या स्वत:च्या बूथवर पराभूत होतील, असेही सुवेंदू अधिकारी म्हणाले.
ममता बॅनर्जींनी काय दावा केला?
दुपारी सव्वा चारच्या सुमारास ममता बॅनर्जी मित्रा इन्स्टिट्युशनमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचल्या. त्यावेळी त्यांनी त्याच्या हाताने विजयाचे चिन्ह दर्शवले. तसेच पोलिसांपेक्षा त्या मतदान केंद्रावर केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान अधिक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. “सुरक्षा दलांकडून होणारा छळ अभूतपूर्व आहे. स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक होत नाहीए. सुरक्षा दलांनी देशाच्या सीमेवर असायला हवे. पण, त्याऐवजी ते एका विशिष्ट पक्षासाठी काम करत आहेत”, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी भाजपाचे नाव न घेता केला. “आम्ही दोन तृतीयांश बहुमत मिळवणार आहोत”, असे म्हणत त्या कालीघाट येथील निवासस्थानी रवाना झाल्या. भवानीपूरमध्ये दिवसभरात ८६.७४ टक्के मतदान झाल्याचे रात्री ११ वाजता घोषित करण्यात आले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे. भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी व भाजपाचे नेते तसेच विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी निवडणूक लढवत आहेत. एक्झिट पोलमधील आकडेवारीनुसार, बहुतांश निवडणूक अभ्यासकांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता येणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
