पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील बरुइपूर येथे एका ११ वर्षीय चिमुकलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. पीडितेचा मृतदेह रविवारी एका तळ्यात आढळून आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रभाश मंडल याचा पोलिसांनी काल मध्यरात्रीनंतर (७ जुलैच्या रात्री) एन्काउंटर केला आहे. गुन्हा कसा केला या सीन रिक्रिएट करण्यासाठी प्रभाश मंडलला घटनास्थळी नेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी आरोपीने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून एक गोळी पोलिसांच्या दिशेने झाडली व पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी प्रभाशचा मृत्यू झाला आहे.
११ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार व हत्या झाल्याची घटना समोर आल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तणाव निर्माण झाला होता. जाळपोळ तसेच झुंडबळीची एक घटना घडली. यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण तापले. तृणमूल काँग्रेस या प्रकरणाला जातीवादाचा रंग देत असल्याचे भाजपाने म्हटले. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासमोर राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण झाले. या बलात्कार व हत्या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. पीडितेच्या कुटुंबियांना न्याय दिला जाईल, तसेच दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिले. पीडितेच्या कुटुंबियांना आपल्याला भेटू दिले जात नसल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केला.
“त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळाली” – एन्काउंटर झालेल्या आरोपीची आई
या एन्काउंटर नंतर ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने प्रभाशची आई संध्या यांच्याशी संपर्क साधला. त्या म्हणाल्या, “त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळाली आहे.” तसेच त्याचा मृतदेह पाहण्याची आपली इच्छा नसल्याचे आपण पोलिसांना सांगितले आहे, असे त्यांनी म्हटले. त्या म्हणाल्या, “एक आई म्हणून मला दु:ख झाले. पण, आता मी शांत आहे. त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे.” प्रभाशचा मृतदेह स्वीकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले. “मला त्याला पाहायची इच्छा नाही. कोणीही तिकडे जाणार नाही. तो आमचं ऐकत नव्हता.”, असे सांगत प्रभाश हा व्यसनी होता, असेही त्या म्हणाल्या.

सुवेंदू अधिकारींकडून न्याय देण्याचे आश्वासन
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केल्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी सांगितले. ते म्हणाले, “दोन जणांना अटक करण्यात आली आहे, तर तिघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर मी पीडितेच्या वडिलांशी बोललो. त्यांना प्रशासनाकडून जी काही मदत हवी असेल ती पुरवली जाईल. त्यांना न्याय मिळेल.” दरम्यान, या प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे अधिकारी म्हणाले.
सुवेंदू अधिकारी पुढे म्हणाले, पीडितेच्या कुटुंबाला न्याय तसेच गुन्हेगारांना मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू. दरम्यान, एक झुंडबळीची घटनाही घडली आहे. या घटनेत आम्ही कोणालाही क्लिन चीट देत नाही, परंतु, या घटनेत जातीयवादाचा अँगल आहे. पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. रेल्वेही अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सगळ्या प्रकरणात जे सामील होते त्यांना याची किंमत मोजावी लागेल. जे काही करणे आवश्यक असेल ते आम्ही करू.
Our Chairperson, @MamataOfficial, wanted to visit Baruipur. Upon learning this, a massive deployment of police personnel and barricades was put in place outside her residence to prevent her from leaving.
— All India Trinamool Congress (@AITCofficial) July 5, 2026
Despite these attempts to stop her, our demand remains unchanged:… pic.twitter.com/o6dayiSNOF
“ममता बॅनर्जींना १५ वर्षांत वेळ मिळाला नाही” – अग्नीमित्रा पॉल
दरम्यान, पीडितेच्या कुटुंबियांना भेटू दिले जात नसल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. त्यावर पश्चिम बंगालच्या मंत्री अग्नीमित्रा पॉल प्रत्युत्तर देत म्हणाल्या, “ममता बॅनर्जींना मागील १५ वर्षांत भेट देण्यासाठी कधी वेळ मिळाला नाही. त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात अनेक घटना घडल्या. प्रत्येक मिनिटाला बलात्कार होत होते. फक्त तुम्हालाच (ममता बॅनर्जी) नव्हे, तर तुमच्या आमदार, खासदार, मंत्र्यांनाही वेळ मिळाला नाही. मणिपूर, उन्नाव आणि हाथरसला जाण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला. पण, पश्चिम बंगालमधील पीडित महिला व मुलींना भेटण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला नाही. परंतु, प्रकरणे दाबण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला. जसे की आरजी कर प्रकरण किंवा हंसखाली, कामदुनी आणि पार्कस्ट्रीट प्रकरण तुम्ही दाबले. तु्म्हाला तिथे जाण्याची (पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्याची) परवानगी दिली जाणार नाही. तुम्हाला राजकारण करू दिले जाणार नाही.”
ममता बॅनर्जींनी काय आरोप केले?
पीडित कुटुंबाची भेट घेणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी रविवारी रात्री उशीरा घोषित केले. त्यानंतर त्यांच्या कालिघाट येथील निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली. आपल्याला घरातून बाहेर पडू दिले जात नसल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून केला. “मी एकटीने जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेण्याचे नियोजन केले होते. दरम्यान, माझ्या घराच्या जवळील सर्व रस्ते पोलिस व केंद्रीय दलांनी ब्लॉक केले आहेत. असे करण्याचे कारणही त्यांनी आम्हाला सांगितले नाही. ते मला घराबाहेर का पडू देत नाहीत, हे मला माहिती नाही. त्यांना माझ्यापासून काय धोका आहे तेच मला कळत नाही. आम्ही खरी टीएमसी आहोत. पण, ज्यांनी भाजपाची कास धरली त्यांना राजकीय कार्यक्रम करू दिले जात आहेत”, असे ममता म्हणाल्या. पीडितेच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधल्याचे त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांनी सोमवारी त्यांच्या कालिघाट येथील निवासस्थानापासून ते हाजरा क्रॉसिंग भागापर्यंत हातात मेणबत्ती घेऊन ‘कँडल मार्च’ काढला होता. या माध्यमातून त्यांनी बलात्कार व हत्या प्रकरणाचा निषेध केला.
माकप राज्यभर आंदोलन करणार
या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यभर आंदोलन केले जाईल, अशी घोषणा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. माजी खासदार सुजान चक्रवर्ती यांच्या नेतृत्वात माकपच्या शिष्टमंडळाने बरुइपूरचा दौरा केला. पीडितेच्या कुटुंबियांची त्यांनी सोमवारी भेट घेतली. “पोलिस अक्षम आहेत. संपूर्ण राज्य पीडितेसाठी न्याय मागत आहे. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत”, असा इशारा माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य सुजान चक्रवर्ती यांनी दिला आहे. माकपच्या कार्यकर्त्यांनी बरुइपूर पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने केली. तसेच त्यांनी कोलकात्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या एस्प्लेनेड येथे एक भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे.
