पश्चिम बंगाल हे राज्य राजकीय हिंसाचारासाठी कुप्रसिद्ध आहे. २०२१ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्येही बराच हिंसाचार झालेला पाहायला मिळाला. अशा राजकीय हिंसाचाराचा मोठा इतिहास असणारा मतदारसंघ म्हणजे बैरकपूर होय. या मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात आहे. या ठिकाणी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार पार्थ भौमिक आणि भाजपाचे उमेदवार अर्जुन सिंह यांच्यामध्ये लढत होत आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसने लावलेले काही बॅनर्स चर्चेचे कारण ठरले आहेत. या बॅनर्समध्ये अर्जुन सिंह यांचे व्यंगचित्र असून त्यांना ‘पलटूराम’ असे संबोधण्यात आले आहे. त्यांच्या बाजूलाच विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांचेही व्यंगचित्र असून ते अर्जुन सिंह यांना ‘भाजपाचा लॉलीपॉप’ देत असल्याची उपहासात्मक टीका करण्यात आली आहे. एकेकाळी तृणमूल काँग्रेसचे महत्त्वाचे नेते मानले जाणारे सुवेंदु अधिकारी आता भाजपावासी झाले आहेत, तर दुसरीकडे अर्जुन सिंह यांच्यावरदेखील अशाच पक्षबदलू वृत्तीसाठी ‘पलटूराम’चा शिक्का बसला आहे.

हिंदी भाषकांची संख्या अधिक

बैरकपूर मतदारसंघामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यातून स्थलांतरित झालेल्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यांचा विचार करून तृणमूल काँग्रेसने ही पोस्टर्स हिंदीमध्ये लावली आहेत. हुगलीच्या पूर्वेला वसलेले बैरकपूर हे एक प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहे. इथे ताग उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक कारखाने आणि गिरण्या आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहार या हिंदी भाषक पट्ट्यातील अनेक कामगारांनी इथे रोजगारासाठी स्थलांतर केले आहे. या मतदारसंघातील अंदाजे ३५ टक्के लोकसंख्येची मातृभाषा हिंदी आहे. बैरकपूरलगतची अनेक शहरे याच मतदारसंघात येत असल्याने इथे जवळपास निम्मे मतदार शहरी आहेत. येत्या २० मे रोजी या मतदारसंघातील मतदान पार पडणार आहे.

हेही वाचा : “पूर्वी भाजपाला RSS ची गरज लागत होती, आता…”, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपा स्वयंपूर्ण आहे!”

राजकीय हिंसेसाठी कुप्रसिद्ध

पश्चिम बंगालमधील हा मतदारसंघ राजकीय हिंसेसाठी ओळखला जातो. भाजपाचे उमेदवार अर्जुन सिंह यांनी पक्ष बदलल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर २०१९ ते २०२१ या काळात इथे मोठ्या प्रमाणावर राजकीय हिंसाचाराच्या घटना दिसून आल्या. त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांसाठी ही निवडणूक स्थैर्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या मतदारसंघातील हिंसाचाराची तीव्रता समजून घेण्यासाठी एक उदाहारण पुरेसे बोलके आहे. गेल्या वर्षी बॉल समजून बॉम्ब उचलल्यामुळे झालेल्या स्फोटात एमडी फिरोज यांचा दहा वर्षांचा मुलगा जबर जखमी झाला होता. त्यांनी म्हटले की, “त्याच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, उजव्या डोळ्याने अजूनही दिसत नाही. त्याला या स्फोटामुळे डावा हातही गमवावा लागला. अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळावे, म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: त्याला पाहण्यासाठी दवाखान्यात आल्या होत्या. मात्र, त्यांच्याकडून काहीही मदत मिळाली नाही. असे दु:ख कुणाच्या वाट्याला येऊ नये, त्यामुळे यावेळी मी शांततेसाठी मतदान करेन.”

कधी भाजपा, कधी तृणमूल…

अर्जुन सिंह यांचे वडील भाटपाडामधून काँग्रेसचे तीनवेळा आमदार राहिले होते. अर्जुन सिंह यांनी काँग्रेसच्या तिकिटावर भाटपाडा नगरपालिकेची निवडणूक लढवत राजकारणात प्रवेश केला होता. १९९८ साली ममता बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापन केल्यानंतर अर्जुन सिंह त्यांच्याबरोबर तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर भाटपाडामधून त्यांनी चार वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. त्यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करत तिकीट मिळवले. त्यांनी बैरकपूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या दिनेश त्रिवेदी यांचा १४ हजार मतांनी पराभव करत विजय प्राप्त केला. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत, तृणमूल काँग्रेसने या मतदारसंघातील आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा परत मिळवली. त्यामुळे बैरकपूरमधील एकूण विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त भाटपाडा मतदारसंघातच भाजपाला विजय मिळवता आला. त्यानंतरच्या वर्षी लगचेच अर्जुन सिंह यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये येणे पसंत केले. त्यांनी या मतदारसंघातील तागाच्या गिरण्या पुन्हा सुरू करण्याची परवानगी केंद्र सरकारने नाकारल्याचे कारण पुढे केले. त्यानंतर आलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारले आणि ते परत भाजपामध्ये गेले आहेत. तृणमूलकडून त्यांच्याऐवजी पार्थ भौमिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना अर्जुन सिंह म्हणाले की, “मी आदल्या रात्री अभ्यास करून परीक्षेला जाणारा विद्यार्थी नाही. मी संपूर्ण वर्षभर अभ्यास करणारा विद्यार्थी आहे. मी संपूर्ण वर्षभर २४x७ माझ्या मतदारांसाठी उपलब्ध असतो. ते त्यांच्या अडचणी घेऊन येतात आणि त्या मी सोडवतो.” हिंदी भाषक मतदारांवर अर्जुन सिंह यांची मदार असल्याचे म्हटले जाते. त्याबाबत ते म्हणाले की, “गेल्या १४० वर्षांपासून माझे पूर्वज इथे राहतात. मी स्वत:ला बंगालीच मानतो.” दुसरीकडे, तृणमूलचे उमेदवार पार्थ भौमिक स्वत:ला ‘तृणमूलचा एकनिष्ठ शिलेदार’ म्हणवून घेतात. लोकांना ममता दीदींचे काम आवडते. भाजपा फक्त धार्मिक राजकारण करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करते, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : मुस्लिम, हुकूमशहा अन् दिवाळखोरी शब्द वापरण्यावर बंदी; सीताराम येचुरी अन् देवराजन यांच्या भाषणातून शब्द वगळले

‘पलटूराम’ असल्याचा आरोप

श्यामनगरच्या तरुण मतदार प्राप्ती सिंह यांनी म्हटले की, “बैरकपूरमध्ये विकास होण्याची गरज आहे. कायदा आणि सुव्यवस्था आपोआप सुधारेल. जर उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्था सुधारू शकते, तर बैरकपूरची का नाही?” अर्जुन सिंह यांच्यावर ‘पलटूराम’ असल्याचा आरोप होतो, त्यामुळे “ते आहे त्याच पक्षात राहतील, याची काय खात्री आहे?” असा प्रश्न टीटागडचे रहिवासी वसीम यांनी केला आहे. भाटपाडामधील आपल्या छोट्याशा घराबाहेर झाडू तयार करणाऱ्या ४५ वर्षीय आरती देवी म्हणतात की, “मला राज्य सरकारकडून थेट पैसे मिळतात. मी त्यांना (मुख्यमंत्री ममता बॅनर्जी) फसवू शकत नाही. एक स्त्री असल्याने त्या स्त्रियांबद्दल चांगला विचार करतात.” अर्जुन सिंह यांनी वारंवार पक्ष बदलला असल्यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी झाली आहे. पण, तृणमूल काँग्रेसची संघटनात्मक शक्ती पाठिशी असली तरीही पार्थ भौमिक यांच्यासाठी ही लढाई तितकी सोपी नसणार आहे.