Motab Shaikh Congress Victory SIR Voter List Update: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यांच्या फेरतपासणीचा मुद्दा वादग्रस्त ठरला होता. एसआयआर सर्वेक्षणानंतर मतदारयाद्यांमधून अपात्र ठरलेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली होती. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला आहे. २०२१ मध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. ५८ वर्षीय काँग्रेसचे उमेदवार मोताब शेख यांचे नाव एसआयआर सर्वेक्षणानंतर मतदारयादीतून हटवण्यात आले होते. दरम्यान, मोताब शेख हे निवडणुकीत विजयी झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे लढवता आली निवडणूक

एसआयआर सर्वेक्षणानंतर मोताब शेख यांचे नाव मतदारयादीतून हटवण्यात आले होते. प्रकरणाचा निवाडा लवकरात लवकर करावा अशी मागणी करणारी याचिका शेख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी ५ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने मोताब शेख यांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवता आली. ६ एप्रिल रोजी मोताब शेख यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मोताब शेख ८ हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांना एकूण ६३ हजार ५० मते मिळाली. त्यांनी फराक्का मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या विद्यमान आमदाराचा पराभव केला. भाजपा दुसऱ्या क्रमांकावर, तर टीएमसी पक्ष थेट तिसऱ्या क्रमांकावर गेला.

“मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्तींपैकी एक”

विजयानंतर मोताब शेख यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्तींपैकी एक आहे. एसआयआर सर्वेक्षणानंतर मतदारयादीतून नाव हटवलेले पाहून मी आशा सोडून दिली होती. मला यापुढे कधीच मतदान करता येणार नाही, असे वाटत होते. पण, लोकांनी मला मत दिले. हा लोकांचा विजय आहे.” एसआयआर सर्वेक्षणानंतर फरक्का मतदारसंघात ३८ हजार २२२ मतदारांची नावे मतदारयादीतून हटवण्यात आली होती. जवळपास २७.१ लाख मतदारांची नावे पश्चिम बंगालमध्ये वगळण्यात आली. फराक्का मतदारसंघ असलेल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ११ लाखांहून अधिक नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत.

काँग्रेसने दुसरी जागा मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रानीनगर मतदारसंघात जिंकली आहे. तिथून जुल्फिकार अली हे २ हजार ७०१ मताधिक्याने विजयी झाले आहेत. तर त्यांना एकूण ७९ हजार ४२३ मते मिळाली. त्यांनी टीएमसीचे आमदार अब्दुल सौमिक हुसेन यांचा पराभव केला.

मोताब शेख यांच्या मनात निवडणूक लढवण्याबाबत शेवटपर्यंत शंका

मतदारयादीत नावाचा समावेश होईल की नाही, तसेच निवडणूक लढवण्यासाठी पात्र ठरू की नाही, याबाबत मोताब शेख यांना शंका होती. त्यांना प्रचारासाठी फक्त १४ दिवसांचा कालावधी मिळाला. “काँग्रेसने मला उमेदवारी देण्यासाठी बराच उशीर केला. त्यानंतर माझे नावच मतदारयादीतून हटवल्याचे समजले. मी फक्त अर्ध्याच मतदारसंघात प्रचार करू शकलो, मला आणखी वेळ मिळाला असता तर माझे मताधिक्य वाढले असते”, असे मोताब शेख म्हणाले. काँग्रेस प्रवक्ते सौम्या एैच रॉय म्हणाले, “मतदारयाद्या व्यवस्थितपणे तयार करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. पण, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोगाने मोताब यांना निवडणूक लढण्याची परवानगी दिली. मोताब यांचा विजय हा लोकांचा पक्षावर असलेला विश्वास दर्शवतो.”

“भ्रष्टाचारामुळे मतदारांनी टीएमसीला नाकारले”

मोताब शेख म्हणाले, “फारक्कामध्ये देखील काँग्रेसचे वर्चस्व होते. पण, त्यानंतर इथे टीएमसी जिंकली. टीएमसीचे आमदार लोकांसाठी काम करत नसल्याने त्यांना लोकांनी नाकारले आहे. त्यांच्या भ्रष्टाचारामुळे त्यांना नाकारण्यात आले. मी लोकांबरोबर आहे, त्यामुळे मला त्यांचा आशीर्वाद मिळाला आहे.” पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे फक्त दोनच आमदार निवडून आले आहेत व सत्ता भाजपाची आली आहे. त्यामुळे काम करणे सोपे जाईल का? असा प्रश्न मोताब यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “उगीचच संघर्ष करत राहण्यावर मला विश्वास नाही. आता भाजपाची सत्ता आली आहे. त्यामुळे नवीन सरकारबरोबर मिळून माझ्या मतदारसंघातील कामे करून घेणार आहे”, असे मोताब शेख म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात काय झाले? आधार कार्डने कसे वाचवले?

एसआयआर सर्वेक्षणानंतर मतदारयादीतून मोताब शेख यांचे नाव हटवण्यात आले होते. २००२ च्या मतदार यादीतील नाव आणि आताच्या कागदपत्रांवरील नावाच्या स्पेलिंगमध्ये फरक असल्याने मोताब यांचे नाव हटवण्यात आले होते. मोताब यांना पडताळणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पासपोर्ट व इतर कागदपत्रे दाखवली, पण तरीही त्यांचे नाव मतदार यादीत सामाविष्ट करण्यात आले नाही. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची तात्काळ सुनावणी करण्याचे आदेश न्यायाधिकरणाला दिले. न्यायाधिकरणाने आधार कार्डवरील नाव तपासून मोताब यांच्या बाजूने निकाल दिला. तसेच ओळख पडताळणी करण्यासाठी आधार कार्डचा वापर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिल्याचे न्यायाधिकरणाने सांगितले.

दरम्यान, आधार कार्डव्यतिरिक्त मोताब यांच्या २००१ च्या ड्रायव्हिंग लायसन्स व २०१८ च्या पासपोर्टवर त्यांचे नाव Motab Shaikh होते, असे न्यायाधिकरणाने सांगितले. काँग्रेस प्रवक्ते रॉय म्हणाले, “अनेक जणांना मतदान करता आले नाही, हे लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे.” मोताब शेख म्हणाले, “फरक्का किंवा इतर ठिकाणी ज्या मतदारांची नावे मतदारयादीतून हटवण्यात आली आहेत, त्यांनी नावे पुन्हा सामाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत”, असे आवाहन त्यांनी केले.