West Bengal Voter List controversy पश्चिम बंगालमधील नादीया जिल्ह्यात दोन अनोळखी व्यक्तींमधील संवादाची सुरूवात सध्या दोन प्रश्नांनी होत आहे. एक म्हणजे “तुमचे नाव मतदार यादीत आहे का?” आणि दुसरा प्रश्न म्हणजे “तुम्ही न्यायाधिकरणात तक्रार दाखल केली का?” पश्चिम बंगालमध्ये मतदारयाद्यांच्या फेरतपासणीवरून राजकीय वातावरण तापत आहे. परंतु, त्याची झळ सामान्य नागरिकांना बसत आहे. नादिया जिल्ह्यातील छुपिपोटा गावातील मतदान केंद्र ११ वरील सर्वच १५२ मतदारांची नावे वगळण्यात आली असून त्यांनी या विरोधात दाद मागितली आहे. तर मतदान केंद्र १२ वरील १२० पैकी फक्त २ मतदारांची नावे मतदारयादीत आहेत.
नादिया जिल्ह्यासारखीच परिस्थिती हुगळी आणि नॉर्थ २४ परगणा या जिल्ह्यांमधील मतुआ आणि मुस्लीम समाजात आहे. मतुआ व मुस्लीम समाजातील जवळपास ७० टक्के मतदारांची नावे विसंगती आढळल्याने मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत. नादिया व नॉर्थ २४ परगणा या दोन जिल्ह्यात सर्वाधिक नावे वगळण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात २३ एप्रिल व २९ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर ४ मे रोजी निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगालमध्ये मतदारयाद्यांच्या फेरतपासणीचा परिणाम कसा झाला? जाणून घेऊयात.
नादिया जिल्ह्यात विधानसभेचे एकूण १७ मतदारसंघ आहेत. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ९ जागा मिळाल्या होत्या, तर तृणमूल काँग्रेसने ८ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने राणाघाट दक्षिण आणि कालीगंज या दोन जागा भाजपकडून हिसकावून घेतल्या. २०२१ च्या निवडणुकीत विजयाचे सर्वात कमी अंतर जवळपास ७,००० मतांचे होते (तेहट्टा मतदारसंघ, तृणमूल काँग्रेसचा विजय), तर सर्वात जास्त अंतर ५०,००० मतांहून अधिक होते (पळशीपाडा मतदारसंघ, तृणमूलचा काँग्रेसचा विजय).
नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यात विधानसभेचे एकूण ३३ मतदारसंघ आहेत. २०२१ च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने तब्बल २९ जागांवर विजय मिळवला, तर भाजपने ४ जागा जिंकल्या— गायघाटा, भाटपारा, बनगाव उत्तर आणि बनगाव दक्षिण. येथे विजयाचे अंतर सर्वात कमी २,००० पेक्षा जास्त मते (बनगाव दक्षिण, भाजपाचा विजय) ते सर्वात जास्त ८०,००० पेक्षा जास्त मते (हारोआ, तृणमूलचा विजय) असे राहिले.
हुगळी जिल्ह्यात विधानसभेचे एकूण १८ मतदारसंघ आहेत. २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसने १४ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला केवळ ४ जागा मिळाल्या होत्या. भाजपने आपल्या चारपैकी तीन जागा कमी मतांच्या फरकाने जिंकल्या, ज्यामध्ये जिल्ह्यातील सर्वात कमी फरकाचाही (गोघाट, ४,००० पेक्षा जास्त मते) समावेश होता. विजयाचे सर्वात जास्त अंतर चंडीतला मतदारसंघात ४१,००० पेक्षा जास्त मते इतके होते, जिथे तृणमूल काँग्रेसचा विजय झाला.
मतदान यादीतून नाव वगळले गेल्यामुळे तसेच न्यायाधिकरणांकडून कोणताही दिलासा मिळत नसल्याने पश्चिम बंगालमध्ये मतदारांमध्ये नाराजी आहे. सर्व राजकीय पक्षांवर मतदार संताप व्यक्त करत आहेत. ४० वर्षीय शकीला बीबी यांचे नाव त्यांच्या वडिलांच्या नावातील विसंगतीमुळे वगळण्यात आले आहे. २००२ च्या मतदारयाद्यांच्या फेरतपासणीत त्यांच्या वडिलांचे नाव दोलेहार शेख असे होते, परंतु नंतर ते शेख डॉलर असे नोंदवले गेले. “जर मला मतदान करता आले असते, तर मी भाजप किंवा तृणमूल काँग्रेस यांपैकी कोणालाच मत दिले नसते”, अशी तीव्र नाराजी शकीला बीबी यांनी व्यक्त केली.
शकीला बीबी म्हणाल्या, “मी २००६ ते २०२४ पर्यंत मतदान केले आहे, मग आताच मी नागरिक कशी नाही? मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणतात त्या आमच्या पाठीशी उभ्या आहेत, पण जेव्हा आमची नावे वगळली जात होती तेव्हा त्या कुठे होत्या? आम्ही फक्त एक ‘व्होट बँक’ आहोत हे आता आम्हाला कळून चुकले आहे.” एका स्थानिक निरीक्षकाच्या मते, तृणमूल काँग्रेसलाही नेमकी हीच भीती वाटत आहे. बंगालमध्ये ८०,००० मतदान केंद्रे आहेत. साधारणपणे एका बूथवर तृणमूल आणि भाजपमधील मतांचे अंतर १०,००० ते १२,००० असते. त्यामुळे मतदार यादीतून नावे वगळण्याचे हे गणित निवडणुकीत मोठा फेरबदल घडवून आणू शकते.
सहा किंवा अधिक अपत्य असणाऱ्या पालकांच्या मुलांची नावे मतदार यादीत आधीच नोंद आहेत, असे सांगून मुस्लिम समाजातील नागरिकांची नावे मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात वगळली गेली. तर मतुआ समाजातील नागरिकांची नावे पालकांच्या नावातील विसंगती किंवा मागील ‘एसआयआर’मध्ये नावात असलेली तफावत यांमुळे मोठ्या संख्येने वगळण्यात आली आहेत. ३६ वर्षीय पियारू हुसेन शेख यांचे नाव वगळण्यात आले. त्याचे कारण म्हणजे इतर सहा जणांनी हुसेन शेख हेच आपल्या वडिलांचे नाव असल्याचे सांगितले आहे. पियारू शेख यांनी आपण तीन भावंडे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “आम्ही आमची कौटुंबिक वंशावळ सादर केली, परंतु त्यांनी त्याचा विचार केला नाही. दुसरीकडे, माझा धाकटा भाऊ संजय याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका असूनही त्याचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले.”
५२ वर्षीय नूर इस्लाम यांच्या बाबतीतही असेच घडले. २००२ च्या मतदार यादीत त्यांच्या नावाची नोंद ‘नूर मोहम्मद शेख’ अशी आहे. “माझ्याकडे (याबाबत) प्रतिज्ञापत्र आहे, मी ते सादरही केले. जर काही चूक होती, तर त्यांनी अधिक पुराव्यांची मागणी करायला हवी होती, पण आमचा मतदानाचा हक्क का हिरावून घेतला?”, असा सवाल त्यांनी विचारला. छुपिपोटा गावच्या प्रधान सबनूर खातून यांचे पती रब्बील शेख सांगतात की, गावातील ८० टक्के कुटुंबांमधील दोन किंवा त्याहून अधिक नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
७५ वर्षीय कुलचन बीबी म्हणाल्या, त्यांचे दिवंगत पती जमीरउद्दीन शेख यांनी दोन लग्ने केली होती. जमीरउद्दीन यांना कुलचन यांच्यापासून पाच मुले, तर दुसऱ्या पत्नीपासून चार मुले होती. आता, कुलचन बीबी आणि त्यांच्या सुनांची नावे मतदार यादीत आहेत, मात्र त्यांची दोन मुले आणि दोन नातवांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यांचा एक नातू सलीम शेख (२३) म्हणाला, “मला २०२५ मध्येच माझे मतदार ओळखपत्र मिळाले होते. जर यानंतर मला कधीच मतदार ओळखपत्र मिळाले नाही तर काय होईल?” दुसरा नातू अब्दुल हुसेन (२२) म्हणाला, जर मतदार नोंदणीचे अर्ज नाकारले जाणार हे आधीच माहीत असते, तर मी अर्जच भरला नसता. ही एक खूप मोठी प्रक्रिया होती. मी माझे इतके दिवस वाया घालवले नसते.
काँग्रेसचे कृष्णनगर दक्षिणचे उमेदवार अब्दुर रहीम शेख म्हणाले, “या निवडणुकीत, भाजपला जे लोक मतदान करणार नाहीत त्यांची नावे वगळण्यात आली आहेत. राज्यातील राजकारण भाजप विरुद्ध तृणमूल असे राहावे आणि इतर पक्षांना बाहेर ठेवले जावे, यासाठी तृणमूल काँग्रेसनेही या प्रक्रियेला पाठिंबा दिला आहे.” असा आरोप त्यांनी केला. काही भागात ७० टक्के हिंदू मतेही वगळली गेली आहेत, असे ते म्हणाले. हुगळी जिल्ह्यातील उत्तरपाडा येथून निवडणूक लढवणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचे पुत्र शिर्षण्य हलदर म्हणाले, “माझ्या मतदारसंघात ३२,००० मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. वगळण्यात आलेले बहुतेक लोक हिंदी भाषिक आणि अस्सल मतदार आहेत. इथे फक्त दोन टक्के अल्पसंख्याक मतदार आहेत.”
